हितेंद्र ठाकूरांविरोधात शिवधनुष्य शिवसेनेचा कोणता नेता पेलणार  - Which leader will Shiv Sena field against Hitendra Thakur in Vasai Virar | Politics Marathi News - Sarkarnama

हितेंद्र ठाकूरांविरोधात शिवधनुष्य शिवसेनेचा कोणता नेता पेलणार 

संदीप पंडित
मंगळवार, 8 जून 2021

शिवसेनेच्या ठाणे, मुंबईतील नेत्यांमुळे वसईत स्थानिक नेतृत्व उभारी घेऊ शकत नसल्याने वाढ कशी होणार?

वसई : वसई विरारमध्ये लाखोने शिवसैनिक असले तरी या सैनिकांना सांभाळणारा सरदार मात्र नसल्याने त्याचा फटका शिवसेनेला (Shiv Sena) निवडणुकीत बसत आला आहे. आज पासून अनलॉकची प्रक्रिया सुरु करताना राज्य सरकारने निवडणुका घेण्यासही सहमती दिली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी मुदत पूर्ण झाल्याने बरखास्त झालेल्या वसई विरार महापालिका निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर वसई विरार परिसरात सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला टक्कर देऊ शकेल, अशी अपेक्षा असलेल्या शिवसेनेची सध्याची संघटनात्मक स्थिती अतिशय बिकट अशीच आहे. (Which leader will Shiv Sena field against Hitendra Thakur in Vasai Virar) 

महापालिका स्थापन होऊन 10 वर्षे झाली तरी याठिकाणी स्वतंत्र जिल्हाप्रमुख देण्यात आलेला नसून येथील शिवसेनेचे भवितव्य ठाण्याच्या हातीच राहिले आहे. शहराचा कारभार ग्रामीण जिल्हा प्रमुखाच्याच हाती राहिला असल्याने येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना नवीन नेतृत्व तयार करणार का? असा प्रश्न सामान्य सैनिक करत आहेत. वसईतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडी अर्थात हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांना टक्कर देईल, असा शिवसेना हा एकमेव पक्ष होता. पण, स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद आणि तो मिटवण्यात ठाण्या, मुंबईच्या नेत्यांनी दाखवलेली अनास्था शिवसेनेची वसईत वाढ रोखण्यात कारणीभूत ठरत आहे. 

हे ही वाचा : 'अच्छे दिव आले, पेट्रोल शंभर रुपये लिटर झाले'

त्यातच ठाणे, मुंबईसह वसईतील (काही अपवाद वगळता) नेत्यांचे ठाकूरांशी असलेले संबंध आणि ठाकूरांशी असलेली उठबस शिवसेनेच्या वाढीत अडथळे ठरत आहेत. तसेच ही जवळीक शिवसैनिक आणि मतदारांमध्येही संभ्रम निर्माण करणारी ठरत असते. पालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे 3 नगरसेवक निवडून आले होते. तर शिवसेनेचे 8 जण जनआंदोलनच्या तिकिटावर निवडून आले होते. तर गेल्या निवडणुकीत शिवसेनेची वसई विरारमध्ये मोठी ताकद असतानाही 115 पैकी फक्त 5 नगरसेवक निवडून आले होते. 

विधानसभा निवडणुकीची गत वेगळीच आहे. 2009 पासून याठिकाणी शिवसेनेने पक्षातील कार्यकर्त्यापेक्षा बाहेरच्या लोकांना प्राधान्य दिल्याने निवडणुकीनंतर त्या उमेदवारांनी पक्षाकडे पाठ फिरवल्याने शिवसेना परत पाच वर्षे मागे गेली आहे. वसई, नालासोपारा, बोईसर या पालघर जिल्ह्यातील राजकारणाच्या समिकरणावर परिणाम करणाऱ्या मतदारसंघात शिवसेनेला बाहेरचे का होईनात पण तगडे उमेदवार मिळाले होते. त्यातील प्रदीप शर्मा यांचा अपवाद वगळता माजी आमदार विलास तरे आणि विजय पाटील पराभवानंतरही शिवसेनेत टिकून राहिले होते. 

पण, पक्षाने त्यांचीही कदर न केल्याने शिवसेनेच्या हातातून हे दोन नेते निसटले आहेत. तरे यांना पक्षात कोणतेही पद न देता दूरच ठेवले आहे. त्यामुळे तरे सध्या नरो वा कुंजरोवाच्या भूमिकेत आहेत. पण, महत्वाकांक्षी विजय पाटील यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेत राजकीय काम सुरुच ठेवले आहे. तरे दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले होते. मागच्या निवडणुकीत भाजपने दगा दिल्याने तरेंचा निसटतापराभव झाला. पण, त्यानंतर पक्षाने त्यांच्यासारख्या तरुण आदिवासी नेत्याला अडगळीत टाकून दिले आहे. तिच गत शिवसेनेने वसई विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर तब्बल 76 हजार 955 मते मिळवलेल्या विजय पाटील यांची केली. पाटील आगरी समाजाचे नेतृत्व करतात. वसईच्या ग्रामीण आणि शहरी भागात विजय पाटील फाउंडेशनच्यामाध्यमातून त्यांची विविध सामाजिक कार्ये सुरु असतात. पराभवानंतरही त्यांनी वसई विरार महापालिकेतून 29 गावे वगळण्याचा विषय उच्च न्यायालयात लावून धरला आहे. (Which leader will Shiv Sena field against Hitendra Thakur in Vasai Virar)

हे ही वाचा : खासदाराशी वाद वाढवून राज्यपाल पडले तोंडघशी

शिवसेनेने गावे वगळू अशी भीमगर्जना केलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः गावे वगळण्याच्या बाजूने आहेत. पण, हा प्रश्न न्यायालयात अडकल्याने त्यातून अद्याप मार्ग निघू शकलेला नाही. गावे वगळण्याचा निर्णय वसई विधानसभा मतदारसंघ आणि वसई विरार महापालिका निवडणुकीत प्रभाव पाडूशकतो. म्हणूनच पाटील यांनी हा विषय लावून धरला आहे. पण, सरकारकडून कोणतेही राजकीय पाठबळ मिळत नाही, हीखंत पाटलांसह अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांना सलत आहे. मूळचे काँग्रेसचे असलेल्या विजय पाटील यांना शिवसेना मानवली नाहीय आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये परत आले आहेत यांच्यामुळे पुन्हा उभारी घेण्याची संधी चालून आली आहे. 

हितेंद्र ठाकूर यांची राजकीय कारकिर्द काँग्रेसमधूनच सुरु झाली. 1990 च्या निवडणुकीत काँग्रेसमधून ठाकूर विधानसभेत पोचले. त्यानंतर काही वर्षातच काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर ठाकूरांनी अपक्ष म्हणून वसईत आपले पाय मजबूत रोवले. ठाकूरांनी काँग्रेस सोडल्यानंतर बहुतेक काँग्रेसजनांनी त्यांची साथ धरली. 2009 मध्ये निवडणुक न लढवलेले ठाकूर हा अपवाद वगळता वसईतून सहावेळा निवडून आले आहेत. येत्याकाही महिन्यातच वसई विरार महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात सर्वच पक्षांची ताकद दिसून येईलच. शिवसेना भीमगर्जना करण्यापलिकडे काही करीत नसल्याचेच चित्र आहे. 

शिवसेनेच्या गळाला बविआचे युवा नेते पंकज देशमुख लागले आहेत. पण, गेल्या सहा-सात महिने संघटनेत आलेल्या देशमुख यांना कोणत्याही पदाविना रखडवत ठेवले आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक आणि त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेत येऊ इच्छिणारे नाराज होऊन दूर जाण्याचीच शक्यता आहे. तरे, पाटील, देशमुख यांच्या सारख्या नेत्यांना ताकद देण्याऐवजी उदासिनता, अनास्था दाखवणाऱ्या शिवसेनेच्या ठाणे, मुंबईतील नेत्यांमुळे वसईत स्थानिक नेतृत्व उभारी घेऊ शकत नसल्याने वाढ कशी होणार? त्याच प्रमाणे स्वतंत्र जिल्हा म्हणून जिल्हाप्रमुख मातोश्री वरून कधी आदेश निघणार याची प्रतीक्षा मात्र सैनिक करत आहेत. 

 Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख