भाजपचा बहुमताचा रथ पवार-ठाकरेंनीच रोखला ! 

अगदी 2014 मध्ये शिवसेनेला पटक देण्याची भाषा केली. पण, शिवसेनेने उलट शड्डू ठोकला. तो भाजप विरोधातच. हे ही लपून राहिले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 2014 मध्ये तर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी 2019 मध्ये राज्यात भाजपला रोखले. म्हणजे बहूमत मिळवू दिले नाही हे वास्तव आहे.
भाजपचा बहुमताचा रथ पवार-ठाकरेंनीच रोखला ! 

2019 मध्ये हातातोंडाशी आलेला घास गेल्याने भाजप विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी युतीच करायला नको होती. हे आज म्हणणे समजून घेण्यासारखे आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे भाजप परिवारासाठी मार्गदर्शक आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जी दोन भाकितं केली होती, ती खरी ठरली आहेत. त्यांनी मोदींवर पुस्तकेही लिहिली आहेत आणि तार्किकदृष्ट्या ते चांगले मांडणी करतात. भाऊंचा राजकारणाचा अभ्यास इतका दांडगा आहे की राजकारणात काय होणार आणि काय होणार नाही हे ते अचूक जाणतात आणि सांगतात. 

भाऊंनी केलेली दोन भाकित खरी ठरली असताना फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्यांच तिसरं भाकित ऐकले नाही. जर ते ऐकले असते, तर भाजप 150 जागा घेऊन सत्तेवर आला असता. त्यांना शिवसेनेची गरजच लागली नसती. फडणवीस आज मुख्यमंत्री असते. पण, त्यावेळी भाऊंच ऐकलं नाही. ते ऐकायला हवं होतं. यापुढेही त्यांनी भाऊंच थोडं ऐकलं तर भाजपला खूप फायदा होऊ शकतो. असो. 

वास्तविक 2014 मध्ये मोदी नावाची कधी नव्हे इतकी मोठी लाट आली होती. नरेंद्र मोदी हे नाव इतके वाजतगाजत आले की काही विचारू नका. त्यावेळीही शिवसेनेचा भाजपला पाठिंबा होता आणि मोदी का हवेत हे शिवसेनाच सांगत होती. उद्नव ठाकरे हे मोदींच्या मागे खंबीरपणे उभे राहिले होते. मात्र पुढे काय झाले. काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लागली आणि भाजपला स्वबळाचे स्वप्न पडू लागले. ज्या शिवसेनेचा हात धरून भाजप महाराष्ट्रात घरातघरात पोचली होती. तो पक्ष मोदींच्या विजयामुळे बळकट बनला होता. आपण बहुमतांने सत्तेवर येऊ असे भाजपला वाटत होते. पुढे जागा वाटपाचा मुद्दा करून भाजपने शिवसेनेशी युती तोडली. तिकडे कॉंग्रेस राष्ट्रवादीही एकमेकापासून दूर गेले. म्हणजेच राज्यात चौरंगी लढती झाल्या. जर त्यावेळी युती झाली असती तर या दोन्ही पक्षाला किती जागा मिळाल्या असत्या हे आता सांगण्यात अर्थ नाही. कारण राजकारणात काहीही होऊ शकते. 

मोदींची इतकी मोठी लाट येऊनही भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली नाही. मग.2019 च्या निवडणुकीचं काय घेऊन बसलात राव ! असे आज म्हणावे लागेल. जर भाजप बहुमत घेऊन सत्तेवर आला असता, तर तो 2014 मध्येच. जे त्यावेळी शक्‍य झाले नाही. पुढचं तर विचार करून काही फायदा होणार नाही. भाजपला राज्यात बहुमत मिळणार नाही असे येथे सांगण्याचा मुद्दा नाही. काही झाले तरी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची राज्यात थोडीतरी ताकद आहे की नाही याचं उत्तर भाजपने दिलं पाहिजे. भाऊंचे भाकित काही असो भाकितावर कोणतीच निवडणूक जिंकता येत नाही तर त्याला वास्तवाची जोडही आवश्‍यक असते. भाजपला राज्यात काय होईल किंवा युती न केल्याचे फायदे तोटे त्यांना माहित होते, म्हणून तर त्यांनी 2014 मध्ये युती केली नाही. 

मात्र 2019 मध्ये बहुमत मिळेल की नाही याबाबत पक्षाला चिंता होती पण, मोदींची जादू पुन्हा चालली आणि ते दुसऱ्यांचा बहुमताने सत्तेवर आले. कॉंग्रेसचा पालापाचोळा झाला. हे वास्तव आहे. ज्या भाजपला 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेची गरज लागली नाही. बहुमत हुकल्याने त्यांना शिवसेनेबरोबर  जावे लागले . पण, 2019 मध्ये पुन्हा युती करण्याची गरज का भासली. कारण 122 वरून भाजप खाली घसरला होता आणि 105च जागा मिळाल्या. म्हणजे भाजप बहुमतापासून दूर गेला. कोणी असे म्हणून शकतो शिवसेनेने भाजपचे उमेदवार पाडले. शिवसेनाही तोच आरोप करीत होती. कारण शिवसेनेचाही आकडा कमी झाला होता. 

युती असताना पाच वर्षे या दोन पक्षात जो कलगितुरा सुरू होता. तो मिटला असे विधानसभा निवडणूक होईपर्यंत वाटत होते. निकाल आला आणि भाजप पुन्हा बॅकफूटवर गेला. उद्धव ठाकरेंनी 2014 मध्ये तर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी 2019 मध्ये भाजपला बहुमतापासून रोखले. 2019 मध्ये शरद पवारसाहेबांमुळे भाजपला अनेक ठिकाणी पराभूत व्हावे लागले. काही जिल्ह्यामध्ये तर एकही आमदार या पक्षाचा निवडून आला नाही हे नाकारून कसे चालेल. 

दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेही डोळेझाक करून चालणार नाही. या पक्षाचे जे आमदार आहेत. ते आपल्या मतदारसंघातून निवडून येतातच. कितीही मोठी लाट असली तरी दोन्ही कॉंग्रेसच्या मिळून 70-80 जागा निवडून येतात. तसेच काही म्हटले तरी शिवसेनेलाही पन्नास साठ जागा मिळतातच. हे ही लपून राहिले नाही. समजा शिवसेनेशी युती नसती केली तरी भाजपलाही त्याचा फटका बसला असता की नाही. भविष्यातही जर भाजपबरोबर शिवसेना नसेल तर मला वाटत नाही की बहुमताचा आकडा भाजप गाठू शकेल. ते शक्‍य नाही. 

अगदी 2014 मध्ये शिवसेनेला पटक देण्याची भाषा केली. पण, शिवसेनेने उलट शड्डू ठोकला. तो भाजप विरोधातच.  एकंदर काय तर शिवसेनेनेही भाजपचे राजकारण ओळखले आहे. त्यांच्या चाली न समजण्या इतके उद्धव ठाकरे पोरकट आहेत असे समजण्याचेही कारण नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्‍चात त्यांनी शिवसेना टिकवून ठेवली. हेच त्यांचे यश मानावे लागेल. आज  उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ले होत आहेत मात्र ते डगमगलेले नाहीत. 

2014 मध्ये तर एकटे लढले होते. आता तर  शरद पवारसाहेबांसारखा नेता खंबीरपणे पाठीशी आहे. दोन्ही कॉंग्रेस आहे. त्यामुळे काहीवेळेला सरकार काही निर्णयामुळे बॅकफूटवर जाते. तसे ठाकरे सरकारबाबतही झाले. याचा अर्थ असा नाही की हे सरकार लगेच कोसळेल. राज्यात कोणी काही म्हटले तरी राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थितीही नाही. कोणी तरी सोम्यागोम्या उठतो आणि राष्ट्रपती राजवटीची भाषा करतो ते ही मराठी माणसाला पटलेले दिसत नाही. सुशांतसिंह प्रकरणात उलट शिवसेनेला जो काही फायदा व्हायचा आहे तो झाला आहे. याचा अर्थ ज्याने त्याने आपल्या पद्धतीने काढण्याची गरज आहे. 

महाराष्ट्राची ताकद चार पक्षात विभागली गेली आहे. हवे तर असे म्हणूया की ज्या दिवशी भाजपला एखाद्या पक्षाची (उदा. शिवसेना) ताकद तोडणे शक्‍य होईल त्यावेळी भाजप बहुमताने सत्तेवर येऊ शकतो. कदाचित हीच चाल 2019 मध्ये शिवसेनेच्या लक्षात आली असावी म्हणून तिने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले असावे. काही झाले तरी महाराष्ट्रात बहुमत मिळविणे तितकेसे सोपे नाही. जर पुढे भाजपने बहुमत मिळविले तर आनंदच आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com