राष्ट्रवादीत कोण येणार, कोण जाणार या चर्चेमध्ये मी नाही : जितेंद्र आव्हाड - I am not in the discussion of who will come and who will go in NCP: Jitendra Awhad | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीत कोण येणार, कोण जाणार या चर्चेमध्ये मी नाही : जितेंद्र आव्हाड

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन डॉ. आव्हाड यांनी कोरोनामुक्तीसाठी काही सूचना केल्या.

ठाणे : आम्ही केलेले नियोजन, पालकमंत्री एकनाथ शिंदे, डॉक्‍टर, पालिका अधिकारी यांच्या मेहनतीमुळेच मुंब्रा आज कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. पण हे वातावरण फक्त मुंब्य्रापुरतेच मर्यादित न राहता सबंध महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हावा, अशी अपेक्षा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. 

ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन डॉ. आव्हाड यांनी कोरोनामुक्तीसाठी काही सूचना केल्या. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता, आव्हाड यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.

 आव्हाड म्हणाले की, जेव्हा गावभर बाजार भरत होते, तेव्हा सर्वच माध्यमांनी मुंब्य्राचा बाजार दाखवून हा रोग मुंब्रा येथूनच जास्त पसरणार, अशी महाराष्ट्रभर चर्चा निर्माण केली. आज महाराष्ट्रातील असे पहिले शहर आहे की तिथे शून्य रुग्ण आहेत; ते शहर म्हणजे मुंब्रा. गेले 15 दिवस मुंब्रा भागात कोरोना रुग्णांची एक आकडी संख्या होती. आता मुंब्रा कोरोनामुक्त झाले आहे. एकंदरीतच ठाण्यातील रुग्णसंख्या आहे, ती हळूहळू कमी होत चालली आहे. हे आनंदाचे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण व्हायला हवे. एकट्या मुंब्य्रापुरते ते मर्यादीत नसावे. यासाठीच आपण पालिका आयुक्तांची भेट घेतल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

ज्या गोष्टी मुंब्रा भागात केल्या त्या सबंध ठाणे शहरात केल्या पाहिजेत. मुंब्रा कोरोनामुक्त करण्यात स्थानिक डॉक्‍टर, पालिका अधिकारी, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मेहनत दुर्लक्षून चालणार नाही. एकंदरीतच सर्व सामूहिक प्रयत्नातूनच मुंब्रा कोरोनामुक्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.

संकटात राजकारण मान्य नाही
भाजपमधील आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, कोण येणार, कोण जाणार या चर्चेमध्ये मी नाही; तसे राजकारण मला मान्य नाही. कोरोना लवकर जावा, यासाठी काम करणारा मी आमदार-मंत्री आहे. माझ्या दृष्टीने आजच्या घडीला प्राधान्याने कोरोनामुक्तीवर अन्‌ कोरोनाबाधित रुग्ण वाचविण्यावर लक्ष द्यायला हवे. अशा संकट प्रसंगी राजकारण करावे, याच्यासारखी हीन प्रवृत्ती दुसरी असूच शकत नाही.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख