सौम्य वाटणारे उद्धव ठाकरे म्हणाले, 'वेळ पडल्यावर मी इंजेक्‍शनही देतो'  - I also give injections when the time comes : Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

सौम्य वाटणारे उद्धव ठाकरे म्हणाले, 'वेळ पडल्यावर मी इंजेक्‍शनही देतो' 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

भिवंडीचे भारतीय जनता पक्षाचे खासदार कपिल पाटील यांनी, "डॉक्‍टर अधिक मदत करतात, हे माहीत असते तर एमबीबीएस होऊन लोकप्रतिनिधी झालो असतो' असे उत्तर दिले. 

कल्याण : कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे पेशाने डॉक्‍टर असल्याने कोरोना काळात त्यांची आम्हाला अधिक मदत झाली, असे वक्तव्य कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे यांनी केले. त्या वाक्‍यावर शिवसेना आणि भाजपमधील लोकप्रतिनिधींमध्ये चांगलेच शाब्दिक फटाके वाजले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही "वेळ पडल्यावर मी इंजेक्‍शन देतो' असे खुसखुशीत भाष्य करत एक वेगळाच तडका दिला. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील लाल चौकी परिसरात कोविड समर्पित रुग्णालयाचे व्हर्चुअल पद्धतीने उद्‌घाटन झाले. त्या प्रसंगी "राजकीय आतषबाजी' पहायला मिळाली. महापौर विनिता राणे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक करताना ते पेशाने डॉक्‍टर असल्याने अधिक मदत झाल्याचे सांगितले. त्यावर भिवंडीचे भारतीय जनता पक्षाचे खासदार कपिल पाटील यांनी, "डॉक्‍टर अधिक मदत करतात, हे माहीत असते तर एमबीबीएस होऊन लोकप्रतिनिधी झालो असतो' असे उत्तर दिले. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात महापौरांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. "पेशाने डॉक्‍टर असल्याने लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमध्ये अधिक फायदा झाला' असा महापौरांच्या बोलण्याचा अर्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या सर्वावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी कडी केली. "मी डॉक्‍टर नाही, मात्र वेळ पडल्यावर इंजेक्‍शन देतो' असे ते म्हणाले. 

असेच संपर्कात राहा 

ग्रामीण भागातील अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे अत्यवस्थ रुग्णांना ठाणे महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी आपल्याला पालक मंत्री एकनाथ शिंदे यांची नेहमीच मदत झाली, असे भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी सांगितले. आपण कायम त्यांच्या संपर्कात असल्याचेही पाटील म्हणाले.

आपण संपर्कात आहात, तसेच राहा. कधी तरी उपयोगात येईल, असे हसत हसत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या खासदारांना सल्ला दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख