सरकारी नोकरभरतीला मराठा समाजाने विरोध करु नये - Maratha Community Should not oppose Police Recruitment Say Pravin Gaikwad | Politics Marathi News - Sarkarnama

सरकारी नोकरभरतीला मराठा समाजाने विरोध करु नये

प्रवीण गायकवाड,  प्रदेशाध्यक्ष, मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेड
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

मराठा समाजाच्या SEBC आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने संबंधित पोलीस भरतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण लागू असणार नाही, या कारणास्तव मराठा समाजातील काही नेते आणि संघटना शासनाच्या पोलिस भरतीला विरोध करत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय शासनाने ही भरती घेऊ नये, ही भरती पुढे ढकलावी अशी मागणी करत आहेत. परंतु ही मागणी मराठा कुणबी समाजाचे नुकसान करणारी ठरु शकते, असे माझे मत आहे

पुणे : मराठा-कुणबी समाज हा पूर्वीपासूनच लढवय्या समाज आहे. साधारणपणे शेती करणाऱ्यांना कुणबी मानले जाते आणि शिवकाळात कुणब्यांमधील जे लोक सैन्यात मावळा म्हणून मुलूखगिरी करायचे त्यांना मराठा मानले जाऊ जायचे. थोडक्यात शेतीशी निगडित असणाऱ्या मराठा-कुणबी समाजाला सैन्यात भरती होऊन संरक्षण करण्याची ओढ ही नैसर्गिक आहे. 

आजच्या काळात संरक्षणाची जबाबदारी राज्यामध्ये पोलीस खात्याकडे असते. त्या अनुषंगाने राज्य शासन आपल्या पोलीस विभागात नोकरभरती करत असते. नुकताच महाराष्ट्र सरकारने राज्यात १२५०० पोलीस पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मराठा समाजाच्या SEBC आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने संबंधित पोलीस भरतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण लागू असणार नाही, या कारणास्तव मराठा समाजातील काही नेते आणि संघटना शासनाच्या पोलिस भरतीला विरोध करत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय शासनाने ही भरती घेऊ नये, ही भरती पुढे ढकलावी अशी मागणी करत आहेत. परंतु ही मागणी मराठा कुणबी समाजाचे नुकसान करणारी ठरु शकते, असे माझे मत आहे.

मान्य आहे की सुप्रीम कोर्टाने SEBC ला स्थगिती दिली आहे, परंतु ही स्थगिती कधी उठेल किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय SEBC च्या बाजूने येईल याची नेमकी कुणालाही खात्री नाही. EWS आरक्षणाचा पर्याय मराठा समाजापुढे आहे. एकवेळ SEBC आणि EWS या दोन्ही गोष्टी आपण काही काळ बाजूला ठेऊन वास्तवावर बोलूया.

दिवंगत आर.आर.पाटील गृहमंत्री असतानाच्या काळापासून झालेल्या पोलीस भरतींचा आपण आढावा घेतला तर एक गोष्ट आपल्या सहज लक्षात येते, ती अशी की महाराष्ट्र राज्यात सरकारी पोलीस भरती ही खुल्या गटातील मराठा आणि आरक्षित गटातील कुणबी समाजाला सर्वाधिक नोकऱ्या देणारी नोकरभरती आहे.

आरक्षण नसतानाही खुल्या वर्गातून मराठा आणि आरक्षण असल्याने आरक्षित वर्गातून कुणबी समाजाचे साधारणपणे ३५-४०% तरुण पोलिसात भरती होतात. दैनंदिन जीवनातही ज्यावेळी आपला पोलिसांशी संबंध येतो त्यावेळी आपल्याला हे अनुभवायला येते. 

राज्यातील पोलीस भरती ही केवळ मराठा-कुणबीच नाही तर सर्व जातीधर्माच्या घटकांना रोजगाराची एक संधी असते. केवळ SEBC च्या निर्णयावर विसंबून राहून आपल्याच तरुणांच्या हाताशी आलेली संधी लाथाडणे योग्य नाही. असे करुन आपण आपल्याच तरुणांच्या पायावर कुऱ्हाड मारतोय का याचा विचार करायला हवा.

आज घडीला मराठा-कुणबी समाजातील जे तरुण वयोमर्यादेच्या काठावर आहेत त्यांचाही थोडा विचार करा. फडणवीस सरकारच्या काळापासून सर्वच समाजातील तरुण पोलीस भरतीची वाट पाहत आहेत. या तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये जाऊन तुम्ही थोडा कानोसा घेतला तरी तुमच्या लक्षात येईल की SEBC च्या नावाखाली या भरतीला विरोध केल्याने खुल्या प्रवर्गातून तयारी करणाऱ्या मराठा आणि आरक्षित प्रवर्गातून तयारी करणाऱ्या कुणबी या आपल्याच समाजातील तरुणांमध्ये रोष पसरत आहे. त्यासोबतच मराठा समाजाच्या मागणीमुळे SC, ST आणि OBC घटकांतील जे तरुण गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरतीची वाट पाहत आहेत, त्यांच्यातही रोष पसरत आहे.

सर्वोच्च न्यायालयात अडकलेल्या १३% SEBC आरक्षणाचा निकाल कधी लागेल याची खात्री नसताना, आपल्या ३५-४०% मराठा-कुणबी समाजाला पोलीस भरतीची जी संधी आली आहे ती घालवू नये. त्यामुळे आजच्या स्थितीत मराठा समाजाने सरकारी पोलीस भरतीला विरोध करु नये असे मला वाटते.

Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख