पोलिस दलातील बदल्यांसाठी पुन्हा मुदतवाढ : PSI, PI आता वैतागले - govt extends time for transfers of police officers for 15 days | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस दलातील बदल्यांसाठी पुन्हा मुदतवाढ : PSI, PI आता वैतागले

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

नियुक्तीच्या जागी सहा वर्षे सेवेचा प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही राज्यभरातील कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या नाहीत. तसेच पात्र असतानाही पोलिस अधिकाऱ्यांना प्रमोशनही दिले गेले नाही. त्यामुळे राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांमधे नाराजीचा सूर आहे.

नागपूर : राज्यातील पोलिस बदल्यांचा घोळ संपण्याची चिन्हे नाहीत. पोलिस अधीक्षक दर्जापासून ते अतिरिक्त पोलिस महासंचालक पदापर्यंतच्या बहुतांश बदल्या फक्त मार्गी लागल्या आहेत. उपअधीक्षक,  निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीसाठी वारंवार तारखा देण्यात येत आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्यामुळे पीआय ते पीएसआय अधिकाऱ्यांची तगमग वाढली आहे. वाढीव मुदत ही 15 आॅक्टोबर रोजी संपत होती. त्यास आता पुन्हा पंधरा दिवसांची वाढ देण्यात आली आहे. शासनाने आज याबाबत आदेश काढून 30 आॅक्टोबरपर्यंत या बदल्या करण्यास मान्यता दिली आहे.

मुदत संपायच्या काल रात्री पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला. त्याच वेळी इतरही बदल्या होतील, अशी अपेक्षा होती. कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलिस महासंचालक कार्यालयाकडून केल्या जातात. मात्र तीन पक्षांचे महाआघाडी सरकार असल्याने आणि सत्ताधारी पक्षाचा प्रत्येक आमदार आपल्या शिफारशींसाठी आग्रही असल्याने त्याबाबत निर्णय़ होत नाही का, असा प्रश्न विचारला जात आहे. महासंचालक कार्यालयाकडून बदल्या झाल्यानंतर पुन्हा संबंधित पोलिस आयुक्त, महानिरीक्षक, अधीक्षक हे पोलिस ठाण्यांच्या नियुक्त्या करणार आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे डोळे आजच्या आदेशाकडे लागले होते. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. 

नियुक्तीच्या जागी सहा वर्षे सेवेचा प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही राज्यभरातील कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या नाहीत. तसेच पात्र असतानाही पोलिस अधिकाऱ्यांना प्रमोशनही दिले गेले नाही. त्यामुळे राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांमधे नाराजीचा सूर आहे. पोलिस महासंचालक कार्यालयात पोषक वातावरण असताना नेमके घोडे अडले कुठे? असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्याचे सर्वस्वी अधिकार पोलिस महासंचालकांना असतात. तसेच त्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबतही निर्णय पोलिस महासंचालकांकडे राखीव असतात. सध्या राज्य पोलिस दलात बदल्यांचे वारे वाहत आहेत. आतापर्यंत जवळपास सर्वच पोलिस अधीक्षक-उपायुक्त आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र डीजी कार्यालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मात्र ताटकळत ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी सेवाकाळ पूर्ण झालेले पोलिस अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र सेवाकाळ पूर्ण होऊन बराच कालावधी लोटल्यानंतरही बदलीबाबत डीजी कार्यालयातून अद्याप निर्णय न झाल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
 
पोलीस महासंचालक कार्यालयातील सर्व डेस्कचे पीआय ते पीएसआय बदलीबाबतचे काम पूर्ण झालेले आहे. आदेश मिळताच ‘लिस्ट फ्लॅश’ करायची तयारी आस्थापना विभागाची आहे. त्याचबरोबर पदोन्नतीसाठी आवश्यक सर्व माहिती संकलित झालेली आहे. केवळ बैठक घेऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नतीची संख्या निश्चित करणे, पदोन्नतीच्या कार्यकक्षेत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून संवर्ग मागणी करणे आणि पदोन्नतीवर त्यांना पोस्टिंग देणे बाकी आहे, अशी माहिती आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख