कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफर हुसेन यांना कोरोना  - Congress state working president Muzaffar Hussain infected with corona | Politics Marathi News - Sarkarnama

कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफर हुसेन यांना कोरोना 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 6 सप्टेंबर 2020

कार्याध्यक्ष मुझफर हुसेन सध्या कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी राज्यभर फिरत आहेत.

विरार : कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफर हुसेन यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सध्या ते घरीच क्वारंटाईन झाले आहेत. गेल्या सात दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोविडची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन हुसेन यांनी केले आहे. 

कार्याध्यक्ष मुझफर हुसेन सध्या कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी राज्यभर फिरत आहेत. जूनपासून त्यांचे जिल्हानिहाय दौरे सुरु होते. त्यात त्यांनी आतापर्यंत पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे आणि नाशिक येथे दौरा करून त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. यात त्यांनी जिल्हा, तालुकापासून त्या ठिकाणच्या काही गावांनाही भेटी देऊन पक्ष वाढीसाठी बैठका घेतल्या आहेत. 

मीरा भाईंदर परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक हरिचंद्र आमगावकर, पत्रकार यतीन गोलतकर यांचा मृत्यू झाला आहे. माजी उपमहापौर चंद्रकांत वैती, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांच्यासह अनेक नगरसेवकांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. 

हेही वाचा : कोरोनाप्रश्‍नी सरकारला धारेवर धरणार : प्रवीण दरेकर 

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत सरकारला आलेले अपयश, पूरग्रस्तांचे प्रश्‍न तसेच बिघडलेली कायदा व सुव्यवस्था या मुद्द्यांवर उद्यापासून (ता. 7 सप्टेंबर ) सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारला धारेवर धरले जाईल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (ता. 6 सप्टेंबर) येथे सांगितले. 

कोरोना महामारीमुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अल्पकालीन असणार आहे. हे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्यात विरोधी पक्षांच्या रणनीतीबाबत प्रवीण दरेकर यांनी माहिती दिली. 

कोरोनाशी लढा देण्याबाबत तसेच राज्यासमोरील अन्य प्रश्‍नांसंदर्भात आपण तसेच माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना सूचना करणारी अडीचशे पत्रे लिहिली; मात्र त्याचे साधे उत्तरही आले नाही. आता कोरोनाचे अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार सुशांतसिंह राजपूत व अन्य भावनिक विषयांचा आधार घेत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

अधिवेशनात किती वेळ मिळेल आणि कोणत्या माध्यमातून सरकारला धारेवर धरता येईल, ते अजून नक्की नाही. मात्र, जेवढा वेळ मिळेल तेवढ्या काळात सरकारला धारेवर धरू. कोरोनाशी लढा, कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या लोकांना मदत देण्याचा प्रश्‍न, कोकणपट्टीतील वादळग्रस्त मच्छीमार तसेच राज्यातील पूरग्रस्त आदींना नुकसानभरपाई देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. 

कोरोनाग्रस्तांची संख्या भयावह वाढते आहे. या मुख्य मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष उडविण्यासाठी सुशांतसिंह, कंगना रनौट तसेच अन्य भावनिक मुद्द्यांवर सरकार जोर लावत आहे, अशी टीकाही प्रवीण दरेकर यांनी या वेळी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख