काँग्रेसला मोठा झटका : माजी शहराध्यक्षाचा राष्ट्रवादीत प्रवेश; १० नगरसेवकही हाती घड्याळ बांधणार 

हा काँग्रेस पक्षाला मोठा झटका मानला जात असून आठ महिन्यांपूर्वी पक्षाच्या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
Congress Bhiwandi city president Shoaib Khan joins NCP
Congress Bhiwandi city president Shoaib Khan joins NCP

भिवंडी : काँग्रेसच्या भिवंडी शहराध्यक्षपदावरून दूर केल्यामुळे नाराज झालेले शोएब गुड्डू खान यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून भिवंडीत काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा खिंडार पाडले आहे. त्यामुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हा काँग्रेस पक्षाला मोठा झटका मानला जात असून आठ महिन्यांपूर्वी पक्षाच्या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर शोएब खान यांच्या पक्षांतरामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसला फटका बसू शकतो. (Congress Bhiwandi city president Shoaib Khan joins NCP) 

शोएब खान यांचे समर्थक असलेले काँग्रेसचे 10 नगरसेवक आणि पदाधिकारीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, असे खान यांच्या गोटातून सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही समयसूचकता दाखवत शोएब खान यांची आज तातडीने दखल घेत भिवंडी शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून काँग्रेसला जोरदार दणका दिला आहे.

शोएब खान हे काँग्रेस पक्षाचे भिवंडी शहर जिल्हाध्यक्षपदावर कार्यरत असताना अचानकपणे प्रदेश काँग्रेसने त्यांची शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी केली.  त्यांच्या जागी काँग्रेसचे माजी आमदार रशिद ताहीर मोमीन यांची निवड करण्यात आली, त्यामुळे काँग्रेस पक्षात गटबाजीला उधाण आले होते. रशिद ताहीर मोमीन यांना तातडीने अध्यक्षपदावरून दूर करावे, यासाठी शोएब खान यांनी आपल्या समर्थकासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची काही दिवसांपूर्वी भेट घेऊन तक्रारपवजा निवेदन दिले होते. मात्र, त्यांनी त्यांच्या सर्व निवेदनपत्रांना केराची टोपली दाखवल्याने शोएब खान व त्यांचे समर्थक तीव्र नाराज झाले होते. 

अखेर शोएब खान यांनी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. ही सर्व माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मिळताच त्यांनी काँग्रेस पक्षाला शह देण्यासाठी शोएब खान यांची थेट भिवंडी शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. या घटनेमुळे भिवंडी काँग्रेस पक्षात एकच खळबळ उडाली आहे. 

शोएब खान यांचे समर्थक असलेले काँग्रेसचे 10 नगरसेवक काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शोएब खान यांना बळ देण्यासाठी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे खान यांच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे 47 नगरसेवक आहेत, त्यापैकी अठरा (18) नगरसेवकांनी दोन वर्षांपूर्वी महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करून कोनार्क विकास आघाडीस मतदान केले होते. त्यामुळे या नगरसेवकांचे पद रद्द करावे, अशी मागणी माजी महापौर जावेद दळवी यांनी केली आहे, त्यामुळे नाराज झालेल्या 18 नगरसेवकांनी आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा काँग्रेसचे10 नगरसेवक व काही पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे भिवंडीत काँग्रेसला मोठे भगदाड पडण्याची चर्चा रंगू लागली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com