राजू शेट्टी नावाच्या दमदार ब्रॅंडचे अवमूल्यन थांबेना....

शरद जोशींच्या विचारांचे पाईक म्हणविणाऱ्या राजू शेट्टी यांना सध्या अनेक राजकीय तडजोडी कराव्या लागत आहेत. शरद पवार यांची बारामतीत जाऊन घेतलेली भेट असो, शेतीमाल खुला करणाऱ्या धोरणाला विरोध किंवा संघटनेतील धुसफूस असोत्यातून त्यांच्या ब्रॅंडचे अवमूल्यन होत आहे, हे त्यांच्या लक्षात कसे येत नाही?
raju-shetti-final.jpg
raju-shetti-final.jpg

वादग्रस्त कृषी विधेयकांच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला. या विधेयकांना स्वाभिमानीचा पाठिंबा आहे की नाही, राजू शेट्टींची नेमकी भूमिका काय, याबद्दलचा संभ्रम त्यामुळे दूर झाला आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात बाजारसमित्यांच्या बाहेर शेतमाल खरेदी-विक्रीला परवानगी देऊन बाजारसमित्यांची मक्तेदारी मोडून काढणे, कंत्राटी शेतीचा मार्ग मोकळा करणे आणि अत्यावश्यक वस्तू कायद्यातून शेतमाल वगळणे यासाठी अध्यादेश काढले होते. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या तिन्ही निणर्यांचे स्वागत केले होते. परंतु आता या  अध्यादेशांचे कायद्यांत रूपांतर करण्यासाठी ही विधेयके संसदेत मांडून संमत करण्यात आली, तेव्हा मात्र राजू शेट्टींनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. राजू शेट्टी कधी तळ्यात- कधी मळ्यात अशी भूमिका का घेतात, त्यांचे मतपरिवर्तन नेमके कशामुळे झाले, हा आता चर्चेचा विषय बनला आहे.

राजू शेट्टी यांनी २ जुलै रोजी अॅग्रोवन डिजिटलला एक प्रदीर्घ मुलाखत दिली होती. त्यावेळी केंद्र सरकारच्या धोरणात्मक सुधारणांच्या मुद्यांवर त्यांनी स्पष्ट मते व्यक्त केली होती. बाजार समित्यांची मक्तेदारी मोडून काढणे आवश्यकच आहे, असे सांगत बाजार समितीच्या बाहेर शेतमालाची खरेदी-विक्री करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले होते. परंतु बाजार समित्या बाहेरील व्यवहारांत शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी काही तरतुदी आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा हा शेतमालाचे भाव पाडण्याचे आणि शेतकऱ्यांची लूट करण्याचे साधन असल्याची टीका त्यांनी केली होती. या कायद्यातून शेतमाल वगळण्याचे स्वागत करतााना सरकारची या निर्णयाची वेळ चुकल्याचे त्यांनी म्हटले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अन्नधान्याचे भाव पडलेले असताना सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे आयात वाढण्याची शक्यता आहे़, ती रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले होते.

कंत्राटी शेतीच्या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवरच्या मालकी हक्काला बाधा येत नसेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो, शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होईल, अशा आशयाचे मतप्रदर्शन त्यांनी केले होते. थोडक्यात केंद्राच्या शेतीविषयक धोरणात्मक सुधारणांना त्यांनी पाठिंबा दिला होता.

शरद जोशींच्या विचारांचे अनुयायी?

स्वतःला शरद जोशी यांचे पाईक मानणाऱ्या राजू शेट्टी यांनी भाजपशी युती करण्याच्या मुद्यावरून शेतकरी संघटनेतून बाजूला होऊन स्वाभिमानीची वेगळी चूल मांडली. परंतु संघटना वेगळी असली तरी आपण शरद जोशींच्या विचारांचेच अनुयायी आहोत, असा दावा शेट्टी सातत्याने करत आले आहेत. शरद जोशी प्रणित शेतकरी  संघटना आणि शरद जोशींच्या विचारांना मानणाऱ्या संघटना व कार्यकर्त्यांनी तिन्ही कृषी विधेयकांचे स्वागत केले आहे. शेतकरी संघटनेतून फुटून बाहेर पडलेले दुसरे एक मातब्बर नेते रघुनाथ पाटील यांनीही विधयेकांचे स्वागत, पण अंमलबजावणीबाबत संशय असल्याची भूमिका घेतली आहे. परंतु सुरूुवातीला विधेयकांना पाठिंबा देणाऱ्या राजू शेट्टी यांनी मात्र कोलांटउडी मारत विधेयकांना विरोध करण्याची भूमिका स्वीकारली आहे.

डाव्यांचा विरोध जास्त

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती ही देशभरातील विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधित्व करणारी देश पातळीवरील संयुक्त संघटना आहे. त्यात उत्तर भारतातील शेतकरी संघटना तसेच डाव्या विचारांच्या शेतकरी संघटनांचाही समावेश आहे. या संघटनांचा विधेयकांना तीव्र विरोध आहे. विशेषतः पंजाब, हरियाणामध्ये उग्र निदर्शने सु्रू आहेत. या देशभरातील संघटनांची मोट बांधून देश पातळीवर शेतकऱ्यांचा राष्ट्रीय नेता म्हणून उदयाला येण्याची शेट्टी यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे कृषी विधेयकांवरून त्यांची गोची झाली आहे. 

तात्विकदृष्ट्या त्यांचा विधेयकांना पाठिंबा आहे, परंतु व्यावहारिक राजकारणाचा विचार करता त्यांना विरोधात भूमिका घेणे भाग पडले आहे. शरद जोशींना हयातभर ज्या समाजवादी, डाव्या मंडळींच्या विरोधात उभा दावा मांडला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून विधेयकांना विरोध करण्याची वेळ शेट्टींवर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी किसान समन्वय समितीच्या ऑनलाईन बैठकीत शेट्टी यांनी या विधेयकांच्या बाबतीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वेगळी भूमिका असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.  परंतु उत्तर भारतातील नेत्यांनी त्याला तीव्र विरोध करत तो मुद्दा हाणून पाडला. त्यामुळेच राजू शेट्टींवर आता कृषी विधेयकांच्या बाबतीत कोलाटउडी मारण्याची  वेळ आली आहे. परंतु यामुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  

कृषी विधेयकांतील त्रुटी अधोरेखित करून राजू शेट्टींनी या विधेयकांत दुरूस्त्या करण्याच्या मुद्यांवर विरोध केला असता तर ते योग्य ठरले असते. परंतु मुद्दलात कृषी बाजारपेठ खुली करण्यालाच विरोध असणाऱ्या डाव्या आणि समाजवादी मंडळींच्या पालखीचे भोई म्हणून भूमिका वठवत शेट्टींनी स्वतःचे अवमूल्यन करून घेतले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com