तळीयेत ४२ जणांचे मृतदेह सापडले; अद्यापही ४१ जण बेपत्ता

दरडकोसळल्यानंतर प्रशासनाला मदत कार्य पोचविण्यात तब्बल 20 तास लागले होते.
तळीयेत ४२ जणांचे मृतदेह सापडले; अद्यापही ४१ जण बेपत्ता
42 bodies found in Taliye village; 41 still missing

अलिबाग : निसर्गचा प्रकोप झालेल्या महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी या गावातील 42 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे, तर अद्याप 41 लोक ढिगाऱ्याखाली गाढले गेले असावेत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. शनिवारी सकाळी शोधकार्य सुरु झाल्यानंतर दिवसभरात एकूण 9 मृतदेह शोधण्यात आले. ही घटना दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची पहाणी करताना म्हटले आहे. (42 bodies found in Taliye village; 41 still missing)

एकूण 250 लोकवस्तीच्या महसुली गावात 35 घरे आहेत. गावात कोंढाळकर धुमाळ, पोळ, शिरावळे, पांडे, मालुसरे अशी 35 कुटुंब गावात राहतात, डोंगराच्या अगदी कडेला असलेल्या या गावातील बहुताश लोक नोकरी धंद्यानिमित्ताने मुंबई, पुणे, सुरत या शहरांमध्ये राहतात. गावात फक्त वयोवृद्ध, लहान मुले राहतात. गुरुवारी ही घटना घडताना गावात साधारण 80 लोक होती, यातील पाचजण वाचले आहेत. बाकीच्या नागरिकांवर निसर्गाने झडप घेतली आहे.

दरड गुरुवारी (ता. २२ जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास कोसळल्यानंतर प्रशासनाला मदत कार्य पोचविण्यात तब्बल 20 तास लागले होते. प्रशासनाने उशिराने दखल घेतल्यामुळे मृतांची संख्या वाढत असून ही संख्या आता 42 पर्यंत गेली आहे, बेपत्ता असणारे जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याने प्रशासनाच्या विरोधात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांचा संताप उफाळून आला होता. प्रशासनाने वेळेत मतदकार्य पोहचवले असते तर मृतांची संख्या कमी करता आली असती असे, येथील नागरिकांचे म्हणणे आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या गावाला भेट देत मृत्यूमुखी पडलेल्यांना धीर दिला. सायंकाळी 6.00 नंतर बचावकार्य थांबवण्यात आल्याची माहिती महाडचे प्रांताधिकाऱी विठ्ठल इनामदार यांनी माहिती दिली. दरडग्रस्तांचे नातेवाईक मुंबई, पुणे, सुरत येथून आपल्या नातेवाईकांची चौकशी करु लागले आहेत. त्यांना माहिती देण्यासाठी येथे संपर्क कक्ष सुरु करण्यात आले असले तरी प्रशासनाकडूनही नातेवाईकांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मृतांवर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत. 

महसूल विभागाचे अधिकारी मृत्युमुखी पडलेल्या वारसांची माहिती, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. मृतांचे पंचनामे करण्याचे सोपस्कर रात्रीपर्यंत संपतील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली आहे. त्यानंतर मृतांचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in