संजय राऊतसाहेब, ठाकरे ब्रॅंड टिकवायचा कोणी ? 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठी माणसाच्या मुद्यावर पहिल्यापासून ठाम आहे. राज असे व्यक्तिमत्व आहे की भलेभले त्यांना टरकतात. हिम्मत नाही त्यांच्याकडे डोळे वर करून पाहण्याची. मग ते अर्णब गोस्वामी असोत की अन्य कोणी ! महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅंड ही काळाची गरज आहे पण, हा बॅंड टिकवायचा कोणी याचं उत्तर शिवसेनेने दिले पाहिजे.
संजय राऊतसाहेब, ठाकरे ब्रॅंड टिकवायचा कोणी ? 

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला. त्यालाही आता अर्धे शतक झाले. मुळात मुंबई, ठाण्यातील मराठी माणसांवर होणारा अन्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सहन झाला नाही. वृत्तपत्रातील नोकरी सोडून ते राजकारणात उतरले आणि पुढे शिवसेनेची स्थापना झाली. त्यांच्यामुळे मराठी माणसाचा आवाज महाराष्ट्राच्या राजधानीत बुलंद झाला.

हा आवाज ते असेपर्यंत खणीखणीत होता. कोणाची हिम्मत नव्हती मुंबईकडे वाकडी नजर करून पाहण्याची. मुंबई आणि मराठीच्या मुद्यावर जो समोर आला त्याला आडवा केल्याशिवाय बाळासाहेब स्वस्थ बसत नसतं. केंद्रात कोणाचेही सरकार असो ते कधी डगमगले नाहीत. 

खरंतर मुंबई ही मराठी माणसाची आहे. ती कोळी, आदिवासी, आगरी, कुणबी, भंडारी, सारस्वतांची आहे. त्याच मुंबईचा लचका तोडण्याचे कारणस्थान या ना त्या कारणाने आतापर्यंत रचले गेले पण, खमके बाळासाहेबांना पाहून कोणी तसे धाडस केले नाही. आज मुंबईत मराठी माणसाचा टक्का घसरत आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही. शिवसेना हिंदुत्वाच्या मागे लागल्याने ती कोणालाच दुखवायला तयार नव्हती. बिहारी, यूपी, केरळी, मारवाडी, गुजराती जे कोणी परप्रांतिय आहेत ते त्यांना (हिंदुत्त्वाच्या मुद्यावर) हवे आहेत. त्यामध्ये गैर असे काही नाही.

शेवटी मुंबईवर राज्य करायचे म्हणजे सर्वांना बरोबर घ्यावे लागते असा पक्षाने विचार केला असावा. मात्र, आज मुंबईतील परप्रांतिय माणूस मनापासून शिवसेनेवर प्रेम करतो का ? या प्रश्‍नाचे उत्तर शोधले तर त्याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. 

मुंबईतील परप्रांतिय मंडळी एकेकाळी कॉंग्रेसच्या मागे खंबीरपणे उभी राहत. ती जागा आता भाजपने घेतली आहे. हे लपूनही राहिलेले नाही. गेल्या काही दिवसापासून मुंबईत काय चालले आहे हे आपण पाहतोच आहोत. कोणाला नकोय शिवसेनेचे सरकार ! तर मराठी माणसांना नव्हे तर परप्रांतियांना. अगदी राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी कंगना, मदन शर्मा सारखी मंडळी करीत आहेत याचे आश्‍चर्य वाटते. 

महाराष्ट्रात असे भयावह काय घडले की कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. सुुशांतप्रकरणामुळे महाराष्ट्राची न भरून निघणारी हाणी झाली आहे की काय असा प्रश्‍न पडतो. नको त्या मुद्यावर राजकारण ताणले गेले. कदाचित बिहारमध्ये जर निवडणूक नसती तर सुशांतप्रकरणाचा इतका गाजावाजा झालाही नसता असे राजकीय वुर्तळातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काही असो मुंबईतील मराठी माणसाचा प्रश्‍न पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. अशावेळी संजय राऊत यांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आठवण आली आणि ठाकरे ब्रॅंडची भाषा केली त्याचे स्वागतच आहे. 

'ठाकरे' हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा 'ब्रॅण्ड' पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच 'ब्रॅण्ड' चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात 'ठाकरे' ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी 'ठाकरे' ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असे म्हणत शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'तून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. 

पण यानिमित्ताने काही प्रश्‍नही पडतात. शिवसेनेला जशी गरज लागेल तसे गोंजारायची सवय आहे. राज हे बाळासाहेबांच्या तालमीत घडलेले नेतृत्व आहे. ते शिवसेनेतून का बाहेर पडले या जुना इतिहास उगाळण्यात काही अर्थ नाही. मात्र राज हे मराठी माणसाच्या मुद्यावर पहिल्यापासून ठाम आहे. मी राजकीय किंमत मोजेन पण, मराठीच्या मुद्यावर तडजोड करणार नाही असे त्यांनी अनेकवेळा बोलून दाखविले आहे. प्रत्येक पक्षात भाऊबंदकी असते. ती कधी लपूनही राहिली नाही.

राजकीय घराण्यांमध्ये अनेक झेंडे आज दिसतात. राज यांची गरज लागली की त्यांचा उदोउदो करायचा आणि गरज संपली की विचारयचे नाही. काही कारण नसताना त्यांचा पक्ष फोडला. त्यांच्यावर स्वत: राऊत यांनी केलेली टीकाही यानिमित्त लक्षात घ्यायला हवी. तरीही राज किंवा मनसे उद्धव ठाकरे यांच्या सरकारविरोधात रणशिंग फुंकत नाही हे नशीब समजा. 

मुंबईत जर मराठी माणूस टिकवायचा असेल तर दोन्ही ठाकरे हवेच याबाबत दुमत नाही. केवळ राजच नव्हे तर छगन भुजबळ, गणेश नाईक, बाळा नांदगावकर, नारायण राणे असतील किंवा शिवसेनेचे जे दिग्गज होते त्यांना सांभाळले असते तर आज शिवसेनेची जी ताकद आहे त्यापेक्षा शंभर पट अधिक दिसली असती. शेवटी फाटाफूट ही प्रत्येक पक्षात होत असते त्याला शिवसेना तरी अपवाद कशी असू शकते. मुद्दा असा आहे की पक्ष वेगळे असले मराठीच्या मुद्यावर किमान समान कार्यक्रमावर ठाकरे एकत्र हवेत हे खरे आहे. 

मुंबईत राज ठाकरे महापालिका निवडणुकीत उतरल्याने काय होईल सांगता येत नाही. मुंबईत मराठी माणसातच फूट पडली तर "ना तुला ना मला अशी गत' होऊ शकते. मुंबईकडे पाहिल्यास भाजपने शिवसेनेच्या बरोबरीने जागा जिंकल्या आहेत. भविष्यात त्यांनी आणखी जोर लावला तर काही खरे नाही. म्हणून आज संजय राऊत ज्या ठाकरे ब्रॅंडवर बोलतात, तो ब्रॅंड टिकविण्याची जबाबदारी एकट्या राज ठाकरेंची नाही तर ती शिवसेनेचेही आहे हे ही यानिमित्त लक्षात घेणे गरजेचे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com