राहुलबाबांचा आदर्श घ्यावा ! 

भाजपतील वाचाळवीर जेव्हा दुसऱ्या पक्षातील मोठ्या पदावर काम करणाऱ्या महिलेविषयी घाणेरडे आणि किळसवाणे बोलत होते तेव्हा शिवराजसिह कुठे होते ?
राहुलबाबांचा आदर्श घ्यावा ! 

सध्या देशात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. त्याला कारणही असे आहे, की त्यांनी इमरती देवी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाविषयी. खरेतर कमलनाथ हे कॉंग्रेसचे जबाबदार नेते आहेत. ते गांधी-नेहरू फॅमिलीशी एकनिष्ठ आहेत.

कॉंग्रेस पक्ष आणि या पक्षाचे सर्वेसर्वा राहुल गांधी असतील किंवा प्रियंका गांधी. त्यांना कमलनाथ यांनी केलेली भाषा कधीच रूचणार नाही, पचणार नाही. कमलनाथ यांनी कॉंग्रेस पक्षाला राज्यात किती फायदा आणि तोटा होईल याचा विचार न करता कमलनाथ यांचे कान उपटले आहेत ते राहुलबाबांनी. 

"" जर एखाद्याने तुमच्या आई आणि बहीणीला आयटम म्हटले तर ते आपण सहन करणार का कमलनाथजी ? असा सवाल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांना केला आहे. हे अगदी बरोबर. मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. राज्यात प्रचार शिगेला पोचला असतानाच कमलनाथ यांची इमरती देवी यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली. 

कमलनाथ चुकलेच ! 

कमलनाथ यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ चौहान यांनी मौनवृत्त पाळून आंदोलनही केले होते. त्यांनी कमलनाथ यांचा समाचार घेतला. एका सभेत बोलताना ते म्हणाले, की कमलनाथ तुम्हाला काय झाले आहे. आपण 74 वर्षाचे झाला आहात. 

कमलनाथ यांनी एका महिलेविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे कधीच समर्थन करता येणार नाही आणि राहुलबाबांनीही ते केले नाही. उलट कोणत्याच महिलेविषयी अपमानास्पद वक्तव्य करता कामा नये असे त्यांचे मत आहे. राहुलबाबांनी मागचापुढचा विचार न करता त्यांची कानउघाडणी केली आहे. तेथे पोटनिवडणुका होत आहेत. तरही पक्षाचा फायदातोटा पाहिला नाही. कमलनाथ हे सत्तर वर्षाचे आहेत. दीर्घ काळ ते सार्वजनिक जीवनात आहेत. ज्या कॉंग्रेसचे नेतृत्व एक महिला करीत आहे.याचे तरी भान ठेवायला हवे. कुठल्याही महिलेविषयी वाईट बोलताना जीभ कशी काय घसरते. 

कोणत्याही महिलेविषयी आदर बाळगायला हवा हा आदर्श कॉंग्रेसने नेहमीच घालून दिला. राहुलबाबांनी तर कोणत्याही महिला, जातीधर्माविषयी कधीही चुकीची भाषा केली नाही. त्यामुळेच की काय त्यांनी म्हणूनच कमलनाथ यांना खडेबोल सुनावले आहेत. हा झाला कॉंग्रेसचा विषय. 

भाजपत पायलीभर वाचाळवीर 
आता आपण भाजपच्या वाचाळविरांकडे वळू या. सोनिया गांधी असो की प्रियंका गांधी, राहुल गांधी. केवळ हे तीनच नव्हे तर अगदी पंडित जवाहरलाला नेहरू यांनाही भाजपतील वाचाळवीर सोडत नाहीत. ते या मंडळींविषयी कशापद्धतीने रिऍक्‍ट होतात याचा अनुभव अनेकदा आला आहे. भाजपमधील वाचाळविरांनी 2014 नंतर तर जो काही धुमाकूळ घातला आहे. तो काही कमी नाही. सोनिया गांधीविषयी अगदी शेलक्‍या भाषेत त्यांच्या गोरेपणावरही जहरी टीका केली आहे. केवळ भाजपच नव्हे तर शिवसेनाप्रमुखांची भाषणे आजही काढून पाहिली तर त्यांनीही सोनिया गांधींवर कशापद्धतीने टीका केली होती हे पाहिले तर शरमेने मान खाली जाते. 

म्हणूनच शिवराजसिंह यांनी यापुढे कुठल्याही भाजप नेत्यांने एखाद्या महिलेविषयी जर का अवमानकारक विधान केले तर असेच मौनव्रत पाळून निषेध करावा ही अपेक्षा आहे. आज शिवराजसिह कमलनाथ यांनी केलेल्या टीकेवर ज्या पद्धतीने आक्रमक झाले आहेत ना ! तसा आक्रमकपणा यापूर्वी त्यांनी स्वपक्षातील वाचाळविरांविरोधात दाखविल्याचे आठवत नाही. 2014 नंतर सोनिया, प्रियंका, राहुल यांची ज्याप्रकारे बदनामी, टिंगलटवाळकी केली. ती कधीच विसरता येणारा नाही. कॉंग्रेसमध्ये दिग्वीजयसिंह, मणिशंकर अय्यर असतील किंवा कमलनाथ येथेही वाचाळवीर आहेतच. याचा अर्थ भाजप फार धुतल्या तांदळासारखा आहे असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. 

भान ठेवायला हवे ! 
भाजपमधील वाचाळविरांची नावे घ्यायची झाली तर ती यादी खूपच लांबत जाईल. भाजपच्या वाचाळविरांनी अतिशय हीन भाषेत आणि कोणालाही संताप आणि चीड अशा पद्धतीने विधाने केली आहेत. त्याचे कधीच समर्थन करता येणार नाही. कमलनाथ असो मणिशंकर असोत. त्यांनी जर अवमानकारक विधान केले तर राहुलबाबांनी कधी सहन केले नाही. मणिशंकर यांची तर त्यांनी थेट पक्षातून हकालपट्टी केली होती. असे एकतरी उदाहरण भाजपमध्ये घडले आहे का ? 

कोणतीही महिला, जात, धर्म असो की कोणतीही व्यक्ती टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण, आपल्या मर्यादा ओलांडता कामा नयेत. कमलनाथ यांच्या सारख्या नेत्याने एखाद्या महिलेविषयी बोलताना भान ठेवायला हवे होते. शिवराजसिंह ज्याप्रकारे म्हणत आहेत, की जर तुमच्या आईबहीणीला जर कोणी आयटम म्हटले तर चालेल का ?

तर हा प्रश्‍न योग्यच आहे. भाजपतील वाचाळवीर जेव्हा दुसऱ्या पक्षातील मोठ्या पदावर काम करणाऱ्या महिलेविषयी घाणेरडे आणि किळसवाणे भाष्य करतात तेव्हा शिवराजसिह कुठे होते हा ही प्रश्‍न आहेच. तेव्हा तोंडाला कुलूप लावले होते की काय असा प्रश्‍नही पडतो. काही असो प्रत्येक पक्षात वाचाळविरांची काही कमी नाही हेच सत्य आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com