शिवसेनेकडून नव्या मैत्रीचे संकेत; राष्ट्रवादीचा सावध पवित्रा....

पंचवीस वर्षांची शिवसेनेची मक्तेदारी मोडीत काढली होती.
Possibility of Shiv Sena-PWP alliance in Khalapur
Possibility of Shiv Sena-PWP alliance in Khalapur

खालापूर : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणूक मोर्चेबांधणीला खालापुरात वेग आला असून राजकीय पक्षाच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असलेला शेतकरी कामगार पक्ष आगामी निवडणुकीत शिवसेनेबरोबर आघाडी करण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून नव्या मैत्रीचे संकेत मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सावध झाला असून इतर पक्षांची मोट बांधण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. (Possibility of Shiv Sena-PWP alliance in Khalapur) 

खालापुरात जिल्हा परिषदेचे चार गट आणि आठ पंचायत समिती गण अशी रचना आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस आघाडीने खालापूरात शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. आघाडीने प्रथमच खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चारपैकी तीन गटांत विजय मिळवला, तर पंचायत समितीच्या 8 पैकी 5 जागा आघाडीने जिंकत पंचवीस वर्षांची शिवसेनेची मक्तेदारी मोडीत काढली होती. शिवसैनिकांसाठी हा मोठा धक्का होता, तर आघाडीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रूपाने सत्तेची फळे चाखता आली. 

शिवसेना पाच वर्षांपूर्वी खालापूर तालुक्यात स्वबळावर निवडणूक लढली होती. चार जिल्हा परिषद गटात शिवसेनेला 32 हजार 965 मते मिळाली होती, तर आघाडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस तीन पक्षांची मिळून 34 हजार 956 मते होती. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तीन जागी विजय मिळाला, तर एका जागी शेकाप उमेदवाराचा पराभव झाला होता. वडगाव, साजगाव आणि वासांबे गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते, तर चौक गट ठोंबरे बंधूंच्या करिश्माने शिवसेनेच्या ताब्यात राहिला होता. 

गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेनेला महेंद्र थोरवे यांच्या रुपाने आक्रमक आमदार मिळाला आहे. त्यानंतर तालुक्यात शिवसेनेचा दरारा वाढला आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी जरी एकत्र असली तरी खालापूर तालुक्यात मात्र चित्र वेगळे दिसणार आहे. तालुक्यात शिवसेना या वेळी शेकापला सोबत घेऊन लढण्याची दाट शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम आघाडीवर होणार आहे. शिवसेनेकडे अधिक असलेली भक्कम मतांची बेगमी आणि त्यात मिळालेली शेकापची रसद यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना तालुक्यात पुन्हा नंबर एकच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. 

जिल्हा परिषदेचा ‘चौक’चा गड शाबूत ठेवताना साजगाव, वडगाव आणि वासांबे या ठिकाणी शिवसेनेची असलेली ताकद यामुळे राष्ट्रवादीला ही निवडणूक जड जाणार आहे. त्यातच शिवसेनेत खांदेपालट मोठ्या प्रमाणात होणार आहे. तालुकाप्रमुखपदाची धुरा कट्टर आणि उत्तम जनसंपर्क  असलेल्या श्याम साळवी यांच्या खांद्यावर देण्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेस पक्षाची मर्यादित ताकद वासंबे गटात आहे. शिवसेना आणि शेकापची सोयरीक तालुक्यातील राजकारणावर मोठा परिणाम करणारी आणि उलथापालथ करणारी ठरणार आहे. याची जाणीव झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्या दृष्टीने हालचाली करण्यास सुरुवात केली असून इतर पक्षांशी मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com