शिवसेना-राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडूंची दांडी - Shiv Sena-NCP alliance for Akola Zilla Parishad by-election will be announced today | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना-राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडूंची दांडी

मनोज भिवगडे
बुधवार, 30 जून 2021

काँग्रेसने महाविकास आघाडीतून अंग काढल्याने शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची पोटनिवडणूक आघाडी करून लढण्यावर जळवपास शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, एक जागेसाठी आघाडीची घोषणा रखडली असून, गुरुवारी (ता. १ जुलै) त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. (Shiv Sena-NCP alliance for Akola Zilla Parishad by-election will be announced today)

अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने महाविकास आघाडीतून अंग काढल्याने शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दोन्ही पक्षाच्या संपर्क मंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बुधवारी आघाडीवर चर्चा करण्यात आली. अकोला जिल्ह्याचे संपर्कमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मुंबईतील बंगल्यावर ही बैठक पार पडली. 

हेही वाचा : तुमचा अतिसंस्कृतपणा महाराष्ट्राला ७० वर्षांपासून लूटतोय

या बैठकीला शिवसेनेचे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर यांच्यासह डॉ. राजेंद्र शिगंणे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार नितीन देशमुख, उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार तुकाराम बिडकर, हरिदास भदे, बळीराम सिरस्कार आदींची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या १४ जागांच्या वाटपावर चर्चा झाली. शिवसेनेकडून राष्‍ट्रवादी काँग्रेसला चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने १४ पैकी पाच जागांवर निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. त्यामुळे एका जागेवर आघाडीचे घोडे अडल्याचे दिसून आले.

 
सकारात्मक निर्णयाची शक्यता

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपावरून सुरू असलेल्या चर्चेत एका जागेची अडचण आली आहे, त्यामुळे बुधवारी (ता. ३० जून) झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आता गुरुवारी (ता. १ जुलै) दोन्ही पक्षांत अंतिम चर्चा होणार असून, त्यात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता दोन्ही पक्षांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
 
प्रहारची अनुपस्थिती

मुंबईतील बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतर्फे प्रहार जनशक्ती पक्षाला उपस्थित राहण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्यासाठी डॉ. शिंगणे यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासोबत संपर्कही साधला होता. मात्र, कार्यक्रमात व्यस्त असल्याने प्रहारचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. आघाडीबाबत निर्णय झाल्यास आघाडीकडून अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष स्वतंत्रपणे पोटनिवडणूक लढवेल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बबलू जवंजाळ यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख