नाशिकच्या बालेकिल्ल्यात मनसेचे ‘जाने कहा गये वो दिन'

मनसेची सत्ता असताना नाशिकची वाटचाल एका वेगळ्या, चाकोरीबाहेरच्या योजना आणि विकासाकडे झाली होती, हे कोणालाही नाकारता येणार नाही. मात्र आज हाच मनसे शहरात अस्तित्वासाठी झगडत असल्याचे चित्र आहे.
Raj Thackeray and Nashik Municipal Corporation
Raj Thackeray and Nashik Municipal Corporation

नाशिक : महापालिकेत चाळीस नगरसेवकांसह सत्त आणि शहरातील तिन्ही आमदार म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुवर्णकाळ. त्याची चर्चा सबंध राज्यात झाली ती राज ठाकरे यांच्या विकासाच्या ब्ल्यू प्रिंटमुळे. पुढे मनसेच्या राजकीय विरोधकांसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टिकेचा मुद्दा बनला होता. मात्र काहीही असले तरी मनसेची सत्ता असताना नाशिकची वाटचाल एका वेगळ्या, चाकोरीबाहेरच्या योजना आणि विकासाकडे झाली होती, हे कोणालाही नाकारता येणार नाही. मात्र आज हाच मनसे शहरात अस्तित्वासाठी झगडत असल्याचे चित्र आहे. 

त्यामुळे राजकीय कार्यकर्ते म्हणतात, कहा गये वो दिन...शिवसेनेत घुसमट होत असतांना राज ठाकरे पक्षातून बाहेर पडले. हा अवघड निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्याची पेरणी नाशिकमध्येच झाली. यावेळी राज ठाकरे यांनी नाशिकला आल्यावर आपले सगळे कार्यक्रम रद्द करुन भेटायला आलेल्या शिवसेनेचे नेते, पदाधिकारी यांनाही न भेटता त्यांच्या नेहेमीच्या हॉटेल पंचवटीमध्ये दिवसभर स्वतःशीच मंथन करण्यात व्यग्र होते. 

त्यानंतर त्यांनी दुस-या दिवशी शिर्डीला जायचे असे त्यांनी सांगितले. त्यावेळी सकाळी ते निघता, निघता त्यांच्याकडे कार्यकर्ते, नेत्यांची वाहने घेऊन गर्दी झाली होती. यामध्ये माजी महापौर वसंत गिते, नितीन भोसले, सचिन ठाकरे यांसह विविध नेते होते. मात्र ज्यांची नावेही माहित नाहीत असे असंख्य युवकांचे आश्‍वासक चेहरे त्यात होते. त्यानंतर २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेने स्वबळावर नाशिकचे पालकमंत्री आणि विकास पुरुष अशी प्रतिमा असलेल्या छगन भुजबळ यांच्याशी टक्कर देत एकहाती चाळीस नगरसेवक निवडून आणले.

महापौर व पदाधिकारी निवडणुकीत संख्याबळात त्यांच्याकडे बहुमत नव्हते. शरद पवारांनी राष्ट्रवादीला थांबण्याचा सल्ला दिला. त्यात भाजपच्या पाठींब्याने मनसे सत्तेत आला. त्यानंतरच्या २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही जागांवर वसंत गिते, नितीन भोसले आणि उत्तमराव ढिकले हे तीन आमदार विजयी झाले, हा होता मनसे नाशिक शहरातील सुवर्णकाळ.

सत्ता आली मात्र स्थानिक नेत्यांकडे पुढे काय याचे व्हीजन नसल्याने ते सर्वस्वी राज ठाकरे यांच्यावर अवलंबून राहिले. राज ठाकरे यांच्याकडे विकासाचे नियोजन व दृष्टी दोन्ही होती. त्याचा त्यांनी नशिकसाठी उत्तम उपयोग केला. महापालिकेचा पैसा न वापरता औद्योगिक सामाजिक दायित्व (सीएसआर) चा शहरांच्या विकासासाठी कसा वापर होऊ शकतो याचा उत्तम नमुना त्यांनी दाखविला. लेझर शो, उड्डानपुलाची सजावट, ट्रॅफीक पार्क, बटरफ्लाय गार्डन, नेहरु उद्यानात वन उद्यान, शहराचे सौदर्यीकरण, चौकांचे सुशोभिकरण असे प्रकल्प राबविले. अगदी उद्योजक रतन टाटा त्यासाठी नाशिकला आले. त्यांनी या प्रकल्पांचे कतुक केले. 

मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाचे मुल्यमापन त्याला निवडणुकीत किती यश अर्थात जागा मिळाल्या यावर होते. त्यादृष्टीने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत या पक्षाकडे स्थानिक नेताच राहिला नाही. त्यामुळे तब्बल पंचवीस नगरसेवकांनी मनसे सोडून घाऊक पक्षांतर केले. त्यानंतर महापालिका निवडणुकीत या पक्षाला अवघ्या पाच जागा मिळाल्या. विधानसभेच्या तिन्ही जागा भाजपने काबीज केल्या. गेले पाच वर्षे भाजप महापालिकेत व शहरात सत्तेत आहे. त्यांना राज ठाकरे यांनी केलेले प्रकल्प देखील सांभाळता आलेले नाही. मात्र गाजावाजा खुप होतो आहे. 

नेमके मनसेने ज्यांना ज्यांना महापौर केले, ते मुके होते असे म्हटले तरी चालेल. या महापौरांना आपल्या नगरसेवकांनाही सांभाळता आले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांची लोकप्रियता अद्यापही कायम आहे. त्यांची जादु पुन्हा चालू शकते. मात्र ग्राऊंड लेव्हलवर संघटनेची कमतरता ही त्यांची समस्या आहे. त्यामुळेच आज या पक्षाची चर्चा होताना कार्यकर्त्यांच्या मनात ‘कहा गये वो दिऩ' हा प्रश्‍न नक्कीच निर्माण होत असावा.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com