आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे आणि 'कोरोना'शी युद्ध; नाही फक्त बोलाचीच कढी!

कोरोनाविरोधाची लढाई व्यक्तींच्या पातळीवरच लढून जिंकायची आहे. ही भावना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः एक कॅचलाईन तयार केली- 'मीच माझा रक्षक'. प्रत्येक वेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही ओळ उद्‌धृत केली. तिचा हॅशटॅग लोकप्रिय झाला. टोपे सांगतात, ही भावना सगळ्यांमध्ये रुजावी हीच आपली अपेक्षा आहे.
Maharashtra Health Minister Rajesh Tope Tough about fight with Corona
Maharashtra Health Minister Rajesh Tope Tough about fight with Corona

जेतवन. मलबार हिल भागातील हे आरोग्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान. सकाळचे ६ वाजले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दिवस सुरू झाला होता. उठल्यानंतर बंगल्याच्या आवारात त्यांनी चालण्याचा व्यायाम केला. दिवसभरातला हाच काय तो आरोग्यमंत्र्यांचा व्यायाम. यानंतर सुरू होणार होते ते फक्त युद्ध.

सकाळी ९च्या ठोक्‍याला ते बंगल्यातल्याच कार्यालयात हजर झाले. एरवी सकाळपासूनच बंगल्यावर अभ्यागतांची वर्दळ सुरू झालेली असते, पण आता कोरोनाकाळामुळे भेटायला येणारे फारसे नव्हतेच. त्यामुळे सरळच कामाला लागता येत होते. साहेब खुर्चीवर बसतात न बसतात तोच खासगी सचिवांनी त्यांच्यापुढे डायरी ठेवली. दिवसभरातल्या बैठका, पत्रकार परिषदा, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, आलेले निरोप यांची माहिती त्यांना दिली.

सततचे फोन

फोन सतत घणघणतच होते. राजकीय नेते, अधिकारी येथपासून राज्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंतचे हे फोन. एखादे आमदार आपल्या मतदारसंघातल्या कोरोना परिस्थितीमुळे चिंताग्रस्त होऊन औषधांची मागणी करीत होते. कोणी कार्यकर्ते वैद्यकीय साहित्याची मागणी करीत होते. राजेश टोपे जातीने ते कॉल घेत होते. माहितीची देवाण-घेवाण, समस्यांचे निराकरण सुरू होते. कामे मार्गी लावली जात होती. त्यात कटाक्ष हाच, की सध्याच्या या कठीण काळात कोणाचेही कायदेशीर काम अडता कामा नये.

चेहऱ्यावरची चिंता लपेना

आरोग्यमंत्री सगळ्यांना सांगत होते, की पॅनिक होऊ नका, जनतेला दिलासा द्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता काही लपून राहत नव्हती. त्या दिवशी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, संपादक यांच्याशी त्यांची चर्चा सुरू होती. कोरोनावर रामबाण औषध अजून सापडलेले नाही, तेव्हा प्रतिबंधाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी काय करता येईल यावर मंथन सुरू होते.

ही बैठक सुरू असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा फोन आला. त्यांच्याशी अर्धा तास बोलणे झाले. राज्याची परिस्थिती, वाढते रुग्ण, मृत्यूची संख्या, चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी आवश्‍यक त्या परवानग्या... नाना विषय. हा फोन ठेवतात न ठेवतात तोच मुख्यमंत्री कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगबाबत निरोप आला त्याच वेळी मास्क, सॅनिटायझर, व्हेंटिलेटर यांचे उत्पादक बैठकीसाठी आलेले होते. 

जेवणाची वेळही नाही येत पाळता

एव्हाना दुपारचे १.३० वाजून गेले होते. ही जेवणाची वेळ, पण एका वृत्तवाहिनीला नेमक्‍या याच वेळी आरोग्यमंत्र्यांची लाईव्ह मुलाखत हवी होती. नागरिकांना पुरेशी झोप आणि वेळेवर आहार घ्या असा संदेश देणारे राजेश टोपे स्वतः मात्र जेवण न करताच तिकडे मार्गस्थ झाले. अखेर योग्य आणि तथ्यपूर्ण माहिती लोकांपर्यंत जाणे हे महत्त्वाचे होते. कोरोनाचे संकट राज्यात आल्यापासून राजेश टोपे यांची याबाबत अगदी आग्रही भूमिका होती.

पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीतील चर्चा, महत्त्वाचे निर्णय, माहिती एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे आपल्या डायरीमध्ये नोंदवून घेणारे राजेश टोपे अनेकांनी पाहिलेले आहेत. एरवी वरवरची माहिती घेऊन, ठोकून देतो ऐसा जे ही अनेक राजकारण्यांची सवय, पण टोपे हे त्यापासून कटाक्षाने दूर राहिले. प्रसारमाध्यमांतून लोकांपर्यंत योग्य माहिती पोचणे आवश्‍यक आहे हे ओळखून ते वागत होते. लोकांना त्यातून आश्‍वस्त करीत होते. न थकता, चेहऱ्यावर ताण न दिसू देता बारीकसारीक माहितीही लोकांपुढे ठेवत होते. यातूनच अफवांना आळा बसत होता. नागरिकांचे मनोबलही कायम राहत होते.

वृत्तवाहिनीवरची मुलाखत वगैरे संपवून बंगल्यावर परतण्यास ४ वाजले होते. त्यांच्या खासगी स्वीय सहायकाने त्यांना वर्षा बंगल्यावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी जाण्याची आठवण करून दिली. तोच आतून जेवण तयार असल्याची वर्दी आली. आरोग्यमंत्र्यांनी घाईघाईने दोन घास खाल्ले आणि ते वर्षा बंगल्याकडे रवाना झाले.

आजारी आईलाही नाही देता आला वेळ

ते सांगत होते, आता तर राज्यातल्या नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी अंगावर आहे. त्यामुळे रात्रीचाही दिवस केला तरी वेळ कमी पडतो आणि त्यांची ही भावना म्हणजे केवळ 'बोलाचीच कढी' नव्हती. दोन महिने त्यांची आई रुग्णालयात होती, पण तिला भेटायला जायलाही त्यांना सवड मिळत नव्हती. कधी तरी वेळ मिळाला तरच तिला भेटायचे, नाही तर फोनवरून तब्येतीची विचारपूस करायची असे त्यांचे चालले होते. फार काय गेला सव्वा महिना ते जालन्याला असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनाही भेटलेले नाहीत. 

वर्षा बंगल्यावरून ते परतले तेव्हा रात्रीचे ८ वाजले होते. आल्याबरोबर त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. मधल्या काळात कार्यालयात आलेले महत्त्वाचे फोन, निरोप, कोरोना रुग्णांची ताजी माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यानुसार विभागाचे सचिव, संचालक यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांना सूचना दिल्या. सुमारे तास-दीड तास हे सुरू होते. त्यानंतर मग रुटीन काम. विभागाच्या विविध फायली, टपाल यांचा निपटारा करणे यास सुरुवात झाली. ते काम संपले तेव्हा रात्रीचे दीड वाजून गेलेले  होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com