जीपला दोर लावून अधिकाऱ्यांनी केलं पोलिस अधिक्षकांच्या जीपचं सारथ्य... - Farewell to Beed District Superintendent of Police Harsh Poddar | Politics Marathi News - Sarkarnama

जीपला दोर लावून अधिकाऱ्यांनी केलं पोलिस अधिक्षकांच्या जीपचं सारथ्य...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 सप्टेंबर 2020

फुलांनी सजविलेल्या जीपमध्ये फेटा घालून हर्ष पोद्दार यांना बसविलं. जीपला दोर लावून खुद्द अधिकाऱ्यांनी जीपचं सारथ्य केलं.

बीड : बीड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी आता आर. रामास्वामी आले आहेत. कडक शिस्त आणि संवेदनशिल अधिकारी म्हणून काम केलेल्या हर्ष पोद्दार यांच्या बदलीनंतर बीड पोलिस दलाने त्यांना निरोप दिला. फुलांनी सजविलेल्या जीपमध्ये फेटा घालून हर्ष पोद्दार यांना बसविलं. जीपला दोर लावून खुद्द अधिकाऱ्यांनी जीपचं सारथ्य केलं.

अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर, स्थानिक गुन्हे शाखेचे भारत राऊत अशा अधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिली. पोद्दारांच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी केली. म्हणूनच पोद्दार यांची १४ महिन्यांची आव्हानात्मक कारकिर्द अविस्मरणीय ठरली. बीड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक म्हणून हर्ष पोद्दार यांना 14 महिन्यांचा कालावधी मिळाला. या कालावधीत त्यांनी जिल्ह्यातील गुंडागिरी मोडत काढली. अनेक आव्हानांचा त्यांनी यशस्वी सामना केला.  

मुळ बिहारचे असलेले हर्ष पोद्दार यांनी जगदविख्यात ऑक्स्फर्ड विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली होती. जगातील नामांकित क्लिफर्ड चान्स या कॉर्पोरेटलॉ फर्ममध्ये त्यांनी दीड वर्षे कार्पोरेट बॅरीस्टर म्हणूनही काम केले. महिन्याला साधारण दहा लाखांची कमाई सोडून त्यांनी भारतीय पोलिस सेवेत प्रवेश केला. पाच वर्षांपूर्वी पोलिस दलात आलेल्या हर्ष पोद्दार यांनी मालेगाव, नागपूर अशा संवेदनशिल ठिकाणी सेवा बजावल्यानंतर त्यांची मागच्या वर्षी जून महिन्यात बीडचे पोलिस अधीक्षक म्हणून नेमणूक झाली होती.

वाळूमाफिया, गुंडगिरी असलेला जिल्हा तेवढाच राजकीय संवेदनशिल देखील आहे. मात्र, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका निर्विघ्न पार पाडण्याबरोबरच या कालावधीत जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा नेत्यांची दौरे आणि सभाही झाल्या. गुंडगिरी आणि वाळू माफिया मोडीत काढण्यासाठी त्यांनी यापूर्वी कधी नव्हे तेवढ्या सव्वाशेंवर कारवाया करुन गुंडांना तडीपार, हद्दपार, स्थानबद्ध केले.

त्यांच्या अनेक उपक्रमांची देश आणि विदेशपातळीवरही दखल घेतली गेली. पोलिस दलाला फिक्की अवार्ड मिळाले. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात, यासाठी त्यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या शॉर्ट फिल्मची देशपातळीवर दखल घेतली गेली. बीड पोलिस दलाच्या उपक्रमांची जगदविख्यात ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या नियतकालिकानं दखल घेतली. बीड पोलिस दलातील श्वॉन रॉकीच्या निधनानंतर त्याच्या कामगिरीची पोलिस दलाने केलेल्या अंत्यसंस्काराची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये उल्लेख केला होता.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख