भाजपचे माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचे हृद्‌यविकाराने निधन  - Former BJP MLA Dr. Jagannath Dhone dies of heart attack | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचे हृद्‌यविकाराने निधन 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

डॉ. ढोणे यांनी 1990 मध्ये अकोट मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली होती.​

अकोला : भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आणि माळी समाजाचे वरिष्ठ नेते डॉ. जगन्नाथ सीताराम ढोणे यांचे सोमवारी (ता. 26 ऑक्‍टोबर) रात्री ह्‌दयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी पातूर येथील डॉ. वंदनताई जगन्नाथराराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

जगन्नाथ ढोणे हे एम. एस. सर्जन होते. त्यांनी डॉक्‍टरकीसह राजकारणातही आपला ठसा उमटवला होता. डॉ. जगन्नाथ ढोणे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. उपचाराअंती ढोणे यांनी कोरोनावर मात केली होती.

अकोट विधानसभा मतदारसंघातून ढोणे हे शिवसेनेचे पहिले आमदार होते. डॉ. ढोणे यांनी 1990 मध्ये अकोट मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली होती. त्यांनी कॉंग्रेस उमेदवार सुधाकर गणगणे यांचा पराभव केला होता. त्यानंतर 1995 मध्ये ढोणे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर विदर्भाच्या प्रश्नी लढा दिला होता. 

डॉ. ढोणे हे राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक होते. राष्ट्रवादी सोडून सात वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर प्रदेश कार्यकारणी सदस्य, अकोला जिल्हा भाजप सिंचन परिषदेचे संयोजक अशी जबाबदारी सोपवली होती.

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस ,कॉंग्रेस आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. वयाच्या 60 वर्षांनंतरही ते भाजपत सक्रिय नेते होते. नुकताच रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या निधनामुळे पातूरवर शोककळा पसरली आहे. 

केंद्रीय राज्यमंत्री, आमदारांकडून शोक प्रकट 

विदर्भवादी तसेच विदर्भाच्या विकासासाठी सतत संघर्ष राहणारे अभ्यासू नेतृत्व, सामाजिक क्षेत्रात अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी डॉ. जगन्नाथ ढोणे यांच्या निधनाने एक चांगला सहकारी गमावला आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

विश्व हिंदू परिषद रामजन्मभूमी आंदोलनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे तसेच रामनवमी शोभायात्रा समितीचे संस्थापक सदस्य सीताराम ढोणे यांच्या संस्कारात सामाजिक राजकीय वाटचाल करणारे विदर्भवादी नेते जगन्नाथ ढोणे आपले सहकारी यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी ढोणे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सामाजिक दायित्व लक्षात घेऊन जिल्ह्याच्या प्रत्येक समाजाची एक रूप होऊन भाजप विस्तारासाठी सदैव कार्यरत तसेच सिंचना विषयी जागृत नेतृत्व प्रखर वक्ते डॉ. जगन्नाथ ढोणे यांच्या निधनाने भाजपची फार मोठी हानी झाली अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

शेतकरी शेतमजूर व विकासाचा दृष्टिकोन ठेवून आयुर्वेदिक क्षेत्रात तसेच शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी करणारे जगन्नाथ ढोणे आपले सहकारी निघून गेल्याने ही हानी न भरून निघणारी असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रकाश भारसाकळे यांनी व्यक्त केली. 

माळी समाज सोबत अठरापगड जाती बारा बलुतेदारांच्या समस्या याची जाण असणारा व जिल्ह्याच्या प्रत्येक कार्यामध्ये सकारात्मक बाबींचा विचार करणारे डॉ. जगन्नाथ ढोणे यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली, अशा शब्दांत महापौर अर्चना मसने यांनी श्रद्धांजली अर्पण केली. भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य तेजराव थोरात, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. 

माजी आमदार जगन्नाथ ढोणे यांनी राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला. त्यांच्या अशा अचानक जाण्याने बहुजन समाजातील एक कुशल नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी ढोणे यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख