जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आणि अविनाश जाधव यांनी घेतला हा निर्णय - jitendra avhad with pratap saranaik take this decision on Dahihandi | Politics Marathi News - Sarkarnama

जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आणि अविनाश जाधव यांनी घेतला हा निर्णय

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

कोरोनाच्या संकटामुळे ठाण्यातील दहीहंडी उत्सव रद्द 

ठाणे : नऊ मानवी थराच्या मनोऱ्याचे विक्रम, गोविंदा पथकांवर विक्रमी बक्षिसांची उधळण यामुळे ठाण्याने दहीहंडी उत्सवाला वेगळेच ग्लॅमर मिळवून दिले आहे. गेल्या वर्षी राज्यात उद्‌भवलेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंडळांनी साधेपणाने दहीहंडी साजरी केली; तर या वर्षी कोरोनाचे संकट कोसळल्याने ठाण्यातील मानाच्या दहीहंडी आयोजकांनी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोजकांनी या उत्सवाऐवजी आरोग्य व्यवस्थेस मदत करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे मंडळांनीही स्वागत होत आहे.

ठाण्यातील टेंभी नाका येथे शिवसेना पुरस्कृत दहीहंडी ही मानाची हंडी समजली जाते. दिवंगत आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या उत्सवाकडे मुंबईकर गोविंदा आकर्षित झाले आणि त्यानंतर ठाणे ही दहीहंडीची नगरी म्हणून उदयास आली. या वर्षी केवळ श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार असून मोठा उत्सव साजरा होणार नसल्याचे संयोजक नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी सांगितले. संघर्ष प्रतिष्ठानचे जितेंद्र आव्हाड यांचा दहीहंडी उत्सवही रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

संस्कृती युवा प्रतिष्ठाननेही सध्याची परिस्थिती लक्षात घेत प्रत्येकाच्या आरोग्याच्या व समाजाच्या दृष्टीने दहीहंडी उत्सव रद्द करणे योग्य असल्याचे सांगत जून महिन्यात याबाबतची घोषणा केली. विविध प्रकारची पारितोषिके तसेच इतर नियोजनापोटी होणारा खर्च कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका तसेच इतर उपाययोजनांसाठी वापरणार असल्याचे आयोजक प्रताप सरनाईक यांनी सांगितले. राज्य सरकारच्या आवाहनानुसार स्वामी प्रतिष्ठानचे शिवाजी शेलार यांनीही यंदाचा दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाईल असे सांगत, उत्सवासाठी लागणारा खर्च हा कोरोना विरोधातील लढाईसाठी पंतप्रधान कल्याण निधी आणि मुख्यमंत्री कल्याण निधी यांच्याकडे सुपूर्द केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संकल्प प्रतिष्ठानचे रवींद्र फाटक यांनीही दहीहंडी उत्सव रद्द केला असून यासाठीचा निधी हा कोरोना संकटकाळात आरोग्य व्यवस्थेसाठी दिला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून रघुनाथ नगरातील संकल्प चौक येथे आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान, प्लाझ्मा दान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पाठक यांनी दिली.

मनसेचे "सणांचे पैसे सणांसाठी'
मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी "सणांचे पैसे सणांसाठी' असे सांगून या वर्षी दहीहंडी उत्सव रद्द केल्याचे सांगितले. या उत्सवासाठी लागणारा निधी हा कोकणात गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. मनसेच्या वतीने कोकणवासीयांसाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख