अकोला 'झेडपी'चे माजी अध्यक्ष दादा मते पाटील यांचे निधन 

दादा मते पाटील यांच्या रुपाने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेतृत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
Akola 'ZP's Former president Dada Mate Patil passes away
Akola 'ZP's Former president Dada Mate Patil passes away

अकोला : अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय ऊर्फ दादाराव नारायणराव मते पाटील यांचे रविवारी (ता. 6 सप्टेंबर) दुपारी निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांना शनिवारी (ता. 5 सप्टेंबर) श्वसनाचा त्रास होत असल्याने येथील एक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

मोठी उमरी ग्रामपंचायतीवर दोन दशके सत्ता गाजविणारे दादा मते पाटील यांनी 1999 मध्ये प्रथमच जिल्हा परिषद निवडणूक लढवी आणि पहिल्याच प्रयत्नांत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षही झाले होते. त्यांनी 30 डिसेंबर 1999 ते 29 डिसेंबर 2001 या कालावधीत अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. 

अकोला जिल्हा परिषदेवर त्यानंतर कॉंग्रेसची सत्ता आली नाही. त्यांना 2009 च्या विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती. मात्र, भारिप-बसंचे हरिदास भदे निवडून आले होते, तर शिवसेनेचे गुलाबराव गावंडे दुसऱ्या स्थानी होते. दादा मते पाटलांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यापूर्वी ते दोन वेळा मोठी उमरी ग्रामपंचायतीचे सरपंच होते. 

त्यांचा जिल्हा परिषद मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाल्यानंतर त्यांच्या पत्नी शीलाताई मते या जिल्हा परिषद सदस्य झाल्या आहेत. मोठी उमरी ग्रामपंचायतीचा परिसर हद्दवाढीनंतर अकोला महानगर पालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी दादा मते पाटील यांचे चिरंजीव राजेश मते हे मोठी उमरीचे सरपंच होते. दादा मते पाटील यांच्या रुपाने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेतृत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. 

स्वॅब घेतला, अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू 

अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादा मते पाटील यांना शनिवारी श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅबही तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, त्यापूर्वीच रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालयात ठेवण्यात आले असून, अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. 

सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा मते पाटील यांच्या निधनाची वार्ता ऐकताच अकोल्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहली. जिल्हा परिषद व राजकीय वर्तुळातूनही त्यांच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com