मिरा-भाईंदर पालिकेची सभा अखेर रद्द; भाजपमध्ये उभी फूट - Mira Bhayander General Body Cancelled due to Quorum | Politics Marathi News - Sarkarnama

मिरा-भाईंदर पालिकेची सभा अखेर रद्द; भाजपमध्ये उभी फूट

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

महानगरपालिकेच्या आज होणाऱ्या ऑनलाईन विशेष सर्वसाधारण सभेबाबत जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी सोमवारी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनात भाजप नगरसेवकांची एक बैठक घेतली होती. बैठकीला कुणीही हजर राहू नये, असा फतवा मेहता यांनी जारी केला होता; मात्र भाजपच्या ६३ नगरसेवकांपैकी ३४ नगरसेवक बैठकीला हजर होते.

भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील भाजपमध्ये उभी फूट पडल्याने गणपूर्ती (कोरम)अभावी आजची सर्वसाधारण सभा अखेर रद्द करण्याची नामुष्की महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्यावर आली. कोरमअभावी सर्वसाधारण सभा रद्द होण्याची महानगरपालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना मानली जात आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपची बहुमताची सत्ता आहे. मिरा-भाईंदर भाजप जिल्हाध्यक्षपदी आपली नियुक्ती व्हावी, असा प्रयत्न नरेंद्र मेहता यांनी वरिष्ठ पातळीवरून जोरदारपणे चालविला होता; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेले हेमंत म्हात्रे यांचीच या पदी नियुक्ती करीत भाजपने मेहता यांना धक्का दिला होता. जिल्हाध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर हेमंत म्हात्रे यांनी मिरा-भाईंदर महापालिकेत लक्ष घालण्यास सुरुवात केल्याने वाद सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

महानगरपालिकेच्या आज होणाऱ्या ऑनलाईन विशेष सर्वसाधारण सभेबाबत जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी सोमवारी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनात भाजप नगरसेवकांची एक बैठक घेतली होती. बैठकीला कुणीही हजर राहू नये, असा फतवा मेहता यांनी जारी केला होता; मात्र भाजपच्या ६३ नगरसेवकांपैकी ३४ नगरसेवक बैठकीला हजर होते. सभेकडे भाजपच्या जवळजवळ ५० पेक्षा अधिक नगरसेवकांनी पाठ फिरविली. सभेला ऑनलाईन केवळ सर्वपक्षीय २५ नगरसेवकच हजर होते. त्यामुळे कोरमअभावी महासभा रद्द करण्याची नामुष्की महापौरांवर ओढावली आहे.

बैठकीत राडेबाजी
पालिकेची आजची सर्वसाधारण सभा पक्षांतर्गत वादंगामुळे वादळी ठरणार असल्याची चिन्हे दिसून येताच मिरा-भाईंदर भाजपचे प्रभारी तथा माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सकाळी भाईंदर पश्‍चिम येथील माहेश्‍वरी हॉल येथे भाजपच्या नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. बैठकीत प्रभारी निरीक्षकांच्या साक्षीनेच निष्ठावंत विरुद्ध मेहता समर्थक यांच्यात राडेबाजी झाली. याबाबत नरेंद्र मेहता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख