१४ दिवसांत परिणाम दाखवा; अन्यथा आयुक्त हटवा; डोंबिवलीत सर्व पक्षांची मागणी - Dombivali Political Parties Give Ultimatum to Municipal Commissioner | Politics Marathi News - Sarkarnama

१४ दिवसांत परिणाम दाखवा; अन्यथा आयुक्त हटवा; डोंबिवलीत सर्व पक्षांची मागणी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

कल्याण आणि डोंबिवलीत दररोज सुमारे ५०० कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांना शासकीय रुग्णालयात खाट न मिळणे, ऑक्‍सिजनचा तुटवडा, रुग्णवाहिका न मिळणे, खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात आलेले भरमसाट बिल आदी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यासोबतच लॉकडाऊन काळात अनेकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून नागरिकांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे

ठाणे  : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत दररोज सुमारे ५०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत; तर आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. खासगी रुग्णालयांकडूनही लूट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पहिली कोरोना परिषद डोंबिवलीत बुधवारी पार पडली. यामध्ये १५ सूचनांचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. तो आयुक्तांना देण्यात येणार आहे. 

आयुक्तांना या ठरावाविषयी अंमलबजावणी करण्यास पुढील १४ दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. त्या कालावधीतही आयुक्त आणि पालिका प्रशासनास ठोस उपाययोजना आखता आल्या नाहीत, तर आयुक्त हटाव मोहीम सुरू करण्याचा एकमुखी निर्णय परिषदेत घेण्यात आला आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने डोंबिवलीत कोरोना परिषद घेण्यात आली. यामध्ये सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, व्यापारी संघटना, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

कल्याण आणि डोंबिवलीत दररोज सुमारे ५०० कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांना शासकीय रुग्णालयात खाट न मिळणे, ऑक्‍सिजनचा तुटवडा, रुग्णवाहिका न मिळणे, खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात आलेले भरमसाट बिल आदी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यासोबतच लॉकडाऊन काळात अनेकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून नागरिकांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ही परिषद झाली. यामध्ये १५ सूचनांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो लवकरच आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. 

आयुक्तांना प्रस्ताव पाठविल्यानंतर १४ दिवसांचा कालावधी त्यांना देण्यात येईल. या कालावधीत बदल न झाल्यास आयुक्त हटाव, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात येणार असल्याचा एकमुखी निर्णय या परिषदेत घेण्यात आला. परिषदेला भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण, मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील, शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, कॉंग्रेसचे माजी नगरसेवक रवी पाटील, नितीन पाटील, इरफान शेख, काळू कोमस्कर आदी उपस्थित होते.

कोरोना परिषदेतील प्रस्तावातील मागण्या कायद्याला धरून आहेत. पालकमंत्री डोंबिवलीत आल्यास योग्य तो निर्णय घेतला जाईल. यासाठी पुढील बैठकीला पालकमंत्र्यांना आवर्जून बोलविण्यात येईल. ते न आल्यास आम्ही पुढील भूमिका ठरवू - रवींद्र चव्हाण, आमदार

आयुक्तांना काही सूचना करूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. आरोग्य यंत्रणा, अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा वचक राहिलेला नाही. सातत्याने या गोष्टी घडत असताना इतर महापालिकास्तरावरील आयुक्तांची बदली करण्यात आल्यानंतर तेथील निकाल हा काही प्रमाणात सकारात्मक दिसून आला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त बदलून येथील परिस्थिती बदलते का पाहिले पाहिजे - प्रमोद (राजू ) पाटील, आमदार

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख