निसर्ग चक्रीवादळ, कोकण आणि शरद पवार.....

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतीवर आधारीत अर्थव्यवस्थेचा कणाच निसर्ग चक्रीवादाळाने मोडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकण दौरे केले; पण यात सगळ्यात जास्त चर्चेचा ठरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा दौरा. इतक्‍या वयात आणि कोरोनाचा संसर्ग कोकणात वाढत असतानाही पवार यांनी हा दौरा केला. हा 'जाणता नेता' पुन्हा एकदा कोकणच्या कृषीक्षेत्राचा तारणहार ठरणार का? हा कोकणवासीयांना पडलेला प्रश्‍न आहे.
Sharad Pawar Konkan Tour After Cyclone raised Hopes in Peoples Mind
Sharad Pawar Konkan Tour After Cyclone raised Hopes in Peoples Mind

'निसर्ग' चक्रीवादळ आले आणि होत्याचे नव्हते करून गेले. आंजर्ले (जि. रत्नागिरी) परिसरातील एका आपत्तीग्रस्ताने सांगितलेला किस्सा अंगावर शहारा आणणारा आहे. त्याने अगदी आपल्या जन्मापासून घरात बसून केवळ समुद्राची गाज ऐकली होती. कारण तिथे दाट नारळ, पोफळीच्या बागा होत्या. काही तासांसाठी ते चक्रीवादळ आले आणि सगळे उद्‌ध्वस्त करून केले. आता फक्‍त ते घर आणि समुद्रामध्ये कोसळलेल्या, उद्‌ध्वस्त झालेल्या झाडांचे अवशेष आहेत. घरात बसून दिसणारा निळाशार समुद्र त्या आपत्तीग्रस्ताला चिडवतो आहे. हीच स्थिती रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमधल्या अनेक गावामध्ये आहे. कित्येक शेतकरी पार कोलमडून गेले आहेत. 

गेले कित्येक पिढ्यांचा पोशींदा असलेल्या बागा अवघ्या काही तासांच्या वादळाने उद्‌ध्वस्त केल्या आहेत; पण या संकटाची कोरोनाच्या प्रभावामुळे म्हणावी तशी चर्चा झाली नाही. नेत्यांचे दौरे झाले, पॅकेज जाहीर झाले; पण यातून कोकणातला हा शेतकरी पुन्हा उभा राहिल का? हा प्रश्‍न मात्र सुटला नाही. या सगळ्या दौऱ्यात शरद पवार यांची कोकण भेट अधिक आत्मियतेची ठरली.

दौरा ठरला लक्षवेधी

संकटकाळात पवार मदतीला जातात. यात नवे काही नाही; मात्र इतके वय आणि कोरोना संसर्गाचा धोका असतानाही त्यांनी केलेला दौरा लक्षवेधी ठरला हे मात्र नक्की. त्याची कारणेही तशीच आहेत. पवार पश्‍चिम महाराष्ट्राचे म्हणून ओळखले जातात. पण तरीही कोकणातली कृषी क्रांती, इथल्या नारळ, सुपारी, आंबा, काजूच्या बागांचे बरेचसे श्रेय पवारांनाच जाते. मनीऑर्डर संस्कृती बदलण्यात या बागायतींचा मोठा वाटा आहे. ही बागायती, कोकण आणि पवार यांचे एक वेगळे नाते आहे.

पूर्वी खरिपाच्या काळात होणारी भात शेती अशीच कोकणची ओळख होती. सगळ्यात आधी या भागात बागायती रूजवायचा प्रयत्न तत्कालीन कृषीमंत्री बाळासाहेब सावंत यांनी केला. त्यांनी आणलेल्या फलोत्पादन योजनेत विशेषतः काजूच्या बिया शेतकऱ्यांना दिल्या जायच्या; पण बागायती विषयी जागृती झाली नव्हती. अनेकांनी या काजू बिया भाजून फोडून खाल्या. काहींनी त्या लावल्या आणि ते बागायतदार झाले. त्यातून पुढे अशा योजनेविषयी लोकांमध्ये जनजागृती झाली. पुढे शरद पवारांचा कार्यकाल सुरु झाला. अवघा महाराष्ट्र जाणणारा नेता, अशी त्यांची ओळख निर्माण झाली. कोकणातील गावोगाव त्यांना ओळखणारी आणि विशेष म्हणजे ते ओळखत असलेली कष्टकऱ्यांची फौज तयार होवू लागली. त्यांनी फलोत्पादन योजना आणली. शंभर टक्‍के अनुदान मिळायला लागले. यातून अनेक ठिकाणी पडीक जमिनीवर आंबा, काजूच्या बागा बहरल्या. 

गणपतीपुळे पर्यटन माॅडेलचे श्रेय पवारांचेच

शेकडो वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या नारळ, सुपारीच्या बागायतीचे क्षेत्र वाढीला लागले.  यालाच जोड म्हणून त्यांनी कोकण पर्यटनासाठीही प्रयत्न सुरू केले; पण हे प्रयत्न केवळ घोषणाबाजी नव्हती. आताच्या गणपतीपुळेच्या पर्यटन मॉडेलचे खूप मोठे श्रेय शरद पवार यांनाच जाते.

सावंतवाडीचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी याबाबत सांगितलेला किस्सा खूप काही सांगून जाणारा आहे. दळवी यांनी त्या काळात आंबोलीत आपल्या अन्य भागिदारांच्या मदतीने मोठे हॉटेल सुरू केले. या मागची प्रेरणा स्वतः पवार होते. जुन्या पिढीतील अनेक बागायती क्षेत्रे, तिथल्या वाटा, तिथली कष्टकरी माणसे शरद पवारांना तोंडपाठ होती. ही आख्यायिका नाही. याची प्रचिती २००३ मध्ये गणपतीपुळे येथे झालेल्या मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमाता तिथे उपस्थिती असलेल्यांना आली होती. काही जुने कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना पवारांनी स्वतः स्टेजजवळ केवळ बोलवलेच नाही तर त्यांच्या बागा कुठे आहेत, याचे वर्णनही केले होते. कोकणावर ओढवलेले संकट पाहून पवार कोकणवासीयांच्या भेटीला येणे या जिव्हाळ्यामुळे स्वभाविक आहे. पण आताची वेळ केवळ भावनिक भेटीपुरती मर्यादित नाही. 

हानीची व्याप्ती यावेळी मोठी

कोकणात या वादळाने  झालेले नुकसान इतर वेळच्या हानीपेक्षा वेगळे आहे. ऊस, द्राक्ष, कापूस आदी पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान प्रामुख्याने एक-दोन वर्षाशी संबंधीत असते. तेवढ्या काळात ते भरून येऊ शकते. मात्र निसर्ग चक्रीवादळाने उद्‌ध्वस्त केलेल्या नारळ, सुपारीच्या नुकसानीचा संबंध एका संपूर्ण पिढीशी आहे. नारळाचे एक झाड किमान दीड ते दोन पिढ्यांना उत्पन्न देते. सुपारी साधारण तीस ते चाळीस वर्षांपर्यंत फळ देते; मात्र बाग उभी करायची तर त्याला तब्बल एक तप जावे लागते. या १२ वर्षांच्या काळात हाती असतो तो केवळ खर्च आणि कष्ट. आज नुकसान झालेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांच्या बागा या त्यांच्याकडे काही पिढ्यांपासून आलेल्या होत्या. आता त्या पुन्हा उभ्या करण्यासाठी पुढची बारा वर्षे पैसा ओतायला लागेल आणि कष्टही करायला लागतील. त्यातच हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे ही झाडे उत्पन्न देईपर्यंत टिकतील का, हाही प्रश्‍न आहे.

शेतकऱ्यांना हवे पाठबळ

कोकणचा बळीराजा अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात अडकला आहे. केवळ एकरकमी पॅकेज देवून हा शेतकरी पुन्हा उभा राहील हे म्हणणे चुकीचे आहे. या नुकसानाकडे सरकारी नजरेतून न पाहता व्यावहारीक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. तो दृष्टीकोन ठेऊन पॅकेज व मदतीचा हात द्यायला हवा. कोकणात बागायती फुलवायला शरद पवार कारण ठरले होते. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी त्यांचेच पाठबळ मिळावे, ही कोकणवासियांची स्वाभाविक अपेक्षा आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com