पी.व्ही. नरसिंहराव : भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक 

व्ही .पी नरसिंह राव हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान. त्यांचं नाव समोर आलं की भारताच्या अर्थव्यवस्था डोळ्यासमोर उभी राहते. कॉंग्रेसविषयीची निष्ठा, मुरब्बीपणा दाखवून खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी राजकीय प्रवास केला.आज त्यांची जयंती. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख.
पी.व्ही. नरसिंहराव : भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक 

राव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी 28 जून 1921 रोजी झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अशा तीन विद्यापीठांमध्ये झाले. त्यांची मातृभाषा तेलगू असली तरी इंग्रजी, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी आदी भाषांवर त्यांचे वर्चस्व होते. मराठी तर उत्तम पद्धतीने बोलत. याला कारण असे आहे, की काही वर्षे रामटेक मतदारसंघातून (1984- 1989) निवडून आले होते. त्यामुळे नागपूर आणि मराठी माणसांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. 

कराडच्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी त्यांनी मराठीत केलेले भाषण कोणालाच विसरता येणार नाही. असे हे आगळं वेगळं आणि उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्व होते. 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. सर्वप्रथम ते 1962 मध्ये प्रथम केंद्रीय मंत्री झाले. पुढे त्यांनी अनेक खात्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळला. ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले. पण राव हनामकोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 


राव हे जरी राजकारणात असले तरी ते पंतप्रधान होतील असे कोणालाही ,किंबहुना त्यांनाही स्वप्नात वाटले नव्हते. राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी 1991 ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. याच निवडणुकी प्रचारादरम्यान माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतील पेरूबंदर येते 21 मे 1991 रोजी हत्या झाली. या निवडणुकीत कॉंग्रेसला 545 पैकी 241 जागाच मिळाल्या. बहुमताचा आकडा कॉंग्रेसला मिळाला नाही. त्यावेळी त्यांनी डाव्या पक्षांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केले खरे. पण, त्यांना सरकार चालविताना तारेवरची कसरत करावी लागली. 

त्यावेळी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा कॉंग्रेसच्या काही जेष्ठ नेत्यांनी व्यक्त केली .पण त्यांनी स्पष्टपणे पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला.शेवटी पंतप्रधानपद पीव्हींकडे चालत आले. राव यांच्याप्रमाणेच त्यावेळी पंतप्रधानपदाचे अनेक दावेदार पक्षात होते. वास्तविक राव हे पंतप्रधान बनल्यापासून कॉंग्रेसमधील मतभेद उघड होऊ लागले. प्रत्येक राज्यातील प्रस्तापित नेते राव यांच्या नेतृत्वावर खूश नव्हते. पण, पाच वर्षे त्यांनी सरकार चालविले हे मान्यच करावे लागले. 

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्यावर महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. काहीसे मितभाषी असलेल्या रावांची मात्र प्रशासनावर पकड होती. एक व्यासंगी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 

नरसिंह राव सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या सारख्या निष्णात अर्थतज्ज्ञाची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली. डॉ. मनमोहनसिंग यांनी महत्त्वाचे निर्णय घेऊन भारताला अधिक सशक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर टीकाही झाली पण, राव त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले. 

अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी 1992 मध्ये परकीय गुंतवणुकीला पोषक अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र याच वर्षात शेअर दलाला हर्षद मेहता आणि इतरांनी केलेला हजारो कोटींचा गैरव्यवहार उघडकीला आला. त्यानंतर उद्योगात आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले. 

नरसिंह राव सरकार शेअर बाजारातील घोटाळा वेळीच थांबवू शकले नाही असा आरोप करून लोकसभेतील सर्व विरोधकांनी सरकारविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला. तसेच त्यांच्याच काळात अयोध्येतील राम मंदिर आंदोलनही देशभर गाजले. पुढे 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी बाबरी मशीद जमीनदोस्त केली. देशात दंगली झाल्या, सर्वच तणाव होता. राव यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकार बाबरी मशीद वाचवू शकले नाही. या घटनेनंतर देशात पुढचे राजकारण काय घडले हे सर्वानाच ज्ञात आहे. 

देशाचे माजी पंतप्रधान राहिलेल्या नरसिंहराव यांना कॉंग्रेसने 1998च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. पुढे 23 डिसेंबर 2004 रोजी निधन झाले. एक स्वातंत्र्य सैनिक, कुशल आणि सुसंस्कृत राजकारणी अशीच राव यांची ओळख आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com