जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे झाले खुले! : IAS रेखावार यांनी उचलले पाऊल

सर्वसामान्यांना दिलासा देणार निर्णय...
जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे झाले खुले! : IAS रेखावार यांनी उचलले पाऊल
IAS Rahul Rekhawar

कोल्हापूर : सरकारी कार्यालयामध्ये साहेब भेटणे, हीच मोठी कसरत असते. त्यातही जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी कायम मिटिंगमध्ये किंवा दौऱ्यावरच असल्याचा निरोप सर्वसामान्य जनतेला कार्यालयात गेल्यानंतर मिळतो. यात कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावर (IAS Rahul Rekhawar) यांनी बदल केला असून आपल्या कार्यालयात नागरिकांना ताटकळत बसू लागू नये यासाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. चिठ्ठीविना आणि विना अपाॅईंटेमेंट नागरिकांना भेटण्याचा मार्ग खुला झाला आहे. (Kolhapur collector IAS rekhawar opens doors of office for common man )

कोल्हापूर जिल्ह्याच्या दूरच्या गावावरून आलेल्या व्यक्तीला जिल्हाधिकारी वेळेत भेटणे ही दुरापास्तच गोष्ट असते. कार्यालयाचे दारही बंद असते. कार्यालयातील मंडळी नागरिकांना साहेब मिटिंगमध्ये आहेत, असे सांगून कटविण्याचे काम अनेकदा करत असतात. त्यामुळे हेलपाटे मारण्याशिवाय नागरिकांच्या हाती काही राहत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी आता रेखावार यांनी आपले दरवाजे खुले केले आहेत. आपल्या कार्यालयाचे दोन्ही दरवाजे सताड उघडे ठेवण्याचा आदेश दिला आहे. भेटायला आलेल्या व्यक्तींना क्रमानुसार सोडण्यास सांगण्यात आले आहे.

लोकांना भेटण्यापुरतेच दरवाजे खुले झालेले नाहीत तर नागरिकांना आपले काम झाले की नाही, हे सुद्धा कळविण्याची व्यवस्था रेखावार यांनी बसवली आहे. संबंधित नागरिकाच्या अर्जावरच काम झाले नाही तर पुन्हा केव्हा भेटायचे, याची नोंद रेखावार यांनी करून दिलेली असते. त्यामुळे नागरिकांनाही एकाच कामासाठी पुन्हापुन्हा यावे लागत नाही. यासाठीचे साॅफ्टवेअरचीही व्यवस्था ते करणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आपला अर्ज, फाईल कुठे आहे, कोणत्या टेबलवर अडली आहे, याचा तपास आॅनलाईन घेता येईल. रेखावार यांनी ही पद्धत बीडचे जिल्हाधिकारी म्हणून राबवली होती. ती यशस्वी झाली होती. तशीच पद्धत आता कोल्हापूरमध्येही सुरू करणार असल्याचे त्यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.  
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in