IPS शिवदीप लांडे का म्हणतात... मी शांत आहे, व्यतिथ आहे... पण? - why IPS shivdeep lande said I am silent, hurt, but | Politics Marathi News - Sarkarnama

IPS शिवदीप लांडे का म्हणतात... मी शांत आहे, व्यतिथ आहे... पण?

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

बिहारमध्ये नाव कमावले पण महाराष्ट्रात पोस्टिंगवरून शिवदीप लांडे नाराज असल्याचा अनेकांचा तर्क

पुणे : देशभरात प्रसिद्ध असेलले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांना राज्य सरकारने दहशतवादविरोधी पथकात मुंबईत नेमणूक दिली आहे. या आधी अमलीपदार्थ विरोधी विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. 

त्यांची बदली 17 सप्टेंबर रोजी झाली. मात्र या बदलीच्या काही दिवस आधी तीन सप्टेंबर रोजी त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. मी  Maybe today I'm silent, hurt... but.. (मी सध्या शांत आहे, व्यतिथ आहे..पण) असे त्यांनी म्हटले होते. त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे दोन सप्टेंबर रोजी पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या होत्या. त्यात त्यांचे नाव नव्हते. तसेच त्यांची अपेक्षित असलेली पदोन्नीतीही झाली नव्हती. त्याचा काही संबंध होता का, असाही प्रश्न पोलिस वर्तुळात विचारला गेला होता.

या पोस्टनंतर 17 सप्टेंबर रोजी त्यांची पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आणि त्यांना मुंबईत दहशतवादविरोधी पथकात नेमण्यात आले. या कालावधीत त्यांच्या तीन सप्टेंबरच्या पोस्टवर एक हजार प्रतिक्रिया पडल्या आहेत. त्यात अनेकांनी त्या पोस्टचा संबंध बिहार आणि महाराष्ट्र यांच्यात सुशांतसिंह प्रकरणावरून सुरू असलेल्या वादाशी जोडला. लांडे यांच्याकडे तेव्हा अमलीपदार्थ विरोधी विभाग होता. त्याच वेळी केंद्राच्या अखत्यारीतील नार्कोटिक्स ब्यूरो सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीकडे चौकशी करून बाॅलीवूडमधील ड्रग कनेक्शन उघड करत होते. त्यामुळे मुंबई पोलिसांवर म्हणजे लांडे यांच्याकडे असलेल्या अमलीपदार्थ विरोधी पथकावर टीका करत होते. त्यामुळे तर लांडे यांनी ही पोस्ट लिहिली नाही ना, अशीही शंका व्यक्त होत आहे. बिहारमध्ये नाव कमावले मात्र महाराष्ट्रात जनतेशी संपर्क असलेली चांगली पोस्टिंग मिळाली नाही, याची खंत त्यांच्या मनात नाही ना, असाही तर्क बांधण्यात येत आहे.  

मूळचे महाराष्ट्रातील अकोला येथील असलेले शिवदीप लांडे हे बिहार केडरचे 2006 च्या बॅचचे अधिकारी आहेत. महाराष्ट्रात ते प्रतिनियुक्तीवर आले आहेत. त्यांना महाराष्ट्रात जनतेशी थेट संपर्क असलेल्या पदांवर जसे पोलिस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त किंवा छोट्या शहरांच्या आयुक्त पदावर नेमले जाईल, अशी चर्चा होती. मात्र त्यांना सुरवातीला अमलीपदार्थ विरोधी पथकात नेमण्यात आले. त्यांची काल तेथून बदली करण्यात आली असून दहशतवादविरोधी पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. 

लांडे यांनी बिहारमध्ये आपल्या कार्यशैलीने खळबळ उडवली होती. त्यांची पहिली पोस्टिंग हे नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे झाली होती. त्यानंतर बिहारची राजधानी असलेल्या पाटणाच्या अधीक्षकपदी नेमणूक झाली. तेथे रोडरोमियो विरोधात त्यांनी कडक कारवाई केली. अशा चुकारांना त्यांनी रस्त्यावरच बेदम चोप दिला. लाच घेणाऱ्या पोलिसाला स्वतःच वेष बदलून पकडून दिले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही त्यांना मोकळीक दिली होती. अशा अनेक बाबींमुळे ते देशभर प्रसिद्ध झाले होते. महाराष्ट्रातही अशा रीतीने त्यांना या पद्धतीने काम करता येईल, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र महाराष्ट्रात त्यांची पोस्टिंग जनतेशी थेट संपर्क असलेल्या पदांवर झाली नाही.

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे जावई असलेले लांडे गेली तीन वर्षे महाराष्ट्रात आहे. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना साधारणपणे पाच वर्षांपर्यंत आपल्या मूळ राज्यात प्रतिनियुक्तीवर जाता येते. हा कालावधी आणखी एक वर्षानेही वाढवता येतो. 

अकोला जिल्ह्यातील परसा हे त्यांचे मूळ गाव आहे. खडतर परिस्थितीतून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली. त्यानंतर त्यांची 2006 मध्ये आयपीएस म्हणून निवड झाली आणि त्यांना बिहार केडर मिळाले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख