कांदा राहू द्या पण, डॉ. अनिल बोंडेंना आधी बांगलादेशला पाठवा !

कांद्याची निर्यात बंद होणार हे नरेंद्र मोदी ,पीयुष गोयल,आणि देवेंद्रजींना सुध्दा माहीत नव्हतं, तर बांगलादेशला आधी कसं कळवणार ?त्यामुळे कांदा राहू द्या पण डॉ. अनिल बोंडेंना आधी बांगलादेशला पाठवा. अन्यथा भारताशी चांगले संबंध असलेले एकमेव शेजारी राष्ट्र ( ते ही मुस्लिम) नाराज होऊन संबंध बिघडणार आणि वर भारताची जगात छीःथू होणार!
कांदा राहू द्या पण, डॉ. अनिल बोंडेंना आधी बांगलादेशला पाठवा !

 गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र, हरियाणाच्या विधानसभा निवडणुका होत्या. त्या डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली. आपला कांदा बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर जातो. आपला कांदा बंद झाला की तिथं भाव आभाळाला भिडतात आणि तिथल्या राज्यकर्त्यांच्या तोंडचं पाणी पळतं. निर्यातबंदीनंतर काही दिवसांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर होत्या.

 त्यांनी निर्यातबंदीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या- प्याज को लेकर थोडासा दिक्कत हो गया हमारे लिये. मुझे मालूम नही है, आपने क्यूं प्याज बंद कर दिया. थोडा नोटीस देने से अच्छा होता, हम दुसरे देश से ले सकते थे. अचानक बंद कर दिया और ये हमारे लिये मुश्किल बन गया.

वर त्या हसत हसत म्हणाल्या की, मी खानसाम्याला सागितलंय की आता स्वयंपाकात कांदा वापरू नको म्हणून. 
भारताने निर्यातबंदी करायचं ठरवलं तर बांगलादेशला पूर्वकल्पना द्यावी, असा अलिखित करार त्यानंतर झाला होता.  

आता बिहार, प. बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केद्र सरकारने पुन्हा कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. पण तो अलिखित करार भारताने पाळला नाही आणि अचानक निर्णय लागू केला, असा आक्षेप बांगलादेशने घेतला आहे. भारताने निर्यात थांबवल्याने बांगलादेशात कांद्याचे भाव भडकले आहेत.

भारताने तात्काळ निर्यातबंदी मागे घ्यावी, अशी मागणी बांगलादेशने केली आहे.
याला दुसरा एक अॅंगल आहे तो मत्स्यप्रेमाचा. आगामी सणासुदीच्या दिवंसात माशांची वाढती मागणी लक्षात घेऊन बांगलादेशने भारतात प्रसिध्द हिलसा मासा निर्यात करण्याचं ठरवलं होतं. 

ऑक्टोबरपर्यंत 1457 टन हिलसा मासे बांगलादेशातून भारतात दाखल होणार होते. आणि नेमका तोच मुहूर्त साधून आपण कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातलीय. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत भारताची कांदा निर्यात 23 टक्के वाढून सुमारे 7 लाख टनांवर पोहोचली. त्यात एकट्या बांगलादेशचा वाटा सुमारे दोन लाख टन होता. बांगलादेशला होणाऱ्या कादा निर्यातीत तब्बल 147.5 टक्के वाढ नोंदवली गेली. पण आपण निर्यातबंदीचा तुघलकी निर्णय घेतल्याने आता  (कांद्यातून मिळणारे) पैसेही पाण्यात गेले आणि मासेही.कांद्यामुळे भारत आणि बांगलादेश या दोन शेजारी मित्रराष्ट्रांतले संबंध ताणले गेले आहेत. 

मोदी सरकारचं चुकलंच जरा. एक वेळ भारतातल्या शेतकऱ्यांना निर्यातबंदीची आगाऊ कल्पना दिली नाही म्हणून काही बिघडत नाही (निर्यातबंदी केली तरी मागच्या निवडणुकीत नाशिक आणि खानदेशात भाजपचेच उमेदवार निवडून आले.)  पण बांगलादेशला आधी कळवायला हवं होतं. शेख हसीनांना आता पुन्हा चातुर्मास पाळावा लागणार. कांद्यामुळे मोठा राजनैतिक पेच उद्भवला आहे. 
हा पेच सोडवायचा एकच नामी उपाय आहे. 

महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री आणि भाजपच्या किसान आघाडीचे प्रमुख डॉ. अनिल बोंडेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास दूत म्हणून बांगलादेशला पाठवावं. बोंडे शेख हसीनांना पध्दतशीर समजावून सांगतील. कांद्याच्या निर्यातबंदीशी सरकारचा काही संबंध नाही. निर्यातबंदी चूकच आहे. दिल्लीतली नोकरशाही कांद्याबद्दल खूप सेन्सिटिव्ह असते. जरा कुठं कांद्याचे रेट वाढले की हे अधिकारी अस्वस्थ होऊन निर्यात बंद करतात. 

वाणिज्य मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांचा हा प्रताप आहे. खरं तर कांद्याच्या निर्यातीचे निर्णय घ्यायचे अधिकार कृषी मंत्रालयाला दिले पाहिजेत. वाणिज्य मंत्रालय बदमाश आहे. त्यांच्याकडून ते काम काढून घ्यायला पाहिजे. अहो कुणालाच विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊन मोकळे झाले. 

कांद्याची निर्यात बंद होणार हे  नरेंद्र मोदी ,पीयुष गोयल,आणि देवेंद्रजींना सुध्दा माहीत नव्हतं, तर बांगलादेशला आधी कसं कळवणार ? 
त्यामुळे कांदा राहू द्या पण डॉ. अनिल बोंडेंना आधी बांगलादेशला पाठवा. अन्यथा भारताशी चांगले संबंध असलेले एकमेव शेजारी राष्ट्र ( ते ही मुस्लिम) नाराज होऊन संबंध बिघडणार आणि वर भारताची जगात छीःथू होणार. 

यातला गंमतीचा भाग सोडून देऊ, पण बांगलादेशच्या नाराजीची केंद्र सरकारन गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. कारण बांगलादेश हा महाराष्ट्राच्या फलोत्पादनाचा कणा आहे, असे म्हटले तरी वावगे होणार नाही.

 भारतातील डाळिंब, द्राक्षे, कांदा, टोमॅटो आदी एकूणच फळपिकांचा मोठा खरेदीदार देश म्हणून बांगलादेशाची ओळख आहे. त्या देशाकडून खरेदी सुरू राहिली की शेतकऱ्याला किफायती दर मिळतो. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने कांद्यावरची निर्यातबंदी मागे घ्यावी, किमान बांगलादेशला तरी या निर्यातबंदीतून वगळावे, ही मागणी लावून धरली पाहिजे. 


- 2020 मध्ये एप्रिल ते जून या कालावधीत भारताच्या कांदा निर्यात 23 टक्के वाढ.

- निर्यात सुमारे 7 लाख टनांवर पोहोचली. 

- त्यात एकट्या बांगलादेशचा वाटा सुमारे दोन लाख टन.
 
- बांगलादेशला होणाऱ्या कादा निर्यातीत तब्बल 147.5 टक्के वाढ.

- 2019-20 आर्थिक वर्षांत भारतातून एकूण 11.5 लाख टन कांदा निर्यात.
- त्यात 2.5 लाख टन वाटा एकट्या बांगलादेशाचा. 

- 2018-19 आर्थिक वर्षांत भारतातून एकूण 21 लाख टन कांदा निर्यात.

- त्यात 5.7 लाख टन कांदा बांगलादेशला. 

- 2018-19 मध्ये कांदा निर्यातीतून 3.4 हजार कोटी रूपयांचे परकीय चलन भारताला मिळाले.

-  त्यात बांगलादेशातून 30 टक्के म्हणजे 1058 कोटी रूपये मिळाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com