काँग्रेस स्वबळावर ठाम; शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार?

काँग्रेसला वगळून शिवसेना आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसने आता निवडणुकीसाठी मंथन सुरू केले आहे.
Akola ZP by-election to be fought by Congress on its own; Shiv Sena-NCP alliance discussed in Mumbai today
Akola ZP by-election to be fought by Congress on its own; Shiv Sena-NCP alliance discussed in Mumbai today

अकोला : अकोला जिल्हा परिषद, पंचायत समितीची पोटनिवडणूक स्वळावर लढायची की आघाडीच्या माध्यमातून सामोरे जायचे, यावर चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच काँग्रेसने मात्र महाविकास आघाडीला डावलून एकला चलोची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रहार जनशक्तीला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. यावर उद्या (ता. २९ जून) मुंबईत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणाऱ्या बैठकीतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Akola Zilla Parishad by-election to be fought by Congress on its own; Shiv Sena-NCP alliance discussed in Mumbai today)

रिक्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्य पदावर सर्वच पक्षातील दिग्गजांनी दावा केला आहे. अकोलखेड येथून निवडून आलेले कॉंग्रेसचे गजानन डाफे, शिवसेनेचे लाखपूर येथील अप्पू तिडके व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दगडपारवा येथून निवडून आलेल्या सुमन गावंडे यांचेही पद रिक्त झाले. विजयी झालेल्या जागांवर त्याच पक्षाला प्राधान्य देण्यात यावे, यावर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे अकोला येथे झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे काँग्रेसला वगळून शिवसेना आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसने आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मंथन सुरू केले आहे.

हेही वाचा : खुद्द अजितदादाही या कामात चूक काढू शकणार नाहीत 
 
प्रहार जनशक्ती पक्षालासोबत घेऊन पोटनिवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय बुधवारी होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी तीनही पक्षाच्या नेत्यांची बुधवारी (ता. २९ जून) मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीतील आघाडीबाबतही ही शेवटची चर्चा असणार. या बैठकीतून तोडगा न निघाल्यास सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महाविकास आघाडीबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने सोमवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीतून कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर इतर तीन पक्षांनी काँग्रेसचा नाद सोडून चर्चा पुढे सुरू ठेवली आहे.

डॉ. शिंगणे यांचा बच्चू कडूंना फोन 

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाला पोटनिवडणुकीत सोबत घेण्यासंदर्भात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुकूल आहेत. त्यासाठी अकोला जिल्ह्याचे संपर्क मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रहारचे संस्थापक व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. बच्चू कडू यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत बुधवारच्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कळविल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी किती जागांवर दावा सांगणार 

जिल्हा परिषदेच्या १४ व पंचायत समितीच्या २८ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागांसाठी मुंबईत होणाऱ्या बैठकीत वाटाघाटीवर चर्चा होणार आहे. जागा वाटपात सर्वाधिक जागांवर शिवसेनेचा दावा असेल. ग्रामीण भागात शिवसेनेची व्होट बँक अधिक असल्याने त्यांचा जागा वाटपात वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून किती जागांवर दावा केला जातो, यावरच चर्चेचे व महाविकास आघाडीचे भवितव्य ठरणार आहे.

काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेतल्याने मुंबईत बुधवारी (ता. २९ जून) शिवसेना व राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अकोला जिल्ह्यातील नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला प्रहारचे प्रतिनिधीही उपस्थित राहतील. पोटनिवडणूक आघाडीतून लढण्याबाबत या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

- गोपाल दातकर, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com