रायगडमध्ये कोणाला एसपी नेमायचे? : शिवसेना आणि राष्ट्रवादीतील रस्सीखेच संपेना! - The tug of war between Shiv Sena and NCP over appointment of Raigad SP | Politics Marathi News - Sarkarnama

रायगडमध्ये कोणाला एसपी नेमायचे? : शिवसेना आणि राष्ट्रवादीतील रस्सीखेच संपेना!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

रायगड आणि सोलापूरमधील नियुक्ती फक्त रखडली आहे. 

पुणे : रायगड पोलिस अधीक्षकपदावरून महाआघाडी सरकारमधील पक्षांत रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली. या जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना असा उघड संघर्ष असल्याने कोणाच्या मर्जीतील अधिकारी येथे आणायचा यावरून बरीच चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

या जिल्ह्यात या दोन पक्षांतील संघर्ष तसा जुनाच आहे. महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरही येथे विविध मुद्यांवरून दोन्ही पक्षांत वाद होत होते. पालकमंत्री आदिती तटकरे या शिवसेनेच्या नेत्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यावरून समन्वय साधण्यासाठी या जिल्ह्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली होती. त्यानंतरही हा वाद अधुनमधुन उमटतो आहे. त्याचे प्रतिबिंब पोलिस अधीक्षकांच्या नियुक्तीत उमटले आहे. 

राज्यभरातील 22 पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या काल झाल्या. त्यात रायगडचा समावेश नव्हता. रायगडचे पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांची येथे तीन वर्षे पूर्ण झालेली आहे. त्यामुळे ते देखील बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ झालेल्या पोलिस अधीक्षकांच्या बदल्या काल झाल्या. त्याला अपवाद केवळ रायगड जिल्हा ठरला आहे.

विविध जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक निवडताना संबंधित पालकमंत्र्यांच्या शिफारशींना महत्त्व मिळाल्याचे सांगण्यात आले.  त्याशिवाय काही ठिकाणी पोलिस महासंचालकांची शिफारस महत्त्वाची ठरली. या साऱ्या बाबी जुळवून येण्यासाठी बराच विलंब होत होता. त्यामुळेच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वारंवार मुदतवाढ द्यावी लागली होती.

रायगडमध्ये येण्यास अधिकारी इच्छुक आहे. मुंबईजवळील जिल्हा असल्याने पोलिस अधिकाऱ्यांमध्येही त्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे येथे नियुक्तीसाठी अंतर्गत चुरस असते. या चुरशीमध्ये आता राजकीय स्पर्धाही घुसली आहे. शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्वतःच्या मर्जीतील अधिकार नेमायचा आहे. खासदार सुनील तटकरे हे ज्या अधिकाऱ्याचे नाव सांगतील त्याला शिवसेनेचे लोक विरोध करत आहेत आणि सेनेच्या लोकांनी पुढे केलेले नाव तटकरेंना पसंत पडत नाही, अशी सारी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एकत्र बसून अनेक जिल्ह्यांतील नियुक्त्या मार्गी लावल्या. पण दोन्ही पक्षांतील रायगडमधील नेते आपल्या नावासाठी आग्रही असल्याने त्यावर 17 सप्टेंबरपर्यंत तोडगा निघू शकला नाही.   

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख