ठाण्यात शिवसेनेचा खासदार डॉक्‍टर; कंपाउंडर वाद रंगला!  - Shiv Sena MP doctor in Thane; The controversy erupted over the compounder! | Politics Marathi News - Sarkarnama

ठाण्यात शिवसेनेचा खासदार डॉक्‍टर; कंपाउंडर वाद रंगला! 

शर्मिला वाळुंज 
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डॉक्‍टरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून भारतीय जनता पक्षाकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे. राऊत यांच्या वक्तव्याचे राजकारण करत कल्याण डोंबिवलीतील भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनीही एकमेकांवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. 

ठाणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डॉक्‍टरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून भारतीय जनता पक्षाकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे. राऊत यांच्या वक्तव्याचे राजकारण करत कल्याण डोंबिवलीतील भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनीही एकमेकांवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. 

खासदार श्रीकांत शिंदे हे स्वतः डॉक्‍टर असून त्यांनी हे वक्तव्य खोटे की खरे, याविषयी खुलासा करावा अशी मागणी भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावर शिवसेनेचे नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे हे स्वतःच आमदारांचे कंपाउंडर आहेत, असे उत्तर देत सनसनीत टोला लगावला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने शहरात निवडणुकांचे वारे वाहू लागल्याचे चित्र आहे. 

कल्याण डोंबिवलीतही भाजपने सोमवारी पत्रकार परिषद घेत कल्याण डोंबिवली लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा अपमान करणारे वक्तव्य खासदार राऊत यांनी केले आहे. कोरोना संकटकाळात डॉक्‍टरांचे मनोधैर्य वाढविले पाहिजे, त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम राऊत यांनी केले आहे. कल्याण डोंबिवलीचे खासदार शिंदे हे स्वतः एक डॉक्‍टर आहेत. त्यांनी राऊत यांचे वक्तव्य खरे की खोटे याचा खुलासा करावा अशी मागणी केली. 

यावर शिवसेनेचे नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी त्यांच्या मागणीला प्रतिउत्तर देताना कांबळे यांना सणसणीत टोला लगावला. शशिकांत कांबळे हे स्वतःच आमदारांचे कंपाउंडर आहेत. आमदारांपर्यंत कोणती गोष्ट पोचवायची असेल तर पहिले त्यांच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींनाच ती माहिती द्यावी लागते. संजय राऊत यांना अनुभवासंदर्भात बोलायचे होते, डॉक्‍टरांच्या सान्निध्यात राहून त्यांना अनुभव येत असतात. परंतू या गोष्टीचे काही लोक राजकारण करीत आहेत. या गोष्टीचे राजकारणच करायचे असेल तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही म्हात्रे यांनी दिला. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आरोप प्रत्यारोपाचा फैरी झडू लागल्या आहेत. एकीकडे शहरातील विकासकामे अर्धवट स्थितीत आहेत, तर कचरा, रस्ते, पाणी, वीज या समस्याही मोठ्या प्रमाणात नागरिकांना भेडसावत आहेत. 

या समस्यांकडे मात्र काणाडोळा करीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच कल्याण डोंबिवलीत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते धन्यता मानत आहेत. कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, तर आता राऊत यांच्या वक्तव्यावरुन भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. 

Edited By Vijay Dudhale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख