कुशल संसदपटू, उत्तम प्रशासक... 

भारतीय जनता पक्षाबरोबर अखेरपर्यंत निष्ठावंत राहिलेल्या सुषमा स्वराज यांनी पक्षातील दिग्गज नेत्यांना साथ देताना स्वतःच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला होता.
Sushma Swaraj.jpg
Sushma Swaraj.jpg

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचा आज प्रथम स्मृतीदिन. आज त्यांच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला आहे. मदतीसाठी धावून जाणाऱ्या, विरोधकांवर तुटून पडणाऱ्या अशी अनेक रूपे सुषमा स्वराज यांची जनमाणसात रूजली आहेत. सुषमाताईंनी देशाच्या राजकारणावर वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला. राजकीय मतभिन्नता आणि वैयक्तिक मैत्र हे दोन्ही उत्तमरीत्या जपता येते, याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला.

नेत्या म्हणून धोरणी, व्यवहारी. घरात शिरल्यावर मात्र एका आईची व एका पत्नीची सारी कर्तव्ये कसोशीने निभावणाऱ्या. 2014 नंतर परराष्ट्रमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळताना एकीकडे अडचणीतील देशबांधवांसाठी धावून जाणाऱ्या, तर शत्रूंबाबत तेवढीच कठोर भूमिका घेणाऱ्या. "ट्‌विटर'सारख्या माध्यमाचा प्रभावी वापर करणाऱ्या, संसदेत विरोधी पक्षनेत्या म्हणून आणि नंतर मंत्री म्हणून विरोधकांवर तुटून पडणाऱ्या. स्वतःच्या पक्षातील काही नेत्यांबाबत, "यांच्यासंदर्भात हा निर्णय घेतला तर पस्तावाल, हे लक्षात ठेवा,' असा इशारा देण्याइतकी तीव्र मते असली, तरी एकदा पक्षाने भूमिका घेतली की "पार्टीलाइन' न ओलांडण्याचे पथ्य काटेकोर पाळणाऱ्या; किंबहुना नंतर विरोधी पक्षांनी त्याच मुद्द्यावरून छेडले, की त्या त्याच नेत्यांची बाजू घेऊन "वयं पंचाधिकं शतम्‌' ही उक्ती सार्थ करणाऱ्या सुषमाजींची ही सारी रूपे उल्लेखनीय होत.


यशस्वी राजकारणी, कुशल संसदपटू आणि उत्तम प्रशासक असा त्रिवेणी संगम असलेल्या सुषमा स्वराज या पेशाने वकील होत्या. भारतीय जनता पक्षाबरोबर अखेरपर्यंत निष्ठावंत राहिलेल्या सुषमा स्वराज यांनी पक्षातील दिग्गज नेत्यांना साथ देताना स्वतःच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला होता. सात वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार अशी त्यांची कारकीर्द होती. राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप-1 सरकारमध्ये त्या 26 मे 2014 ते 30 मे 2019 या काळात परराष्ट्रमंत्री होत्या. इंदिरा गांधी यांच्यानंतर या पदावर नियुक्त झालेल्या त्या दुसऱ्या महिला मंत्री होत्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सुषमा यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यांचे पती स्वराज कौशल हे जॉर्ज फर्नांडिस यांचे निकटवर्ती होते. 1977 ते 1982 व 1987 ते 1990 याकाळात सुषमा स्वराज हरियाना विधानसभेच्या आमदार होत्या. 1977 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी त्या हरियानात मंत्री झाल्या. एवढ्या लहान वयात मंत्रिपद मिळालेल्या त्या एकमेव महिला होत.

जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात त्या सक्रिय सहभागी झाल्या होत्या. नंतर त्यांची कारकीर्द भाजपमध्ये बहरली. दिल्लीचे मुख्यमंत्रिपदही त्यांनी सांभाळले होते. विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी अलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम केले. 2000 ते 2003 या काळातही त्यांनी हे मंत्रिपद सांभाळले. 2003 ते 2004 या काळात एनडीए सरकारमध्ये आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी सुषमा यांनी सांभाळली. त्यांच्या काळात त्यांनी सहा "एम्स'ची स्थापना केली. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्या परराष्ट्रमंत्री होत्या. अडचणीत सापडलेल्या परदेशस्थ भारतीयांना त्यांनी सदैव मदतीचा हात पुढे केला आणि सरकारची भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठामपणाने मांडली होती. 

अडचणीत असलेल्यांच्या मदतीला धावणे, त्यांच्यासाठी शक्‍य तेवढे करणे ही सुषमा स्वराज यांची प्रवृत्तीच होती. "इसिस' 2014 मध्ये इराकमधील 39 भारतीय कामगारांचे अपहरण करून त्यांना ठार केले होते. या कामगारांच्या सुटकेसाठी सुषमांनी किती प्रयत्न केले हे सांगताना चंडीगडच्या गुरपिंदर कौर गहिवरून येतात. त्यांचा भाऊ मनजिंदरसिंग याचा ठार झालेल्यांत समावेश होता. कामगारांना वाचविण्यात यश आले नाही; पण त्यांचे अवशेष तरी त्यांच्या नातलगांना मिळावेत, यासाठी सुषमांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आम्हाला आमच्या नातेवाइकांचे काय झाले हे समजू शकले, असे गुरपिंदर कौर यांनी सांगितले होते. 

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानींसारखे खंदे नेते 1990 च्या काळात भाजपला सत्तेकडे नेत असताना प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे सुषमा स्वराज यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. दिल्ली आणि कर्नाटकमधील निवडणुकांत पक्षाच्या प्रचारक म्हणून त्या आघाडीवर होत्या. हिंदी भाषेवरील प्रभुत्व हा सुषमा स्वराज यांचा मोलाचा गुण होता. सहाजिकच, 1990 आणि 2000 च्या निवडणुकांत हिंदीभाषक राज्यांत त्यांना प्रचारक म्हणून मागणी होती.


वाजपेयी आणि अडवानींसारख्या दिग्गजांपुढेही "भारतीय नारी'ची अस्सल प्रतिमा असलेल्या सुषमांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. राजकारणात अडवानी गटाच्या मानल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज या भाजपच्या दुसऱ्या पिढीतील महत्त्वाच्या नेत्या होत्या. त्यांच्या भाषाकौशल्यामुळे त्या लोकसभेवर चार वेळा विजयी झाल्या होत्या. दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून त्या 1996 आणि 1998 अशा दोन वेळा विजयी झाल्या होत्या. मात्र, 1999 मधील बळ्ळारीची निवडणूक सर्वाधिक चुरशीची ठरली. कॉंग्रेसच्या तेव्हाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर भाजपने सुषमांना उभे केले होते. 

"भारतीय नारी' विरुद्ध "विदेशी बहू' या मुद्द्यावर लढवली गेलेली ही निवडणूक सोनियांनी जिंकली; पण सुषमांची लोकप्रियता कायम राहिली हे विशेष. मतदारांशी संपर्क साधण्यासाठी सुषमांनी कन्नड भाषा शिकून घेतली होती आणि तो कौतुकाचा मुद्दा झाला होता. भाजप पुन्हा सत्तेवर येताच सुषमा स्वराज यांची राजकीय घोडदौड सुरू झाली.

वाजपेयी सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यावर 2009 मध्ये सुषमा स्वराज या लोकसभेत पक्षाच्या नेत्या बनल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काळात सुषमा स्वराज पंतप्रधान व्हाव्यात, असे मतही व्यक्त केले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर सुषमा स्वराज यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्‍न उपस्थित केला गेला; पण मोदींबरोबर जुळवून घेत सुषमांनी भाजप सरकारात परराष्ट्र मंत्रिपद मिळविले. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना बाजूला व्हावे लागले. तथापि, एक उत्कृष्ट वक्‍त्या म्हणून सुषमा स्वराज कायम स्मरणात राहतील हे निश्‍चित.
Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com