काँग्रेसने साथ सोडताच राजेंद्र शिंगणेंचा बच्चू कडूंना फोन  - Shiv Sena-NCP will form an alliance with Bachchu Kadu's party for Akola Zilla Parishad by-election | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसने साथ सोडताच राजेंद्र शिंगणेंचा बच्चू कडूंना फोन 

मनोज भिवगडे
मंगळवार, 29 जून 2021

मुंबईत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कळविले असल्याची माहिती आहे.

अकोला : अकोला जिल्हा परिषद, पंचायत समितीची पोटनिवडणूक स्वळावर लढायची की आघाडीच्या माध्यमातून सामोरे जायचे, यावर चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच काँग्रेसने मात्र महाविकास आघाडीची साथ सोडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रहार जनशक्तीला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी अकोला जिल्ह्याचे संपर्क मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रहारचे संस्थापक तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. बच्चू कडू यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत बुधवारच्या (ता. २९ जून) मुंबईत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कळविले असल्याची माहिती आहे. याच बैठकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.  (Shiv Sena-NCP will form an alliance with Bachchu Kadu's party for Akola Zilla Parishad by-election)

अकोला जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांवर सर्वच पक्षातील दिग्गजांनी दावा केला आहे. विजयी जागांवर त्याच पक्षाला प्राधान्य देण्यात यावे, यावर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे अकोला येथे झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे काँग्रेसला वगळून शिवसेना आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसने आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी विचार सुरू केला आहे. 

हेही वाचा : बांदलांना मदत करणे वाफगावच्या माजी सरपंचाच्या आले अंगलट

दरम्यान, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षालासोबत घेऊन पोटनिवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय बुधवारी होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी तीनही पक्षाच्या नेत्यांची बुधवारी (ता. २९ जून) मुंबईत होणार आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाला पोटनिवडणुकीत सोबत घेण्यासंदर्भात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुकूल आहेत. त्यासाठी अकोल्याचे संपर्कमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रहारचे संस्थापक व अकोल्याचे पालकमंत्री डॉ. बच्चू कडू यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत बुधवारच्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कळविले आहे. 

अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतील आघाडीबाबतही ही शेवटची चर्चा असणार. या बैठकीतून तोडगा न निघाल्यास सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महाविकास आघाडीबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने सोमवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीतून कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर इतर तीन पक्षांनी काँग्रेसचा नाद सोडून चर्चा पुढे सुरू ठेवली आहे.

आघाडीत शिवसेनेचा वरचष्मा राहणार

ही पोटनिवडणूक जिल्हा परिषदेच्या १४ आणि पंचायत समितीच्या २८ जागांसाठी होत आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीत वाटाघाटीवर चर्चा होणार आहे. जागा वाटपात सर्वाधिक जागांवर शिवसेनेचा दावा असेल. ग्रामीण भागात शिवसेनेची व्होट बँक अधिक असल्याने त्यांचा जागा वाटपात वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून किती जागांवर दावा केला जातो, यावरच चर्चेचे व महाविकास आघाडीचे भवितव्य ठरणार आहे.

या बैठकीत निर्णय होणार 

काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेतल्याने मुंबईत बुधवारी (ता. २९ जून) शिवसेना व राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अकोला जिल्ह्यातील नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला प्रहारचे प्रतिनिधीही उपस्थित राहतील. पोटनिवडणूक आघाडीतून लढण्याबाबत या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गोपाल दातकर यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख