राजेंद्र भारूडांचं बोर्डावरचं नाव पाच मार्कांनी हुकलं पण अध्यक्ष म्हणून लागलं!

ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत चेअरमन म्हणून काम करायला मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, असे जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड यांनी सांगितलं.
District Collector Dr Rajendra Bharud wrote facbook post about his school journey
District Collector Dr Rajendra Bharud wrote facbook post about his school journey

पुणे : '2003 साली अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथील नवोदय विद्यालयाचा दहावीचा निकाल लागला. त्यावेळी मित्राला एक रुपयाचा कॉईन बॉक्स मधून फोन केला आणि त्याने निकाल सांगितला की 'राजा तुझं पाच मार्काने बोर्डावरचं नाव हुकलं तिसरा आलास.' नंदुरबारचे (Nandurbar) जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड (Dr Rajendra Bharud) यांनी  सांगितलेला हा प्रसंग...त्यानंतर काही वर्षांतच त्यांचे नाव याच शाळेच्या बोर्डावर अध्यक्ष म्हणून लागले. (District Collector Dr Rajendra Bharud wrote facbook post about his school journey)

कोरोना महामारीच्या काळात नंदुरबार जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॅा. राजेंद्र भारूड यांचे सर्वत्र कौतक होत आहे. ते मुळचे नंदुरबार जिल्ह्यातीलच असल्याने या मातीशी ते जोडले गेले आहेत. त्यामुळं लोकांना त्यांच्या भाषेत समजेल-उमजेल अशा भाषेत त्यांनी कोरोनाबाबतची इत्थंभूत माहिती लोकांपर्यंत पोहचवत त्यांची मनं जिंकली. पण या कोरोनामुळं दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या अन् डॅा. भारूड थेट आपल्या शाळेच्या आठवणींमध्ये रमले. 

डॅा. भारूड यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शाळेच्या आठवणी सांगत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही मोलाचे मार्गदर्शन केलं. ते लिहितात, '2003 साली अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथील नवोदय विद्यालय दहावी चा निकाल लागला, त्यावेळी माझ्या मित्राला एक रुपयाचा कॉईन बॉक्स मधून फोन केला आणि त्याने निकाल सांगितला की "राजा तुझं पाच मार्काने बोर्ड वरचे नाव हुकलं तिसरा आलास." खरं तर तिसरा क्रमांक आल्याचा आनंद होताच. परंतु आता बोर्डावर नाव राहणार नाही याचं थोडसं दुःख ही वाटत होतं.'

भारूडांनी सांगितली बोर्डवरची गोष्ट

'पहिला आलेल्या विद्यार्थ्यापेक्षा फक्त 5 मार्क कमी मिळाले आणि माझा तिसरा क्रमांक आला. जरी वर्गात गणित आणि विज्ञान मध्ये 100 पैकी 95 गुण दोन्ही विषयात मिळाले परंतु इतर तीन विषयात अक्षर खराब असल्यामुळे आणि इंग्रजी व्यवस्थित येत नसल्यामुळे माझं टॉपर्स बोर्ड वरती नाव आता येणार नव्हतं. 6 वी ला प्रवेश घेतल्यापासून प्रत्येक विद्यार्थ्याच हे नकळत स्वप्न होतं की आपलं नाव या शाळेच्या टॅापर्स बोर्ड वरती कोरल जावं, खरंतर बालमनात छोट्या छोटया काही गोष्टी कायम घर करुन जातात त्यातलीच ही बोर्डावरची गोष्ट होती', अशी भावना डॅा. भारूड यांनी व्यक्त केली आहे. 

अन् बोर्डावर नाव लिहिलं जाण्याचं स्वप्न पूर्ण झालं

खरंतर जेव्हाही प्राचार्यांच्या ऑफिस बाहेरून जायचो तेव्हा नकळत बाहेर लिहिलेल्या दरवर्षीच्या टॉपर्स बोर्ड वर नजर जायची. आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये रात्री नाईट स्टडी करत असताना जेव्हाही अभ्यासापासून ब्रेक घ्यायचा असेल तेव्हा सर्व मित्र त्या बोर्डाजवळ जाऊन बऱ्याच वेळ कोणाचा नंबर लागेल यावर चर्चा रंगायची. पण मला ही स्वप्नातही कल्पना नव्हती की आपलं नाव हे प्राचार्याच्या केबिन मधील बोर्डावर एक दिवस लिहिलं जाईल कारण प्राचार्यांच्या ऑफिसच्या मध्ये सुद्धा एक महत्त्वाचा बोर्ड असतो तो म्हणजे शाळेमधील चेअरमनचा आणि नवोदय विद्यालयाचा पदसिद्ध चेअरमन हा त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतो, असं भारूड यांनी म्हटलं आहे.

बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर (आंबा-परतूर) जालना येथे नवोदय विद्यालयात माझं ते बोर्डावर नाव लिहिल्या जाण्याचे स्वप्न पूर्ण झालं आणि निकाल लागल्यानंतर जेव्हा आम्ही शाळेत मार्कशीट घ्यायला गेलो तेव्हा बराच वेळ मी त्या बोर्डाकडे पाहत होतो. अक्कलकुवा नवोदय मधील ते स्व्प्न पूर्ण झाल्याचं मनस्वी आनंद वाटत होतं. परंतु ज्या शाळेत शिकलो त्या  जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करायला मिळेल  व त्याच नवोदय मधील शिक्षकांसोबत चेअरमन म्हणून काम करायला मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं.

मित्रांनो, तुम्हीही चेअरमनच्या बोर्डावर नाव कोरू शकता

ही पोस्ट लिहिण्याचा उद्देश सांगताना डॅा. भारूड यांनी म्हटलं आहे, की यावर्षी बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे मुले प्रचंड निराश आणि पुढे काय करावे या द्विधा मनस्थितीत आहे,  खरंतर  जेव्हा जीवन जगण्याचा व आयुष्याचा प्रश्न येतो तर इतर सर्व गोष्टी ह्या दुय्यम होऊन जातात. विद्यार्थीदशेत दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा हे आयुष्यातील एक खूप मोठं टर्निंग पॉईंट असत आणि त्या परीक्षेतील उत्कंठता, निकालाचा दिवस,  परीक्षेमधील अनुभव याची शिदोरीही कायमस्वरूपी राहते, कधी आपल्याला अपयश मिळतं तर कधी इच्छेप्रमाणे होत नाही.

मित्रांनो, आयुष्याचा विस्तार हा खूप मोठा आहे जर आपण एखादी गोष्ट प्रामाणिकपणे करत राहिलो तर कधी कधी आयुष्यात अपेक्षेपेक्षा सुद्धा चांगल्या गोष्टी हे नकळत आपल्याला मिळत असतात. म्हणून  या कठीण काळात सुद्धा आपली स्वप्न ही पेटत ठेवा, चांगल्या सवयींची जोड ठेवा, चांगली पुस्तक वाचा, चांगले विचारांची शिदोरी आपल्याजवळ बाळगा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले आरोग्य हे चांगले जपा.

आशा करूया की लवकरच सर्व काही पूर्ववत होईल आणि परत शाळेची घंटा वाजेल. कारण एखाद्यावेळी शाळेतल्या बोर्डावर नाव येणार नसेल परंतु नियतीने जर ठरवलं तर परिश्रमाच्या जोरावर आपण तिथल्या चेअरमनच्या बोर्डावर नाव कोरू शकतो. म्हणून सकारात्मक विचार बाळगा आणि ह्या कठीण प्रसंगाला आपण सर्वांनी धीराने सामना करूया, असे मार्गदर्शन करत डॅा. भारूड यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com