'रिलायन्स' शेतकऱ्यांना फसवून पळ काढत आहे...  - Reliance is cheating farmer crop insurance | Politics Marathi News - Sarkarnama

'रिलायन्स' शेतकऱ्यांना फसवून पळ काढत आहे... 

संजय जाधव
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

अनेक शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविण्याकरीता कृषी विभाग, तहसील कार्यालयात धाव घेतली आहे.

बुलढाणा : खामगाव येथे आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉल मध्ये सत्याग्रह शेतकरी संघटनेची आयोजित बैठक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाली. संघटनेचे राष्ट्रीय संयोजक कैलास फाटे यांच्या नेतृत्वात पिक विमा या विषयावर शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.  

रिलायन्स कंपनीने या आधी सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फसविले आहे. आज सुध्दा ती कंपनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फसवून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरून मोठ्या संख्येने सहभागी होऊन परभणी, वाशीम, नागपूर, वर्धा, गोंदिया, जालना, नंदुरबार, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांसोबत आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले.  

कैलास फाटे म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यातील 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी खरीप 2020 मध्ये पिकविमा काढला. पैकी जिल्ह्यातील सुमारे 60 ते 65 हजार शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान लक्षात येताच नियमाप्रमाणे कृषी विभागाकडे, ऑनलाईन द्वारे तर काहींनी पिकविमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी केलेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविण्याकरीता कृषी विभाग, तहसील कार्यालयात धाव घेतली तर तिथे सरसकट नुकसान आहे. आपल्याला नुकसान भरपाई व पिकविमा सरसकट मिळेल, सर्वांच्या तक्रारी घ्यायला आमच्याकडे एवढा वेळ नाही, असे सांगून परत केले. 

कंपनीचा टोल फ्री नंबर लागतच नसल्यामुळे तक्रारी नोंदवू शकले नाही. प्रशासनाने खोटे सर्वे करून आणेवारी 50 पैशाचे वर नेऊन ठेवली याचाच फायदा घेत पिकविमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देता पळ काढत आहे. पिकविम्याच्या परिपत्रकाप्रमाणे 25 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देने अनिवार्य आहे. आणेवारीचा सर्वे आणि पीक नुकसानीची सर्वे हा भिन्न असतो तो सर्वे झालाच नाही. त्याची जवाबदारी विमा कंपनीची आहे. त्यामुळे पिकविम्याचा मोबदला मिळणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. तो अधिकार सहजासहजी मिळत नसेल तर आम्ही हिसकावून घेऊ असे फाटे म्हणाले. 

ते म्हणाले की आजपासून पिकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज भरण्याची मोहीम सुरू झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनी अर्ज भरून पिकविमा काढल्याची पावती व नुकसानीची तक्रार दिल्याचा पुरावा किंवा तक्रार देऊ न शकल्यास त्याचे लेखीस्वरूपात जिल्हाधिकारी यांच्या नावे सविस्तर करण नमूद करून पत्र जोडणे व ते अर्ज जिल्हा संयोजक राजू नाकडे यांच्याकडे जमा करायचे आहेत, असे त्यांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्याला या वर्षी सरकारने रिलायन्स कंपनी नेमून दिले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख