ज्योतिरादित्य, सचिन पायलट मुख्यमंत्री असते तर... ? 

कॉंग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट आणि माधवरावर शिंदे यांनी आपले संपूर्ण आयुष्य पक्षासाठी खर्ची केले. हे दोघेही महत्वाकांक्षी होते. त्यांच्यामध्ये पक्षाध्यक्षपदासाठी स्पर्धाही होती. दुर्दुैवाने या दोन्ही नेत्यांचा अपघाती मृत्यू झाला. या दोन्ही नेत्यांपैकी माधवरावांचे पुत्र ज्योतिरादित्य भाजपत दाखल झाले आहेत. आता सचिन पायलट भाजपच्या वाटेवर आहेत. कॉंग्रेसला हा मोठा धक्का आहे.
ज्योतिरादित्य, सचिन पायलट मुख्यमंत्री असते तर... ? 

केंद्रातील मोदी सरकारसमोर गुडघे न टेकल्याबद्दल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजयसिंह यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची प्रशंसा केली होती. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मवाळ पवित्रा भूमिका घेणारे कोणते नेते आहेत, ते पक्षासोबत असतील आणि त्यांच्यात हिंमत असेल तर जाहीरपणे बोलण्याची त्यांनी हिंमत दाखवावी, असे आव्हानही त्यांनी पक्षातील नेत्यांना दिले आहे. 

पंतप्रधान मोदींना खुले आव्हान देणारे नेते राहुल गांधी आहेत. त्यांनी पक्षाध्यक्ष किंवा कॉंग्रेस संसदीय पक्षनेता बनून कॉंग्रेस बळकट करण्याचे काम करायला हवे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. 

कॉंग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी पक्षिय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत ही चांगलीच गोष्ट आहे. पण, त्याच कॉंग्रेसमध्ये ज्येष्ठ आणि युवा नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असतो हे कधी लपून राहिले नाही. यापूर्वी मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेसचा हात झटकला आणि थेट भाजपमध्येच प्रवेश केला. कमलनाथ मुख्यमंत्री बनल्यापासून ते काहीसे नाराज होते. तर ज्योतिरादित्यवर राहुल नाराज होते. मुख्यमंत्री कोणाला करायचे ? हा प्रश्‍न जेव्हा पुढे आला तेव्हा राहुल यांनी कमलनाथांच्याच पारड्यात वजन टाकले. 

जे मध्यप्रदेशमध्ये घडले तेच राजस्थानातही. तेथेही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री केल्यानंतर पायलट हे रुसले होते. त्यांनाही वाटत होते की आपणास मुख्यमंत्री केले जाईल. खरे तर त्यावेळी पायलट यांना मुख्यमंत्री करायला हवे होते हे संपूर्ण देशातील तरूणाईला वाटत होते. पण, जे लोकांना वाटते ते कॉंग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना वाटते असे कधी होत नाही. 

राजस्थानचा विचार केला तर असे लक्षात येईल की येथे सत्ता येण्यापूर्वी सचिन पायलट हे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी पक्षाची बांधणी मजबूत केली होती. भाजपच्या तत्कालिन मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या कारभारावर सडकून टीका करीत. राज्यभर त्यांनी भाजपविरोधात जनमत तयार केले होते. दिल्ली सोडून ते राजस्थानात आले. मात्र जेव्हा सत्ता आली तेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवले. त्यामुळे पायलट हे नाराज होणे स्वाभाविक आहे.

पायलट काय किंवा गेहलोत काय दोघेही कॉंग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत. गेहलोत यांच्याविषयी मत चांगले आहेत. त्यांच्याकडे राजकारणातील जादूगार म्हणून पाहिले जाते. मात्र प्रत्येकवेळी जादू चालेलच याची खात्री देता येत नाही. काही असले तरी पायलट यांच्यावर अन्यायच झाला असे राजकीय तज्ज्ञांनाही वाटते. पक्षासाठी खस्ता खाऊनही न्याय मिळत नाही असे पायलट यांना वाटत आहे. त्यामुळेच सत्ता स्थापनेपासूनच नाराजी नाट्य सुरू होते. ते आजही थांबले नाही. पक्षाला ते नेहमीच महत्व देत आले. कॉंग्रेसला राजस्थानात "अच्छे दिन' त्यांनी आणले होते याचे श्रेय त्यांना द्यावेच लागले.  

मध्यप्रदेश, राजस्थान या दोन्ही राज्याचा विचार केला तर ज्योतिरादित्य आणि सचिन पायलट यांना राहुल गांधी मुख्यमंत्री करतील. तरूणांना संधी देतील असे वाटले होते. गेहलोत तर दहा वर्षाहून अधिक काळ राजस्थानचे मुख्यमंत्री होते. केंद्रातही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. पक्षातही त्यांनी मोठ्या पदावर काम केले होते. म्हणजेच त्यांना आजपर्यंत पक्षाने भरपूर दिले होते. पुन्हा मुख्यमंत्री न बनता पायलटना संधी द्यायला हवी होती. झाले मात्र तसे नाही.

शेवटी राजकारण हे जातीपातीच्या समीकरणावरही चालते. गणितं ठरलेली असतात. तसा विचारही केला जातो. हे खरे असले तरी आता राजकारणात कर्तृत्वालाही महत्त्व आहे. एखाद्या नेता अमूक जातीचा असतो. त्याच्या जातीची लोकसंख्या दोन चार टक्केही नसते तरीही त्याची ताकद असते. ते नेतृत्व करतात. तशी अनेक उदाहरणेही देता येतील. 

सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधीच्या टीममधील अतिशय विश्वासू नेते होते. कदाचित राहुलना त्यावेळी असे वाटलेही असेल की पायलट-शिंदे हे आपल्याबरोबर राहिले तर तुलनेने ते राष्ट्रीयस्तरावर अधिक काम करतील. मोदी सरकारवरविरोधात लढतील. तसेच साठी ओलांडलेले कमलनाथ आणि गेहलोत हे पाच वर्षे राज्य करतील. त्यानंतर ते काही राजकारणात तरूणांसारखे सक्रिय राहणार नाहीत. 

गेहलोत-कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनविले गेले यासाठी की तेथे काठावरचे बहुमत होते. या दोन्ही राज्यात भाजप काही ही सरकारे पाडू शकली नाही. कॉंग्रेसनेच कॉंग्रेसची सरकारे अडचणीत आणली आहेत. ज्योतिरादित्यमुळे कमलनाथ सरकार कोसळले तर पायलटांमुळे गेहलोत सरकार अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. ते कधीही कोसळू शकते. पायलटनी ठरविले की पाडायचे तर ते पडलेच म्हणून समजा. म्हणजेच पायलट आणि शिंदे यांचाही एक गट सक्रिय आहे. त्यांच्याकडे स्वत:चे आमदार आहेत आणि अशा गटांना पक्षाशी काही देणंघेणं नसते. नेता म्हटला पडा बाहेर तर पडलेच म्हणून समजा ! राजस्थानातही तेच दिसत आहे.

 राजस्थानात तर सत्ता स्थापनेपासूनच रुसवे फुगवे सुरू होते. गेहलोत आणि पायलट हे एकमेकांना पाण्यात पाहत होते. शहकाटशहाचे राजकारण सुरू आहे. ज्यावेळी ज्योतिरादित्य बाहेर पडले त्याचवेळी पायलट कधी बाहेर पडणार याची चर्चाही देशभर सुरू होती. ती वेळ आज दिसते. आज ते पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करतील. त्यांच्या समजूत काढतील का ? गेहलोत ऐवजी पायलट मुख्यमंत्री होतील ? की सरकार पडणार ? याची मात्र आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

मध्यप्रदेशप्रमाणे राजस्थानातही कॉंग्रेसचे काही खरे दिसत नाही. तेथे सत्ता टिकवायची असेल तर तरूण चेहऱ्याला संधी पक्षाने द्यायला हवी असे वाटते. मध्यप्रदेशसारखे राजस्थानात होऊ द्यायचे नसेल तर कॉंग्रेसने जपून पाऊल टाकले पाहिजे. काही असो ज्योतिरादित्य आणि पायलट यांना मुख्यमंत्री करायला हवे होते अशी जनभावना आजही आहे. 

ज्योतिरादित्य आज भाजपमध्ये असले तरी कॉंग्रेसमध्येच ते अधिक शोभून दिसत होते अशी चर्चाही नेहमीच होताना दिसते. शेवटी एक नेता घडवायला वर्षोनवर्षे लागतात त्याला तोडणे, दूर लोटणे सोपे असले तरी पक्षाची फार मोठी हानी होत असते हा अनुभव सर्वच पक्षांना कमीअधिक प्रमाणात असतो. म्हणूनच पायलट यांच्यासारखा नेता कॉंग्रेसमध्येच हवा असे आजही लोकांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. 

कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा राहुल गांधींच्या पक्षाध्यक्षपदाच्या मागणीने जोर धरला आहे. सोनिया गांधींनी बोलावलेल्या कॉंग्रेस खासदारांच्या बैठकीत ही मागणी आणखी एकदा पुढे आली असताना कॉंग्रेसची सत्ता असलेली एक एक राज्य हातातून जात आहेत याचा विचारही पक्ष नेतृत्वाला करावा लागले. शेवटी राजकारणात सत्तेलाच महत्त्व असते निष्ठा जपणारे दुर्मिळ होत आहेत. 

दिग्वीजयसिंह वाचाळविर म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांच्या कॉंग्रेस निष्ठेवर कोणीही शंका घेणार नाही हे ही खरे ! तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कॉंग्रेसची मला चिंता वाटते असे म्हटले आहे. यातच सर्व काही आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com