गणेश नाईकांच्या पोरांना जे जमले नाही ते श्रीकांत शिंदेंनी करून दाखवलं का ? 

गणेश नाईक यांचे दोन पुत्र आणि एक पुतण्या राजकारणात आहेत पण, त्यांनी वडिलांनी केलेल्या रुग्णसेवेचा वारसा चालविला नाही. तो वारसा आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे चालवित आहेत असे म्हणावे लागेल.
गणेश नाईकांच्या पोरांना जे जमले नाही ते श्रीकांत शिंदेंनी करून दाखवलं का ? 


पुणे : कॉंग्रेस राजवटीत महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्री होत्या पुष्पाताई हिरे. त्यांच्या हस्ते सत्कार होणार होता. शिवसेनेचे तत्कालिन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा. हे कसे काय असे कोणालाही वाटेल ! पण, हे सत्य आहे. 

दिघे यांनी महाराष्ट्राला जेव्हा रक्ताची गरज होती. त्यावेळी एकट्या ठाणे जिल्ह्यातून रेकॉर्ड ब्रेक रक्त संकलन केले होते. या रक्ताच्या बाटल्या महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे सोपविण्यात आल्या होत्या. त्याबद्दल दिघेंचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. म्हणजेच जे कॉंग्रेसला जमले नव्हते ते शिवसेनेने करून दाखविले होते. 

वास्तविक या घटनेला आता काही वर्षे उलटून गेले आहेत. आज तर दिघेही आपल्यात नाहीत. बॉम्बस्फोट असो की किंवा इतर धक्कादायक घटना. जेव्हा रक्ताची गरज लागते तेव्हा शिवसेना आणि त्यांचे कार्यकर्ते आघाडीवर असतात हे कधी लपून राहिले नाही. रुग्णसेवेचेही तसेच आहेत. आज भाजपत असले तरी नवी मुंबईचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनीही रग्णांच्या सेवेसाठी शेकडो रुग्णवाहिकांचे मोफत वाटत केले होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जितकी वर्षे होतील. तितक्‍या रुग्णवाहिका मी मोफत देणार आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. शिवसेनेत असेपर्यंत त्यांनी ते करून दाखविले. पण, पुढे शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि त्यामध्ये खंड पडला. त्यांनी जरी शिवसेना सोडली होती तरी ते जे म्हणाले होते ते सुरू ठेवायला पाहिजे होते असे आजही वाटते. 

एकेकाळचा ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते बलाढ्य नेते म्हणजे या पक्षाची मोठी शकती होती. मो. दा. जोशी, साबीरभाई शेख, सतीश प्रधान, गणेश नाईक, आनंद दिघे यांच्यासारखे नेते शिवसेनेला लाभल्याने हा जिल्हा भगवामय झाला होता. पुढे फाटाफुटी आणि अंतर्गत मतभेदामुळे गणेश नाईकांसारखे सामर्थ्यशाली नेते कॉंग्रेसमध्ये आणि पुढे राष्ट्रवादीत गेले. आज ते भाजपत आहेत. जिल्ह्यातील नेत्यांवर बाळासाहेबांचा खूप विश्वास होता. 

आज खासदार श्रीकांत शिंदेमुळे गणेश नाईकांचीही आठवण झाली. नाईक शिवसेनेत असताना त्यांची श्रमिक सेना नावाची कामगार संघटना होती. खूपच वजनदार नेते आणि नवी मुंबईचा वाघ अशी त्यांची प्रतिमा बनली होती. या वाघाने श्रमिक सेनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्‍याला एक रुग्णवाहिका मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. प्रारंभी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांना मोफत रुग्णवाहिका दिल्या. गरीब आणि गरजुंना मोफत सेवा देण्याचा त्यामागे उद्देश होता. 

शिवसेनेच्या हा रुग्णवाहिकांनी लोकांची सेवा केली हे नाकारून चालणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ अभिनेत्री डिंमल कपाडिया यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात त्यांनी त्यावेळी पन्नास की साठ रुग्ण वाहिका दिल्या होत्या. त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचल्या होत्या. रुग्णवाहिका, नवी मुंबई आणि गणेश नाईक अशी व्याख्याच बनली होती. राजकारणात आजपर्यंत सर्वाधिक रुग्णवाहिका कोणी दिल्या असे विचारले तर थेट नाईकांकडे बोट जाते. 

नाईक आज शिवसेनेत नाहीत. आनंद दिघेही देवाघरी गेले आहेत. मंत्री एकनाथ शिंदे हे दिघेंचा वारसा चालवित आहेत. आज ठाणे आणि पालघर जिल्ह्यात त्यांचा दबदबा आहे. शिंदे हे नाईकांचे कधीच समर्थक नव्हते. ते नेहमीच दिघेंचे शिलेदार राहिले.

त्यांची तिच ओळख आहे. मात्र योगायोगाने गणेश नाईक यांचे दोन पुत्र आणि एक पुतण्या राजकारणात आहेत पण, त्यांनी वडिलांनी केलेल्या रुग्णसेवेचा वारसा चालविला नाही. तो वारसा आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे चालवित आहेत असे म्हणावे लागेल. 

शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज तीस रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले आहे. हा कार्यक्रम आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता. एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदेही उद्धव ठाकरेंच्या वयाऐवढ्या रुग्णवाहिका भविष्यात देणार का ? याचीही उत्सुकता यानिमित्त्याने आहे. की उगवत्या ताराच महत्वाचे हे पाहावे लागेल. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com