Anna Bhau Sathe in the film industry | Sarkarnama

चित्रपटसृष्टीतील अण्णा भाऊ साठे 

डॉ. किशोर खिलारे 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

चित्रपटसृष्टीमध्ये अण्णा भाऊ आपणास कलाकार, चित्रपट कथाकार, दिग्दर्शक, चित्रपट समीक्षक, प्रेक्षक आदी स्वरुपामध्ये भेटतात.

अण्णा भाऊ हे एक प्रतिभावंत साहित्यिक, लोकशाहीर, कामगार चळवळीतील सक्रिय नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक अग्रणी म्हणून सर्वश्रुत आहेत. आपल्या उपजत प्रतिभेच्या आधारे त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, कविता, पोवाडे, गण, छक्कड आदी साहित्याची निर्मिती केली. याचबरोबर अण्णा भाऊ चित्रपटसृष्टीमध्येसुद्धा अग्रणी होते. 1940च्या दशकामध्ये अण्णा भाऊंनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. चित्रपटसृष्टीमध्ये अण्णा भाऊ आपणास कलाकार, चित्रपट कथाकार, दिग्दर्शक, चित्रपट समीक्षक, प्रेक्षक आदी स्वरुपामध्ये भेटतात. त्यांच्या आठ कादंबऱ्यांवर आठ मराठी चित्रपट निघाले आहेत. 

ग्रामीण भागातील प्रेक्षक आकर्षित

त्यांच्या "माकडीचा माळ' या कादंबरीवर "डोंगरची मैना', "चिखलातील कमळ' यावर "मुरळी मल्हाररायाची', "वारणेचा वाघ' या कादंबरीवर "वारणेचा वाघ', "वैजयंता'वर "वैजयंता', आवडी या कादंबरीवर "टिळा लाविते मी रक्ताचा', अलगुज या कादंबरीवर "अशी ही साताऱ्याची तऱ्हा', "फकिरा'वर "फकिरा' आणि चित्रा कादंबरीवर "चित्रा' हा चित्रपट निघाला. त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी चित्रपट दुनियेला नवीन विषय मिळवून दिले. अण्णा भाऊंच्या या कथानकांवर आधारलेले चित्रपट पारंपरिक चित्रपटांपेक्षा खूप वेगळे होते. ग्रामीण जीवनाशी निगडित होते. त्यामुळे या चित्रपटांकडे ग्रामीण भागातील प्रेक्षक आकर्षित झाला. अण्णा भाऊंमुळे ग्रामीण कथानकावर आधारित अनेक चित्रपट निर्माण होण्यास प्रारंभ झाला. फकिरा या चित्रपटामध्ये स्वत: अण्णा भाऊंनी सावळाची भूमिका केली होती व ती खूप गाजली होती. त्याचबरोबर अण्णा भाऊंनी एका बंगाली मूकपटामध्ये भूमिका साकारली होती व या चित्रपटास अनेक पारितोषिके मिळालेली होती. जब्बार पटेल यांच्या "सिंहासन' आणि गोविंद निहलानी यांच्या "निखारा' या चित्रपटांवर अण्णा भाऊंच्या "माझा रशियाचा प्रवास' या चित्रपटाचा प्रभाव पडलेला आहे. 

उत्कृष्ट मराठी चित्रपटाचे पारितोषिक

अण्णा भाऊंच्या या चित्रपट कथानकाने अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली. याबाबत डॉ. बाबूराव गुरव लिहितात, ""चंद्रकांत, सूर्यकांत, जयश्री गडकर, सुलोचना, हंसा वाडकर, अनंत माने, राजदत्त असे कलावंत अण्णा भाऊंच्या पटकथांच्यामुळे प्रकाशात आले. पुढे प्रकाशात आलेले दादा कोंडके, निळू फुले, अशोक सराफ, अण्णा भाऊंचे श्रेय मानतात. आपण अण्णा भाऊंच्या लकबी, कल्पना उचललेल्या आहेत, हे दादा कोंडके यांनी मुलाखतीत मान्य केले होते. "अण्णा भाऊंचा "कोंबडी चोर' आमच्यासमोर होता!' असे दादा इंदुरीकर, राम नगरकर सांगायचे. "अण्णा भाऊंनी सादर केलेला खलनायक, मोरारजी देसाई एकदा मोऱ्याला दाखविला पाहिजे!' असे क्रांतिसिंह नाना पाटील जाहीर सभेत सांगायचे.''"वैजयंता' या चित्रपटास 1961-62 या वर्षाचे "सर्टिफिकेट ऑफ मेरीट' हे उत्कृष्ट मराठी चित्रपटाचे पारितोषिक मिळाले तर "अशी ही साताऱ्याची तऱ्हा' या चित्रपटास 1973-74 चे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट क्रमांक तीनचे पारितोषिक मिळाले होते. या सर्व चित्रपटांमुळे अण्णा भाऊंची "चित्रपट कथाकार' म्हणून ओळख सर्वश्रृत झाली. अण्णा भाऊंनी याबरोबरच चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शकाची आणखी एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. अण्णा भाऊ "परदेशी' या हिंदी चित्रपटाचे असिस्टंट दिग्दर्शक होते.

रशियन कलाकारांबरोबरसुद्धा मैत्री

"इप्टा' थिएटर या चित्रपट संस्थेशी अण्णा भाऊ साठे यांचा अत्यंत जवळचा संबंध होता. "चले जाव' आंदोलनाच्या दरम्यान 1942 मध्ये निर्माण करण्यात आलेली ही संस्था होती. लोकांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रीय एकात्मतेविषयी जागृती करणे हा या संस्थेचा महत्त्वाचा उद्देश होता. या संस्थेच्या स्थापनेमध्ये आणि कार्यामध्ये अण्णा भाऊ साठे अग्रभागी होते. अण्णा भाऊंची मराठी आणि हिंदीबरोबरच रशियन कलाकारांबरोबरसुद्धा मैत्री होती. यामध्ये रशियन कलाकार ऑलेजचा समावेश होतो. अण्णा भाऊ साठे चित्रपट कथाकार, कलाकार, दिग्दर्शक याबरोबरच एक उत्कृष्ट चित्रपट समीक्षक व रसिक प्रेक्षकसुद्धा होते. त्यांनी श्री. के. ए. अब्बास यांच्या "नया संसार' या चित्रपट संस्थेद्वारे प्रदर्शित झालेल्या "चार दिल चार राहें' या चित्रपटाची अतिशय उत्कृष्टपणे समीक्षा केलेली असून ती साप्ताहिक युगांतरमध्ये प्रकाशित झाली होती. 

के. ए. अब्बास यांची महत्त्वाची साथ

अण्णा भाऊ साठे यांनी चित्रपटसृष्टीमध्ये अशा प्रकारे अनेक यशस्वी भूमिका पार पाडल्या; परंतु त्यांना यामध्ये जम बसविता आला नाही. फकिरा चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अण्णा भाऊंनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. या कामी त्यांना के. ए. अब्बास यांची महत्त्वाची साथ मिळाली होती. चित्रपटसुद्धा अत्यंत उत्कृष्ट झालेला होता; परंतु हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर अण्णा भाऊंच्या काही मित्रांनी अशी सूचना केली, की हा आपला चित्रपट फार वाईट तयार झाला आहे. त्यामुळे तो चालणार नाही. त्यातून आपल्याला पैसाही मिळणार नाही. एवढेच नाही, तर या चित्रपटासाठी आपण ज्या लोकांचे कर्ज काढले आहे तेही फिटणार नाही. काढलेले कर्ज फिटले नाही तर आपणास तुरुंगवास भोगावा लागेल. तेव्हा चित्रपट फिल्म फायनान्सला देऊन टाकू, म्हणजे आपण कर्जमुक्त होऊ. आधीच गरिबीने वेढलेल्या अण्णा भाऊंनी त्यांचे म्हणणे मान्य केले आणि फकिरा चित्रपट फायनान्सला देऊन टाकला. 

सावळाची भूमिकाही उत्कृष्ट

अण्णा भाऊंचे दुर्दैव असे की, फकिरा चित्रपट खूप चालला, त्यातून फायनान्स बोर्डाला लाखो रुपयांचा नफा झाला. या व्यवहारात मित्रांनी आपल्याला फसविलं म्हणून अण्णा भाऊ मनाने दुःखी झाले. अण्णा भाऊंच्या कादंबऱ्यांवरील चित्रपट चांगले चालले. त्यावर खूप पैसा निर्मात्यांना व कलावंतांना मिळाला; पण अण्णा भाऊ कफल्लकच राहिले. चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत अण्णा भाऊ काहीच कमावू शकले नाहीत त्याला कारण एक तर त्यांचा स्वभाव मितभाषी होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या श्रमाचे मोल मिळाले नाही. एवढेच नव्हे, तर म्हणावी अशी प्रतिष्ठाही त्यांना लाभली नाही. फकिरा चित्रपटात त्यांनी केलेली सावळाची भूमिकाही उत्कृष्ट ठरली. दिग्दर्शनाच्या सेटिंग आणि टेकिंगमधील गती अण्णा भाऊंना कल्पनातीत असूनही केवळ दारिद्य्राने पिचल्यामुळे ते समर्थपणे स्वतंत्र असे चित्रपट काढू शकले नाहीत. असे असले तरी अण्णा भाऊ साठे यांची चित्रपटसृष्टीतील मुशाफिरी आणि त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये कलाकार, दिग्दर्शक, चित्रपट कथाकार, चित्रपट समीक्षक, चित्रपट रसिक म्हणून बजावलेली भूमिका आणि कार्य अनन्यसाधारण आहे. शिवाय ते आजही दिशादर्शक आणि उपयुक्त आहे.
Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख