राज ठाकरेंनी त्या रात्री दिलेला प्रस्ताव नारायण राणेंनी स्वीकारला असता तर... - If Narayan Rane had accepted the proposal made by Raj Thackeray that night ... | Politics Marathi News - Sarkarnama

राज ठाकरेंनी त्या रात्री दिलेला प्रस्ताव नारायण राणेंनी स्वीकारला असता तर...

योगेश कुटे
मंगळवार, 13 एप्रिल 2021

राजकारणात जर-तरच्या गोष्टींना अर्थ नसतो, हे खरे असले तरी अशा किश्श्यांची चर्चा करावीच लागते. 

राजकारणात शत्रू किंवा मित्र कायमचे नसतातच. पण माजी मुख्यमंत्री नारायण राणेंसाठी काही व्यक्ती या नेहमीच शत्रूपक्षाच्या यादीत दिसतात. या यादीत सर्वात वरचे नाव आहे ते विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे. त्यानंतर सुभाष देसाई, मनोहर जोशी, मिलिंद नार्वेकर, आदित्य ठाकरे आदींचा नंबर लागतो. यात आता वरुण सरदेसाई यांचेही नाव घेता येईल. पण याच राणेंचे ठाकरे घराण्यातील दुसऱ्या पातीशी चांगले संबंध आहेत. ते म्हणजे राज ठाकरे! या दोघांच्या वयात फरक असला तरी दोघांमध्ये मैत्रीचे धागे पक्के आहेत. अर्थात दोघांचा विरोधक एकच असणे, हे प्रमुख कारण असले तरी इतरही कारणांमुळे दोघांत सख्य आहेत.

उद्धवजींमुळे पुन्हा मुख्यमंत्रीपद नाही....

उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपली दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी 1999 मध्ये गेली, याची सल राणे यांना आजही कायम आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर मी परत मुख्यमंत्री झालो असतो तर परत शिवसेना-भाजपचे सरकार पाच वर्षे चालविले असते आणि महाराष्ट्राचा राजकीय इतिहास बदलला असता. पण उद्धव यांनी अशा काही खेळ्या खेळल्या की राणे यांचे मनसुबे धुळीस मिळाले. सेनेची सत्ता गेली तरी चालेल पण राणेंना परत मुख्यमंत्री करायचे नाही, असा चंगच उद्धव यांनी बांधला होता, असा राणेंचा सूर आहे. तेथूनच राणेंची शिवसेनेत घुसमट होऊ लागली. भाजप आणि गोपीनाथ मुंडे यांनीही असे काही डावपेच खेळले की मुख्यमंत्री होणारे राणे हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले. 1999 मध्ये काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले आणि विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले. देशमुख यांचे हे सरकार पाडण्याचा राणे यांनी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्याला उद्धव यांनी साथ दिली नसल्याची राणेंची तक्रार होती. त्यामुळे राणेंचे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले आणि राणे हे पक्षात नाराज झाले.

राणेंविरुद्ध कारवाया

दुसरीकडे त्यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद होते. या पदावरून त्यांना काढण्याच्या हालचाली उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई यांनी सुरू केल्याचे राणे यांच्या कानावर आले. आधीची नाराजी होतीच. त्यात थेट पदावरून काढणे म्हणजे आणखी अपमान. राणे यांनी या गोष्टी व्हायच्या आतच आधीच शिवसेनेतील उद्धव ठाकरेंच्या वर्तुळावर जाहीर हल्ला केला. त्यामुळे राणे हे शिवसेना सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. राणेंनी जुलै 2005 मध्ये विरोधी पक्षनेतेपदाचा, शिवसेनेचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिला. त्यावेळचा एक अनुभव राणे यांनी आपल्या `झंझावात` या आत्मचरित्रात सांगितला आहे. 

राणे यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेच्या 2003 मधील महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली. त्या ठरावाला अनुमोदन देण्याची जबाबदारी राज ठाकरे यांच्यावर होती. राज हे त्या नौटंकित का सहभागी झाले, हे मला आतापर्यंत कळाले नाही, असे राणेंनी लिहून ठेवले आहे. 

शेवटी तुम्हीसुद्धा ठाकरेच!

राणे हे जुलै 2005 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एके रात्री राज ठाकरे हे त्यांना भेटायला आले. त्याच वेळी राज यांनी आपणही शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट राणे यांच्याकडे केला. राणे यांच्या म्हणण्यानुसार राज यांच्या या निर्णयाचे तेव्हा मला अजिबातच आश्चर्य वाटले नाही. कारण मी बाहेर पडल्यानंतर राज यांच्याविरोधात शिवसेनेत कारवाया सुरू झाल्याचे मला कळाले होते. उद्धवजींमुळे राज यांचा भ्रमनिरास झाला होता. त्यामुळे राज यांची निराशा वाढत चालली होती. त्यांना पक्षात काही भवितव्य दिसेनासं झालं होतं. आपल्याला अनुल्लेखान मारलं जात असून नेता म्हणून पाहण्याऐवजी डोळ्यात घुसलेल्या कुसळाकडं पाहाव तसं पाहिलं जात असल्याचं दुःख त्यांना सलत होतं. माझा अनुभव वेगळा थोडाच होात, असे  राणेंनी लिहून ठेवले आहे. 

ही सारी चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी राणेंकडे एक प्रस्ताव ठेवला. दोघांनी मिळून एक पक्ष काढावा, असा प्रस्ताव राज यांनी मांडला. राज यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख व्यक्तिमत्व आणि माझा (राणे यांचा) सेना नेतृत्वाचा प्रदिर्घ अनुभव या जोरावर कडवे शिवसैनिक नक्की खेचले जातील, असे राज यांना वाटत होते.  

या सूचनेवर राणे यांनी लिहिले आहे की हे ऐकायला छान वाटत असलं तरीही मला पाय जमिनीवर ठेवणं भाग होतं. मी त्यांना म्हणालो, ``राज, मी एका ठाकरेंबरोबर सर्वस्व झोकून काम केलेलं आहे. ठाकरे कुटुंबात काम कसं चालतं, ते मला चांगल माहीत आहे. पुन्हा एकदा तसाच अनुभव घेण्याची माझी तयारी आहे, असं काही मला वाटत नाही. काही झालं तरी शेवटी बोलूनचालून तुम्ही ठाकरेच!``

हे सारे सविस्तरपणे लिहून राज आणि राणे एकत्र येणे कसे आणि का टाळले, हे राणेंनी स्पष्ट नोंदविले आहे. अर्थात यानंतरही राणे आणि राज यांचे संबंध चांगलेच राहिले. राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर तेथे पोटनिवडणूक झाली. ती शिवसेनेसाठी फार महत्वाची होती. तेव्हा राज हे सेनेसोबत होते. ते राणेंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी कणकवलीला निघालेही. मात्र अर्ध्या वाटेवरूनच ते परतले. राज यांना मी आजदेखील मित्र मानतो, असे राणे उगीच म्हणत नाही.

वाचा :

अजित पवारांना उपमुख्यमंत्री का व्हायचं नव्हत? याचा अफलातून किस्सा   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख