Vishvambhar Chaudhary slams MLAs over blaming doctors amid corona crisis
Vishvambhar Chaudhary slams MLAs over blaming doctors amid corona crisis

आमदार गणपत गायकवाड, संतोष बांगर आणि वसंत मोरे यांना हे रुचेल का?

'आमदार ज्या ठिकाणी आमदार म्हणून काम करतातत्या ठिकाणी तर एखाद्या दवाखान्यात असतो त्यापेक्षा जास्त गोंधळ असतो.'

पुणे : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच हिंगोलीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी २० मिनिटांत रुग्णवाहिका आली नाही तर जाळून टाकीन असं वक्तव्य केलं होतं. तर पुण्यात मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या समर्थकांनी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांना एका पोस्टवरून मनसे स्टाईल कार्यक्रम करण्याचा इशारा दिला होता. चौधरी यांनी तिन्ही घटनांचा संदर्भ देत आज पुन्हा फेसबुक पोस्ट लिहित राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत. (Vishvambhar Chaudhary slams MLAs over blaming doctors amid corona crisis) 

विश्वंभर चौधरी यांनी सर्वच लोकप्रतिनिधींना उद्देशून काही प्रश्नही उपस्थित केले आहे आहेत. स्वतःच्या मनाला विचारून पहा की लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात 'आरोग्य व्यवस्थेसाठी बजेट वाढवा' असा आग्रह आपण धरला की पुतळे आणि स्मारकांसाठी आपलं लोकप्रतिनिधित्व झिजवलं? तुमच्या मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था किती सुधारली तुम्ही निवडून आल्यापासून?, असे चौधरी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच लोकप्रतिनिधी आमचं ऐकणार नाहीत. पक्षश्रेष्ठींनी सांगितलं तर कदाचित ऐकतील. कारण आम्हाला कोणत्या प्रकारचा समाज पाहिजे हे ठरवण्याचे हक्क आम्ही तुमच्याकडे गहाण ठेवले आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

चौधरी यांनी काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?

आमदार गायकवाड यांच्याकडून कर्मचाऱ्यांना झालेल्या दमदाटीची बातमी पाहिल्यानंतर त्यावर पोस्ट लिहावी की नाही या संभ्रमात आहे. कारण  मागच्याच आठवड्यात खूप मनस्ताप सहन करावा लागलेला आहे. हिंगोलीच्या शिवसेना आमदारांनी  २० मिनिटांत ॲम्ब्युलन्स आली नाही तर ॲम्ब्युलन्स जाळून टाकीन असं वक्तव्य केल्याची बातमी पाहून मी पोस्ट लिहीली होती की, नेत्यांनी दमदाटी केली तर आयपीसी नुसार गुन्हा दाखल करावा. हे लिहिताना मनसे नगरसेवक वसंत मोरे यांची कोणतीही पोस्ट मी पाहिलेली नव्हती. मी त्यांना फेसबुकवर फॅालो करत नाही. त्यामुळे त्यांची पोस्ट पाहण्याचा संबंधही येत नाही.

पण माझी पोस्ट त्यांच्यावर लिहिलेली आहे असा त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी त्याबद्दल मला उद्देशून पोस्ट लिहीली. इथपर्यंत ठीक आहे पण त्यानंतर त्यांच्या फेसबुक समर्थकांनी ज्याप्रकारच्या शिव्या लिहील्या त्या मनस्ताप देणाऱ्या होत्या. अगदी 'मनसे स्टाईल कार्यक्रम' करण्यापर्यंत (म्हणजे कदाचित मला मारझोड) प्रतिक्रिया आल्या. एक बरं झालं की मनसेचे लोक ट्रोल करत नाहीत असा जो गैरसमज होता तो दूर झाला. असो. तर म्हणून आताही गणपत गायकवाडांच्या वागण्यावर शिव्या सहन करण्याची तयारी ठेऊन ही पोस्ट लिहित असल्याचे चौधरी यांनी म्हटलं आहे. 

प्रत्येक दवाखान्यातले डॅाक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय स्टाफ प्रचंड मानसिक तणावातून जात आहेत. माझ्या ओळखीतले बहुतेक सरकारी डॅाक्टर्स सध्या सोळा सोळा- वीस वीस तास सतत काम करत आहेत. दवाखान्यांमध्ये आमदारांनी धिंगाणा केल्यानं काहीच साधणार नाही. त्याचे परिणाम मात्र खूप असतात. एका खाजगी दवाखान्यातील डॅाक्टरांवर पाच सहा वर्षांपूर्वी आमचा पेशंट दगावला म्हणून नातेवाईकांनी हल्ला केला होता.

प्रकरण कालांतरानं शांत झालं पण त्या डॅाक्टरांची मुलगी आणि मुलगा दोघंही डॅाक्टर. दोघांनी परदेशाचा रस्ता धरला. डॅाक्टरांनी  स्वतः रिटायरमेंट घेतली. भारतात उत्तम सेवा देऊ शकणारे तीन डॅाक्टर कमी झाले. डॅाक्टरांचं मोठं शॅार्टेज आहे. सवासौ करोड पब्लिक आहे आणि त्यांना ठीक करण्यासाठी फक्त अठरा लाख डॅाक्टर आहेत. हे असंच चालत राहिलं तर लोकांना सेवा देण्याचा उत्साहही राहणार नाही आणि हिंमतही राहणार नाही या क्षेत्रातल्या लोकांची, अशी भीती चौधरी यांनी व्यक्त केली आहे. 

आमदार ज्या ठिकाणी आमदार म्हणून काम करता त्या ठिकाणी तर एखाद्या दवाखान्यात असतो त्यापेक्षा जास्त गोंधळ असतो. दवाखान्यात लोक एकमेकांचं बोललेलं ऐकू शकतात, विधिमंडळात कधी कधी ऐकू पण शकत नाहीत. आणि ज्या जनतेसाठी विधीमंडळ आहे त्या जनतेचा आवाज तर कधीच ऐकला जात नाही.  भारतात कोणतीच व्यवस्था गोंधळविरहीत नाही. असू शकत नाही. फक्त तुम्ही राजकारणी आहात म्हणून इतरांना अश्याप्रकारे दमदाटी करू शकत नाही. असा कोणताही विशेष हक्क कायद्यानं कोणत्या लोकप्रतिनिधीला दिलेला नाही.

डॅाक्टरांवर ओरडू नका, स्वतःवर ओरडा. स्वतःच्या मनाला विचारून पहा की लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात 'आरोग्य व्यवस्थेसाठी बजेट वाढवा'असा आग्रह आपण धरला की पुतळे आणि स्मारकांसाठी आपलं लोकप्रतिनिधित्व झिजवलं?   तुमच्या मतदारसंघातली आरोग्य व्यवस्था किती सुधरली तुम्ही निवडून आल्यापासून? लोकप्रतिनिधी आमचं ऐकणार नाहीत. पक्षश्रेष्ठींनी सांगितलं तर कदाचित ऐकतील. कारण आम्हाला कोणत्या प्रकारचा समाज पाहिजे हे ठरवण्याचे हक्क आम्ही तुमच्याकडे गहाण ठेवले आहेत, असा संताप चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com