चर्चा फक्त एकनाथ खडसेंच्या ‘राष्ट्रवादी' प्रवेशाचीच’!

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय मांडणीतून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. भाजपने मांडलेला सारिपाट उधळला. भाजपला त्याचा पहिला राजकीय शॉक श्री. खडसे यांच्या शुक्रवारी होणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षप्रवेशाने बसणार आहे. त्यामुळे कालपर्यंत चर्चेतही नव्हती, अशा अंजली दमानिया यांच्यापासून तर अनेक मंडळी पुन्हा प्रकट झाली आहेत
Ekanath Khadse
Ekanath Khadse

भारतीय जनता पक्षाला राम राम ठोकल्यानंतर आज (ता.२३) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर अनेक खडसे समर्थकांचे फोन गुरुवार स्वीचऑफ झाले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अपेक्षीत मात्र सर्वांत मोठी राजकीय उलथा पालथ मानली जाते. त्यामुळे काल विविध आघाड्यांवर केवळ एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रवेशाचीच चर्चा होती.

राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार याशिवाय वेगळे काही घडेल, अशी कल्पना जरी मांडली तरी ती लगेच खोडली जाईल, अशी स्थिती गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी होती. त्यात श्री. खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. तरीही, फडणविसांच्या गुड बुकमध्ये त्यांना स्थान नव्हते. त्यातही जळगावसह संबंध राज्यात फडणविसांचे राजकीय संकटमोचक म्हणून पक्षात दबदबा निर्माण केलेल्या गिरीष महाजन यांनी खडसे व भाजपमधील खडसे समर्थकांना साधी कोपऱ्यात टाकण्याची आवडती मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे श्री. खडसे अक्षरशः विजनवासात होते. 

मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय मांडणीतून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. भाजपने मांडलेला सारिपाट उधळला. भाजपला त्याचा पहिला राजकीय शॉक श्री. खडसे यांच्या शुक्रवारी होणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षप्रवेशाने बसणार आहे. त्यामुळे कालपर्यंत चर्चेतही नव्हते, अशा अंजली दमानिया यांच्यापासून तर अनेक मंडळी पुन्हा प्रकट झाली आहेत. या घडामोडींत काल दिवसभर नाशिक, जळगाव, मुंबई सगळीकडेच माध्यमे व राजकीय वर्तुळात चर्चा फक्त एकच होती, ती खडसे यांच्या प्रवेशाची.

श्री. खडसे यांचा प्रवेश अचानक झालेला नाही. त्याची गेले सात- आठ महिने चर्चा सुरू होती. त्यामुळे प्रवेशानंतर श्री. खडसे यांचे पुनर्वसन, राजकीय भूमिका, डावपेच सगळे निश्‍चित असतील. फक्त ते हळू हळू स्पष्ट होत जातील. यात जेव्हढे धक्के बसतील, तेवढी वजाबाकी होईल ती भाजपची. कारण त्यांनी एक मोठा नेता गमावला, महाविकास आघाडीने कमावला. शुक्रवारी प्रवेश झाल्यावर श्री. खडसे यांच्या समवेत कोण जाते हे स्पष्ट होईल. 

भविष्यात कोण जातील याचा अंदाज बांधला जाईल. एकंदरच उत्तर महाराष्ट्रात जळगावच्या राजकारणावर थेट परिणाम होऊन राजकीय गणिते बदलू शकतील. रोहिणी खडसे जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष आहेत. त्या देखील नव्या पक्षात प्रवेश करतील. पुढे- मागे स्नुषा खासदार रक्षा खडसे यांची दिशा काय असेल, हे स्पष्टच आहे. त्यामुळे बॅंकेसह विविध संस्था श्री. खडसे यांच्या ताब्यात आहेत. 

नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत खडसे यांचा अप्रत्यक्ष संपर्क आहे. त्याला आता राज्यातील सत्तेची साथ मिळेल. त्यामुळे आज नसला तरी आगामी निवडणुकांसाठी सुरुंग पेरणी होणार हे स्पष्टच आहे. त्यामुळेच काल दिवसभर नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार सगळीकडे चर्चा फक्त खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रवेशाचीच होती.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com