आता ‘महाविकास' चा ‘करेक्‍ट कार्यक्रम' होणार का?  - Will Devendra Fadnavis do 'Correct Program' of Mahavikas Aghadi government now? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

आता ‘महाविकास' चा ‘करेक्‍ट कार्यक्रम' होणार का? 

अभय दिवाणजी
सोमवार, 3 मे 2021

‘मी पुन्हा येईन’ प्रमाणे ती वल्गनाच ठरते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर  ः पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या समाधान आवताडे यांनी तीन हजार 733 मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याकडे आता लक्ष वेधले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारचा करेक्‍ट कार्यक्रम करण्याची त्यांची घोषणा प्रत्यक्षात येते की ‘मी पुन्हा येईन’ प्रमाणे ती वल्गनाच ठरते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी अन्‌ कॉंग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार सत्तारुढ झाले. त्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी प्रचंड आत्मविश्‍वासाने ‘मी पुन्हा येईन'चा नारा लावला होता. नंतर त्याचे हसे झाले ते वेगळे! परंतु त्यांच्या या वक्तव्याने विरोधी पक्षातील बडे नेते त्यांच्या गाळाला नक्कीच लागले. मुख्यमंत्री पदावरून भाजप-शिवसेनेत झालेली ताणाताणी नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मध्यस्थीने राज्यात सत्तारुढ झालेले महाविकास आघाडी सरकार हा सगळा इतिहास सर्वांनाच माहिती आहे.
 
परिचारकांनी आपला गट जीवंत ठेवला 
 
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार (कै.) भारत भालके यांनी भारतीय जनता पक्षाचे (रयत) उमेदवार तथा ज्येष्ठ नेते (कै.) सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव करीत ही जागा राखली होती. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी असताना कॉंग्रेसचा उमेदवार उभा होता. तरीही (कै.) भालके यांनी ही लढत 13 हजार 361 मतांच्या फरकाने जिंकली. 1978 मध्ये जनता पक्षाकडून निवडणूक हरल्यानंतर परिचारक गटाने कोणत्याच निवडणुकीत पराभव पाहिला नव्हता. हा पराभव परिचारक गटाच्या जिव्हारी लागला होता. त्यातच (कै.) भालके यांनी विजयी मिरवणुकीवेळी पहिलवानकी थाटात दंड थोपटून विरोधकांना खिजविले होते. यामुळे तर परिचारक गटाची नामुष्कीच झाली होती. प्रचंड पिछेहाट झाल्याची मानसिकता झालेल्या परिचारकांनी आपल्या गटाला जीवंत ठेवण्याचा कार्यक्रम सुरुच ठेवला होता. कारखानदारी, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रातून त्यांनी गटाला सतत संजीवनी देण्याचे काम केले. परंतु जिव्हारी लागणाऱ्या पराभवाचे उट्टे काढण्याचा मनसुबा मात्र कायम होता.

समाधान आवताडेंना उमेदवारी 

दरम्यान, प्रचंड जनसंपर्क असलेल्या (कै.) भारत भालके यांचे अकाली निधन झाले. त्यातून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली. परिचारक कुटुंबीयातील कोणाही सदस्यापेक्षा दोनवेळच्या निवडणुकीचा अनुभव असलेल्या मंगळवेढ्याच्या समाधान आवताडे या कंत्राटदाराची उमेदवारी त्यांनी पत्करली. त्यांची खेळी यशस्वी ठरली. इलेक्‍शन मॅनेजमेंटचा त्यांचा दांडगा अनुभव होता. गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी मिळवलेली मते पाहून त्यांना दोन्ही बाजूचे आवतण होते. भगिरथ भालके यांच्या रुपाने कायम विरोधक समोर उभा राहण्यापेक्षा मंगळवेढेकरांची सोबत कधीही चांगली असा त्यांचा होरा होता. अन्‌ झालेही तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भालके हे नवखे होते. वडिलांनी त्यांना राजकारणाचे धडेच दिले नव्हते. सहानुभूतीचा त्यांना लाभ मिळाला नाही. 

अजित पवारांनी भगीरथला मैदानात उतरवले

जयश्री भारत भालके यांना उमेदवारी देऊन सहानुभूती मिळविण्याची शरद पवार यांची योजना होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या मर्जीने भगीरथला मैदानात उतरवले. अजित पवारांसह मंत्रीमंडळच पंढरपुरात प्रचारासाठी धडकले होते. सामान्य कार्यकर्त्यांचेही उंबरठे झिजविण्यास मागेपुढे पाहिले गेले नाही. मोठ-मोठ्या सभा झाल्या. अनेक खोटे किस्सेही रंगवून सांगण्यात आले. आमदार प्रशांत परिचारक आणि आपलं ठरलंय. 15 तारखेला पहा असे सांगून आमदार संजय शिंदे यांनी या साऱ्या गोंधळात भरच टाकली होती. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे व आमदार संजय शिंदे यांच्याकडे भालकेंची जबाबदारी होती. पण अंतिम टप्प्यात बुथवरील यंत्रणा कामाला लावण्यात अडचणी आल्या.

भाजप आमदारांची संख्या एकाने वाढली

पोटनिवडणुकीच्या प्रचार कालावधीत भाजपकडूनही बड्या मातब्बरांनी हजेरी लावली. फडणवीस यांनीही मतदारसंघ पिंजून काढला. त्यावेळी त्यांनी ‘तुम्ही समाधानला निवडून द्या मी महाविकास आघाडीचा करेक्‍ट कार्यक्रम करतो,' अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली. आता प्रचंड अटीतटीच्या लढतीत समाधान आवताडे निवडून आले. जिल्ह्यात यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे चार आमदार होते. आता त्याची संख्या पाचवर गेली आहे. राज्यातही एकाने भाजपचे संख्याबळ वाढले तर राष्ट्रवादीचे कमी झाले आहे. त्यामुळे फडणवीस यांची घोषणा ही केवळ घोषणाच ठरते की राज्यात काही वेगळे वादळ घोंघावेल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 
 
तब्बल 40 वर्षांची प्रतीक्षा 

मंगळवेढा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन पंढरपूर व मंगळवेढा असा नवा मतदारसंघ तयार झाला. तब्बल 40 वर्षे मंगळवेढेकरांना हक्काचा आमदार मिळालाच नव्हता. येथील (कै.) कि. रा. मर्दा तथा मारवाडी वकिलांच्या रुपाने 40 वर्षांपूर्वी मंगळवेढ्यातील स्थानिकास संधी मिळाली होती. आता परिचारक-आवताडे युतीने मंगळवेढ्याची ही प्रतीक्षा दूर केली. मोहिते-पाटील विरुद्ध शिंदे असेच या लढतीला रुप देण्यात आले होते. या निवडीने मंगळवेढा भागातील प्रश्‍न सुटावेत अशी मतदारांची अपेक्षा आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख