बेशिस्त कार्यकर्त्यांची जितेंद्र आव्हाडांनी केली खरडपट्टी  - Jitendra Awhad held a meeting of NCP activists in Bhiwandi | Politics Marathi News - Sarkarnama

बेशिस्त कार्यकर्त्यांची जितेंद्र आव्हाडांनी केली खरडपट्टी 

शरद भसाळे 
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

सत्य स्वीकारायला शिका, म्हणजे पुढे जाऊन त्रास होत नाही.

भिवंडी : राष्ट्रवादी कॉंग्रेस हा शिस्तीने चालणार पक्ष आहे. पक्षात कार्यकर्ते कमी असले तरी चालतील; पण ते निष्ठावंत असावेत. त्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांचा बेशिस्तपणा, गटबाजी यासारखे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड दम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यांनी भिवंडीत झालेल्या कार्यक्रमात दिला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भिवंडी जिल्हा शाखेच्या वतीने शनिवारी सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी माजी खासदार आनंद परांजपे, पक्षाचे शहराध्यक्ष भगवान टावरे, माहिलाध्यक्ष स्वाती कांबळे, ऍड. सुनील पाटील, वसीम खान आदी उपस्थित होते. 

कार्यकर्त्यांच्या बेशिस्तपणामुळे स्टेजवर गर्दी आणि समोर खुर्च्या रिकाम्या हे चित्र समाधानकारक नसल्याचे सांगून आव्हाड यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. 

मंत्री आव्हाड म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. फक्त बोलून पक्ष वाढत नाही. पक्षाची संघटना भिवंडीत कमजोर आहे. सत्य स्वीकारायला शिका, म्हणजे पुढे जाऊन त्रास होत नाही. गटबाजी कमी करा; पक्षाला ताकद द्या. कोणी कोठे ही जाऊद्या. जोपर्यंत पक्षाचे काम करतोय तो आपला, जो पक्षाशी गद्दारी करेल त्याला बाहेरचा रस्ता दाखवू, असा इशारा त्यांनी या वेळी गटबाजी करणाऱ्यांना दिला. 

"पक्षाचा सन्मान वाढविणे हे सर्वांचे काम आहे. मी बेशिस्तपणा सहन करणार नाही,' असा सज्जड दम जितेंद्र आव्हाड यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिला. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी भिवंडीचे शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी प्रास्ताविकात भिवंडी शहरात पक्ष बांधणी करत असताना विविध धर्मीय नागरीकांना विविध पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षात स्थान देत पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत आहे. शहरात जनाधार वाढत असल्याचा दावा केला होता. सरचिटणीस ऍड सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख