ठाण्यात शिवसेना गटनेत्याच्या वाहनावर हल्ला - Goons Attack Thane Shivena Leader Dilip Bartakke | Politics Marathi News - Sarkarnama

ठाण्यात शिवसेना गटनेत्याच्या वाहनावर हल्ला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

ठाणे महापालिकेतील शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के यांच्या खासगी वाहनावर दुचाकीवरून आलेल्या मद्यपी त्रिकूटाने हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री सावरकरनगर भागात घडली. हल्लेखोरांनी बिअरच्या बाटल्यांनी वाहनाच्या काचा फोडून बारटक्के यांच्या चालकाला धक्काबुक्की केली

ठाणे : ठाणे महापालिकेतील शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के यांच्या खासगी वाहनावर दुचाकीवरून आलेल्या मद्यपी त्रिकूटाने हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री सावरकरनगर भागात घडली. हल्लेखोरांनी बिअरच्या बाटल्यांनी वाहनाच्या काचा फोडून बारटक्के यांच्या चालकाला धक्काबुक्की केली. गाडीतून उतरून आपण कार्यालयात गेल्याने बचावल्याचे बारटक्के यांनी सांगितले. याप्रकरणी, वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्रिकूटाला अटक केली आहे.

लोकमान्यनगर - सावरकरनगर प्रभागातील नगरसेवक तथा शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के हे गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कार्यालयात निघाले होते. तेव्हा, चिंचोळ्या रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने त्यांची गाडी अडवून चालक दिपक परब याच्याशी हुज्जत घातली. तिघेही हातात बाटल्या घेऊन खुलेआम मद्य प्राशन करत होते. बारटक्के यांच्या चालकाने समजावून देखील या त्रिकुटाने हल्ला केल्याने गाडीचे नुकसान झाले. 

दरम्यान, हल्लेखोर निसटण्याच्या प्रयत्नात असतानाच शिवसेना उपविभागप्रमुख महेश लोखंडे, शाखा प्रमुख हितेंद्र लोटलीकर आदींनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांना पकडून वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तीनही आरोपींना अटक केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख