प्रकाश आंबेडकरांची नाराजी भोवली : झेडपी अध्यक्षांना द्यावा लागला राजीनामा

आंबेडकर हे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत अनेक दिवसांपासून नाराज होते.
Akola Zilla Parishad President Pratibha Bhojne resigned post
Akola Zilla Parishad President Pratibha Bhojne resigned post

अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतीभा भोजने यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांकडे दिला आहे. ॲड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर हे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत अनेक दिवसांपासून नाराज होते. त्यामुळे पक्ष संघटनेने प्रतीभा भोजने यांना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. मात्र, बाळासाहेब आंबेडकर निर्णय घेईपर्यंत भोजने या अध्यक्षपदाचा कार्यभार कायम राहतील. (Akola Zilla Parishad President Pratibha Bhojne resigned post)

अकोला जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. गतवर्षी झालेल्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेचा कारभार वंचित बहुजन आघाडीने महिला पदाधिकारी प्रतीभा भोजने यांच्याकडे सोपविला होता. काही महिन्यांतच त्यांच्या कारभाराबाबत वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटू लागला होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची तीन सदस्यीय सुकाणू समिती तयार करून जिल्हा परिषदेचा कारभार चालविला जात होता. पदावर असूनही जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र पक्षाने दिले नव्हते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्येही धुसफूस सुरू होती. 

अखेर गुरुवारी (ता. १७ जून) घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर पक्ष संघटनेच्या आदेशानुसार प्रतीभा भोजने यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या राजीनाम्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर अंतिम निर्णय घेणार आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी राजीनाम्याच्या विषयावर भाष्य करण्याचे टाळले. 

 
वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष संघटनेने अकोला जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतीभा भोजने यांचा राजीनामा मागितला होता. पक्ष संघटनेच्या निर्णयाला मान देवून जिल्हा परिषद अध्यक्ष भोजने यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यावर अंतिम निर्णय मात्र बाळासाहेब आंबेडकर घेतील, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com