अकोला : आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ,आमची शेतकऱ्यांची सहनशक्ती संपली आहे. आम्ही तसेही आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहोत. परंतु, आम्ही आत्महत्या करणार नाही तर, ज्यांनी ज्यांनी आमच्यावर ही वेळ आणली त्या अधिकारी, मंत्र्यांची कपडे फाडून त्यांना ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटननेची ५ नोव्हेंबर नंतरची भूमिका असणार आहे. याचे जे काही परिणाम होतील ते आम्ही भोगायला तयार आहोत, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी संघटनेची आंदोलक भूमिका शुक्रवारी (ता.३०) अकोल्यात मांडली.
अतिवृष्टी,अवकाळी पावसामुळे विदर्भ तसेच मराठवाड्यातील सोयाबीन, कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, कापसासाठी तत्काळ सीसीआय व फेडरेशनची तालुकानिहाय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, केंद्र सरकारने तयार केलेली शेतकरी विरोधी कृषी धोरणे बदलावी, कमी भावात शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे व संबंधित शेतकऱ्यांना भावांतराची रक्कम अदा करावी, सोयाबीनला एकरी सहा हजार रुपये भाव द्यावा.
सोयाबीनचे भाव स्थिर करण्यासाठी आयात निर्यातिच्या धोरणात बदल करावा, विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी यासाठी केंद्र सरकारने विमा कंपन्यांना बाध्य करावे व कंपन्या ती द्यायला तयार नसतील. तर त्यांच्यावर कारवाई करावी, वाढीव वीजबिल तत्काळ माफ करावे, इत्यादी मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ तसेच मराठवाड्यात आता लढा देणार आहे.
सर्व मागण्या ५ नोव्हेंबर पर्यंत सरकारने मान्य केल्या नाहीत तर, त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर बसून तीव्र आंदोलन करण्यात येईल. लोकशाहीच्या मार्गाने मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, केंद्रीय तसेच राज्य सरकारच्या मंत्र्यांचे व चुकीचा अहवाल पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांचे कपडे फाडू, त्यांना ठोकून काढू, अशी आक्रमक भूमिका तुपकर यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली.
यावेळी ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाचे अध्यक्ष व वाशीम जिल्हा परिषद सदस्य दामुअण्णा इंगोले, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश खुमकर, स्वाभिमानी पक्षाचे अकोला जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर गवळी, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संजय सोनोने, युती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रुपालीताई थोरवे, चंद्रशेखर मोरे, संजू खोटरे, श्याम बोरडे, महिला आघाडी अध्यक्ष बेबीताई राठोड उपस्थित होते.
केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून नुकसानीची पाहणी भाजपच्या नेत्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात पिकाचे नुकसान झाले असे दर्शवून केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून नुकसानीची पाहणी केली. विदर्भातही सोयाबीन, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील बहुतांश भागात पंचनामे सुद्धा झाले नसून, ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात अकोला जिल्ह्यात शुन्य नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने दिला आहे. सर्वाधिक पीक नुकसान येथे पंधरवाड्यात झाल्याचे तुपकर यांनी सांगितले.
-------------
पदे ओवाळून टाकू
राजकीय दृष्टीकोनातून ही आंदोलक भूमिका नसून, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठीचा आमचा लढा आहे. यापुर्वी सुद्धा सत्तेतील पदे आमच्याकडे होती. परंतु, शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचे लक्षात येताच आम्ही ती पदे स्वतःहून त्याग केला आहे. यापुढेही शेतकऱ्यांसाठी कोणतेही पद ओवाळून टाकू, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.