रिमोट ही आमची वडिलोपार्जित देणगी आहे, तो मी हातातला सोडत नाही

व्यासपीठावरील मान्यवरांसह मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.
Inauguration of Oxygen Plant at Thane by Chief Minister Thackeray
Inauguration of Oxygen Plant at Thane by Chief Minister Thackeray

ठाणे : ठाणे शहरासाठी उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या वेळी बोलताना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाकरे यांना, ‘आपण ठाण्यातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करावे,’ अशी विनंती करत ‘साहेब, रिमोट आहे ना समोर,’ अशी विचारणा मुख्यमंत्र्यांना केली. त्यावेळी ठाकरे यांनी, ‘मी हातातला रिमोट सोडत नाही. रिमोट ही आमची वडिलोपार्जित देणगी आहे,’ असे उत्तर दिले आणि व्यासपीठावरील मान्यवरांसह मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या विधानाने १९९५ मधील युतीच्या सरकारचा रिमोट बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात होता, या गोष्टीला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. (Inauguration of Oxygen Plant at Thane by Chief Minister Thackeray)

प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. त्याचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मीरा भाईंदर शहरातही सरनाईक यांच्या माध्यातून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आलेला आहे.  

या वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. ऑक्सिजन, कार्डियाक रुग्णवाहिका, कर्करुग्णनिदान लोकांना २४ तास सुविधा उपलब्ध असणार आहे. कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या शिवसैनिकांना आर्थिक मदतही आमदार सरनाईक यांच्या वतीने देण्यात आली.

ठाणे शहरात काही पादचारी पूल आम्ही मंजूर केले आहेत. पण त्याचे काम निधीअभावी अजून चालू झालेले नाही. तलावाचे सुशोभीकरण रखडलेले आहे. राज्य सरकारकडून आम्हाला निधी मिळावा, अशी मागणी आमदार सरनाईक यांनी केली.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दुसऱ्या लाटेच्या वेळी नेहमीपेक्षा दुप्पटीने ऑक्सिजन लागत होता. एकदा ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवणारा टँकर येऊ शकत नव्हता. ऑक्सिजनअभावी रुग्णालयातील ४०० ते ४५० रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. अशा परिस्थितीत नियोजन करून टँकर आणला आणि रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले. अधिकाऱ्यांबरोबर खटके उडत होते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आम्ही नेहमी त्रास द्यायचो.
 
हेही वाचा : महिला अतिरिक्त आयुक्तांवर कोयत्याने हल्ला; कडक कारवाईचे आदेश

ऑक्सिजन प्लांट उभारण्याची गरज ओळखून महापालिकेच्या वतीने प्लांट उभारण्यात आले. महापालिका आणि राज्य सरकारच्या वतीने ही सेवा देण्यात येत आहे. पण आमदार सरनाईक यांनी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिरा भाईंदर आणि ठाणे शहरात दोन ऑक्सिजन प्लांट उभारले आहेत. पंधरा ऑगस्टनंतर कोरोनाची संख्या वाढत आहे. ही चिंतेची गोष्ट आहे. नाइलास्ताव काही निर्णय घ्यावे लागतील. टास्क फोर्सने जे सांगितले आहे, त्याचे पालन आपण केले पाहिजे, असेही शिंदे यांनी आवाहन केले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, दहीहंडी उत्सव आणि उत्साहाला कोरोनामुळे मुकलो आहोत. दहीहंडीचे थरार, उधाण काय असतो, ते मी ठाण्यात येऊन अनुभवलेले आहे. अनेक जण तारीख पे तारीख देतात. पण करत तर काहीच नाहीत. पण तुम्ही घेतलेल्या तारखेवर जनतेच्या उपयोगाचा प्राणवायूचा प्रकल्प सुरू केला आहे. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही शिवसेनेचे ब्रीद आहे. पण काही जण कोरोनाचा धोका व्यक्त होऊनही यात्रा काढत आहेत. पण, तुम्ही जनतेच्या उपयोगाची कामे करतात, त्याबद्दल तुम्हाला अनुभव देतो.

ठाणे महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचाराला मी बाळासाहेबांसोबत आलो होतो. त्यावेळी बैलगाडीतून प्रचार केला जायचा. तेव्हापासून मी ठाण्यात येत आहे. काहीजण कोरोनाचे निमय तोडून आम्ही करून दाखवलं असे सांगत आहे. पण, तुम्हाला आंदोलन करायचे आहे, तर कोरोनाविरोधात आंदोलन करा. रुग्णवाहिका द्या, ऑक्सिजन प्लांट उभारा. पण, ते करण्याची तुमची हिम्मत आणि कुवती नाही. तेवढी प्रगल्भताही तुमच्याकडे नाही. आम्हाला फक्त रस्त्यावर गोंधळ घालायचा आहे आणि जे शिस्त पाळणारे नागरिक आहेत, त्यांचाही जीव कारण नसताना धोक्यात घालण्याचे काम काहीजण बेजाबदारपणे करत आहेत. त्यांच्याबाबत मला काहीही बोलायचे नाही, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com