रामदास कदमांनी आरोप केलेल्या PI पत्कींची बदली; पण नियुक्ती कोकणातच! 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या नगराध्यक्ष चषक या क्रिकेट सामन्यांच्या बॅनरवर पत्की यांचा फोटो झळकला होता.
Khed police inspector Suvarna Patki transferred to Raigad
Khed police inspector Suvarna Patki transferred to Raigad

खेड (जि. रत्नागिरी) : खेड पोलिस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यापासून नेहमीच चर्चेत राहिलेल्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची अखेर गुरुवारी (ता. 11 मार्च) रायगड येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार रामदास कदम यांनी विधान परिषदेत जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी केली होती. सदनात पत्की यांच्यावर गंभीर आरोपही केले होते. 

दरम्यान, विधान परिषदेतील चर्चेत रामदास कदम यांनी गंभीर आरोप करत पोलिस निरीक्षक पत्की यांच्या बदलीची केलेली मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मान्य केली. मात्र, त्यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यालगतच्या रायगडमध्ये करण्यात आली आहे. म्हणजेच पत्की या कोकणात कायम राहणार आहेत. 

पत्की यांच्यावरून संतापलेल्या कदम यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवरच आरोप केले होते. पत्की यांची चौकशी आमच्यातील काहींनी मध्यस्थी करून थांबवली, असे त्यांचे म्हणणे होते. 

काही दिवसांपूर्वी खेड येथील गोळीबार मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या नगराध्यक्ष चषक या क्रिकेट सामन्यांच्या बॅनरवर पत्की यांचा फोटो झळकला होता. तेव्हापासून यांच्या विरोधात वातावरण तापू लागले होते. शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी याबाबत सभागृहात छायाचित्रांकित पुरावे सादर करून खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की या शासकीय अधिकारी आहेत की कोणत्या पक्षाच्या पदाधिकारी? असा प्रश्न उपस्थित केला होता. 

पोलिस निरीक्षक पत्की यांची जिल्ह्याबाहेर बदली करून त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार कदम यांनी केली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्की यांची तत्काळ जिल्ह्याबाहेर बदली करून त्यांची चौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी (ता. 11 मार्च) ही बदली करण्यात आली. 

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना खेडमध्ये क्रिकेट सामन्यांना पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी परवानगी कशी दिली? ज्या गोळीबार मैदानात क्रिकेटचे सामने रंगले होते, त्या ठिकाणी हजारो प्रेक्षक उपस्थित होते, म्हणजे संसर्ग वाढण्याचा धोका होता. गर्दीत कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हता, सामाजिक अंतर पाळले जात नव्हते. या गर्दीत पोलिस निरीक्षक पत्की यादेखील प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या. मैदानावर हजारो लोक जमले कसे? गर्दीत तोंडाला मास्क नसताना पत्की यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असे मुद्दे कदम यांनी विधान परिषदेत उपस्थित केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com