तो भीषण आवाज ऐकून घराबाहेरच थांबले असते तर ४५ जीव वाचले असते... - then all the citizens of Taliye village would have survived | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

तो भीषण आवाज ऐकून घराबाहेरच थांबले असते तर ४५ जीव वाचले असते...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 24 जुलै 2021

दरड कोसळण्यापूर्वी तळीये गावात जमिनीतून आवाज येत होता.

महाड : दरड कोसळण्यापूर्वी दुर्घटनेचे काही संकेत मिळाले होते. जमिनीतून आवाज येऊ लागल्यानंतर ग्रामस्थ बाहेर आले. त्यानंतर ते सगळे एकत्र आले. या वेळीच सतर्क होत त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असते, तर अनेक जण वाचले असते. मी, सासू, सासरे, मुलगी आणि नवरा थोडक्यात बचावलो, ही कृपाच आहे; परंतु आमचे आप्तस्वकीय यामध्ये आम्ही गमावले, हे आमच्यासाठी मोठे दु:खद आहे, असे सांगताना प्रत्यक्षदर्शी आणि तळीये गावातील रहिवाशी प्रतिभा नीलेश कोंढाळकर यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. (.... then all the citizens of Taliye village would have survived)

महाड तालुक्यातील तळीये गावावर गुरुवारी (ता. २२ जुलै) संध्याकाळी दरडीच्या रूपाने काळाने झडप घातली. डोंगरकुशीत वसलेले हे ३० उंबरठ्यांचे गाव काही मिनिटांतच नकाशावरून जणू नष्ट झाले. गावातील ४० पेक्षा अधिक जणांचे मृतदेह या मातीच्या ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहेत; तर आणखी किमान ५० जण बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. या संकटात कुणी आई गमावली आहे, तर कुणी वडील. हे दुःख सांगताना नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. गाव दरडीखाली गाडले गेले हे समजल्यावर मनाचा थरकाप उडाला, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा : `तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ`

गावाच्या शेजारच्या वाडीतील जीत झिंजे यांनी सांगितले की, तळीये वाडीतील दरड कोसळत असताना मोठा आवाज झाला. सायंकाळची घटना होती. पाऊस कोसळत होता. पुन्हा दरड कोसळण्याच्या भीतीने कुणीही पुढे येत नव्हते. या दरडीची दहशत आमच्यामध्ये बसली होती, असेही झिंजे यांनी सांगितले.

आमचे पूर्ण कुटुंब या संकटात सापडले. आई-वडील, भाऊ आणि दोन लहान बहिणी असे पाच जण बेपत्ता आहेत. दरड कोसळल्याची घटना समजल्यानंतर रात्री पुणे येथून तातडीने गावात आलो. येथे आल्यानंतर मनाचा थरकाप उडवणारे दृश्‍य पाहून सुन्न झालोय. काय बोलावे हे सुचत नाही, असे सांगताना सुनील कोंढाळकर या तरुणाने अक्षरश: हंबरडा फोडला.

प्रदीप गायकवाड या ग्रामस्थाच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या. त्यांनी सांगितले की, आम्ही घरामध्ये पाच जण आहोत. मी मुंबईत होतो; पण त्याच्या नियमित संपर्कात होतो. चुलत भाऊ आणि त्याची पत्नी गावातच होती. ते आमच्या शेतीपासून सगळ्या कामाला मदत करत होते. दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे कुटुंबीयांबरोबर संपर्क होत नव्हता. तळीये गावावर दरड कोसळली, ही बातमी समजली. त्यानंतर तातडीने गाव गाठले. गावात येण्यापूर्वीच गावावर कोसळलेल्या संकटाची माहिती मिळाली. पूर्ण कुटुंब गावावर दरड कोसळली, हा नियतीने केलेला मोठा घात आहे. सरकारने वेळेवर उपाय योजना केल्या असत्या, तर अनेकांचे प्राण वाचले असते, असेही त्यांनी सांगितले.

दरडग्रस्तांच्या प्रत्येक नातेवाईकांनीही गायकवाड यांच्यासारख्याच भावना व्यक्त केल्या. दरडीसारख्या घटना टाळण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे आवश्‍यक आहे; अन्यथा अशा घटनांची मालिका कायम राहील, असे त्यांचे म्हणणे होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख