भाजप नेते, झेडपीच्या माजी उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश  - Raigad Zilla Parishad vice president Sanjay Jambhale joins Shiv Sena-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

भाजप नेते, झेडपीच्या माजी उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 जुलै 2021

पहिला मासा संजय जांभळे यांच्या रूपाने शिवसेनेच्या गळाला लागला आहे.

रायगड : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. शिवसेनेचे अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत जांभळे यांनी शिवबंधन हाती बांधत स्वगृही परतले आहेत. जांभळे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाने पेण तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. (Raigad Zilla Parishad vice president Sanjay Jambhale joins Shiv Sena)

जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने शिवसंपर्क अभियान राज्यभरात सुरू केले आहे. त्या अंतर्गत रायगड जिल्ह्यात या अभियानांतर्गत पहिला मासा संजय जांभळे यांच्या रूपाने शिवसेनेच्या गळाला लागला आहे. अलिबागच्या चाळमळा येथील आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. 

हेही वाचा : पुणे महानगर नियोजन समितीवर शेळके, जगताप, बारणे  

संजय जांभळे आणि त्यांची पत्नी हे दोघे 2007 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. संजय जांभळे हे त्यावेळी अडीच वर्ष जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्या पदासोबत त्यांच्याकडे अर्थ आणि बांधकाम सभापतिपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. मात्र, पक्षात झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही त्यांनी सोडचिठ्ठी देऊन 2018 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपचे उमेदवार रवींद्र पाटील हे विधानसभेत जिंकून येण्यात जांभळे यांचा मोठा हातभार होता. आता रायगड जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संजय जांभळे यांनी भाजपला रामराम केला असून पुन्हा स्वगृही शिवसेनेत येऊन हाती शिवबंधन बांधले आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशाने पेण तालुक्यात शिवसेना पक्ष बळकट होण्यास मदत होणार आहे.

शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख आमदार महेंद्र दळवी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेश गावड, शिवसेना पेण तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. 20 जुलै) जांभळे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना संजय जांभळे यांनी सांगितले की, शिवसेनेमध्ये सामान्य शिवसैनिक म्हणून काम करताना पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील, ती मी आगामी काळात संभाळणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख