मोठ्या मनाचा नेता : `कर्मवीरां`च्या रयत संस्थेतील कर्मचाऱ्यांनी विरोधात काम केल्यावर यशवंतराव म्हणाले... - Birthday of Yashwantrao Chavan the sculptor of modern Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

मोठ्या मनाचा नेता : `कर्मवीरां`च्या रयत संस्थेतील कर्मचाऱ्यांनी विरोधात काम केल्यावर यशवंतराव म्हणाले...

डॉ. उल्हास उढाण 
गुरुवार, 11 मार्च 2021

"सत्तेचा वापर समाज परिवर्तनाचे एक साधन म्हणून केला पाहिजे," हे महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री, उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे ठाम मत होतं.   यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त...

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात ज्यांनी निस्वार्थपणे कार्य केलं त्यात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 'जिंकू अथवा मरू' या भावनेने स्वातंत्र्यलढ्यात जे तरुण उतरले त्यात यशवंतराव होते. "नका बाळांनो डगमगू सूर्य चंद्रावरील जाई ढगू" या जात्यावरील आपल्या आईची ओवी यशवंतरावांच्या जीवनाची प्रेरणा बनली. परिस्थिती कशीही असो आव्हाने कोणतीही असो जी माणसे प्रयत्न करतात, तीच माणसे मोठी होतात, हे यशवंतराव यांनी सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पिढ्यांना दाखवून दिले.

राजकारण किंवा राजकीय नेतृत्व हा केवळ लोक व्यवहार आहे. सत्ता मिळवण्यासाठी स्पर्धा आणि कुरघोड्या चालणारच पण मिळालेल्या सत्तेचा वापर समाज परिवर्तनाचे एक साधन म्हणून केला पाहिजे, हे यशवंतरावांचे ठाम मत होतं. सरकार हे हंगामी असते, योजनाबद्ध विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. हा विचार जनमानसात रुजला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती.

एक आदर्श लोकशाही समाज घडवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. विविध घटकातील मनुष्य स्वाभिमानाने आणि निर्भयपणे जगला पाहिजे. अन्न वस्त्र आणि निवारा या गरजे बरोबरच सर्वांगिन विकास करण्याची संधी त्याला मिळाली पाहिजे. यासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. यशवंतरावांच्या या स्पष्ट आणि स्वच्छ विचारा समोर आजचे राजकारणी कोणत्या चौकटीत बसतात हा एक संशोधनाचा विषय झाला आहे. यशवंतरावांनी येथील जाती, पाती आणि माती बरोबरच इथला माणूस पूर्णपणे जाणून घेतला होता. निसर्ग, इतिहास, संस्कृती, परंपरा यासंबंधी त्यांच्या मनात जिव्हाळा होता म्हणून देशाच्या राजकारणातील पंतप्रधानपद वगळता त्यांनी सर्वच पदे भूषवली परंतु धनसंपत्ती न कमवता जनसंपत्ती आणि ग्रंथसंपत्ती त्यांनी खूप कमवली. 

यशवंतरावांचे व्यक्तिमत्व विविधांगी होते. समाजाच्या विविध क्षेत्रातील माणसांची त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पैठण येथील दौऱ्यात एका वयोवृद्ध आजोबांनी त्यांना खाऊसाठी पैसे दिल्याची आठवण त्यांनी आवर्जून नोंदवली आहे. साध्या भोळ्या गरीब जनतेवर प्रेम करणारा हा सुसंस्कृत आणि दिलदार मनाचा मोठा नेता होता. एका निवडणुकीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध केला होता. निवडणूक जिंकल्यानंतर यशवंतरावांचे एक सहकारी आमदार संभाजी बाबा थोरात म्हणाले "साहेब, रयत शिक्षण संस्थेचा आपल्याला निवडणुकीत खूप मोठा त्रास झाला आहे. त्यांचा बंदोबस्त करायला हवा" तेव्हा यशवंतराव म्हणाले, असे करून चालणार नाही. कर्मवीर गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी खूप मोठं काम करत आहेत. ते आपल्याला का विरोध करत आहेत? आपलं कुठं चुकतंय ? हे समजावून घेऊनच त्यांचं मन जिंकलं पाहिजे. 

एवढा स्वच्छ विचार करणार हा नेता होता. त्यांच्या शेजारी कधीही भाटाला स्थान नव्हते, स्तुती आणि निंदा यांच्या पलीकडे जाऊन विचार करणारा हा नेता होता. माझी जर कोणी स्तुती केली तर माझ्या मनात भ्रम निर्माण होतो पण तसा मी स्तुतीला फसणारा माणूस नाही. स्तुतीला भाळणारा हा एक तर भोळा असतो नाही, तर अहंकारी असतो. आपली नाव सरळ चालवायचे असल्यास शिव्या देणारी माणसं अवती भोवती असली पाहिजेत, असं त्यांचं मत होतं. 

आज काही अपवाद वगळता भाट आणि दलाला शिवाय आजच्या राजकीय नेतृत्वाला करमत नाही. ही आजच्या राजकारणाची शोकांतिका आहे. मुजरा आणि गजरा यातच आजचं नेतृत्व वाहत आहे. यशवंतराव कलासक्त विचारवंत साहित्यिक ही होते. साहित्याचं मोल हे शस्त्रापेक्षा अधिक आहे, असं त्यांचं मत होतं. कारण विचार देणारं साहित्य हे बंदुकीच्या गोळी पेक्षा प्रभावशाली असते. सामर्थ्य हे विचारातून येते, संस्कारातून येते. समतोल, सर्वांगीण आणि दूरदृष्टीचा विचार करूनच त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात महत्वाचे निर्णय घेतले. 

आपल्या सहकाऱ्यांना आणि विरोधकांना ही मानाचं पान देणारे एक सुसंस्कृत नेतृत्व महाराष्ट्राने राज्याला आणि देशाला दिले याचा आपणा सर्वांना अभिमानच आहे. त्यांच्या जयंती  निमित्ताने त्यांच्या स्मृतीस आणि आदर्श विचारांना विनम्र अभिवादन!

- डॉ. उल्हास उढाण 
("यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचा आशय"या ग्रंथाचे लेखक आहेत.) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख